शेवगाव, जि.नगर (बाळासाहेब खेडकर) – बोधेगाव येथील युवा शेतकरी अनिल यादव तोतरे हा विहिरीवर विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेला असता, पावसामुळे ओलसर जमिनीत विद्युतप्रवाह उतरून त्याला जबर विद्युत शॉक लागला. त्याला तातडीने शेवगाव येथील नित्यसेवा रूग्णालयात हलविले असता, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत असून, तोतरे कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. उसतोड करणारे या कुटुंबातील कर्ता युवक अकाली गेल्याने हे कुटुंब उघड्यावर पडले असून, सरकारने तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी पुढे आली आहे.
बोधेगाव येथील अनिल यादव तोतरे हा युवा शेतकरी शुक्रवारी घराशेजारी असलेल्या विहिरींवर पाण्यासाठी विद्युतपंप सुरू करण्यासाठीं स्वतःच्या शेतजमिनीतील विहिरीवर गेला असता, झालेल्या पावसामुळे जमीन ओलसर होऊन वीजप्रवाहाचा जबरदस्त झटका बसला गेला. अनिल मोठ्याने ओरडला. घटनेची आरडाओरड होताच लगतचे ग्रामस्थ मदतीला धावून गेले. जखमी झालेल्या युवकास तातडीने उपचारासाठी शेवगाव येथील नित्यसेवा हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही सदर घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. सदर घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यांनी घटनेचा पंचनामा केला आहे. सदर युवकाची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. त्याचे कुटुंबीय उसतोडणी काम करीत होते. युवकास लहान एक मुलगा, दोन मुली, पत्नी वृध्द आई व भाऊ असा परिवार आहे. कुटूंबातील कर्ता युवक गेल्याने कुटुंब उघड्यावर पडले आहे. अकाली निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.