– माजी मंत्री सुबोध सावजींनी सावध करूनही अधिकार्यांनी केले होते दुर्लक्ष
मेहकर (अनिल मंजुळकर) – डोणगाव येथून जवळच असलेलल्या बेलगाव येथील सिमेंटच्या रस्त्याचे काम निकृष्टदर्जाचे झाले असून, तीन महिन्यांअगोदरच पूर्ण झालेल्या या सिमेंट रस्त्याचे सिमेंट खचून पडले आहे. विशेष बाब म्हणजे, माजी मंत्री सुबोध सावजी यांनी स्वतः या रस्त्याची पाहणी करून काम अतिशय निकृष्टदर्जाचे होत असल्याची बाब अधिकारीवर्गाच्या निदर्शनास आणून दिली होती. परंतु, अधिकार्यांनी ठेकेदाराशी हातमिळवणी केल्याने या कामाकडे दुर्लक्ष केले. परिणामी, राज्य सरकारने लाखो रुपये पाण्यात गेले असून, ठेकेदार व अधिकारी यांच्यावर तातडीने कारवाईची मागणी ऐरणीवर आली आहे.
डोणगांव येथून जवळच असलेल्या ग्राम बेलगाव येथे सन २०२२ मध्ये काम सुरू झालेला सिमेंट रस्ता तीन महिन्याअगोदर पूर्ण झाला. परंतु सदर रस्त्याचे काम निकृष्टदर्जाचे झाले होते. यावर माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी स्वतः सदर रस्त्याची पाहणी करून काम अतिशय निकृष्टदर्जाचे होत असल्याचे अधिकारीवर्गाला सांगून, या रस्त्याचे काम पाहणार्या अधिकार्यावर कारवाईची मागणी केली होती. परंतु यावर कोणतीही चौकशी झाली नाही, व दि. ९ सप्टेंबरला सदर सिमेंट रस्त्यावर असणारे सिमेंट खचले आहे. दि. ८ जानेवारी २०२२ ला बेलगाव ते केनवड या अंदाजे ५४७.३३ लक्ष रुपयांच्या रस्ता दुरुस्तीचे काम सुरू झाले, व सदर कामही पूर्ण झाले. गावाशेजारी असणारा रस्ता हा सिमेंटचा बनविण्यात आला. परंतु काम सुरू असतानाच सदर सिमेंट रस्त्यावर भेगा पडल्या होत्या. याकडे वरिष्ठ अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्याने दि.९ सप्टेंबरला सदर सिमेंट रस्ता खचला असल्याने सदर रस्त्याचे काम निकृष्टदर्जाचे झाले असल्याचे चव्हाट्यावर आले आहे. या कामाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आता ऐरणीवर आली आहे.