– लोणार नगरपालिकेचा प्रताप चव्हाट्यावर!
लोणार (विजय गोलेछा) – देश विदेशातील पर्यटकांना व संशोधकांना खेचून आणण्याची क्षमता असणारे जगातील तिसर्या क्रमांकाचे व देशातील एकमेव उल्कापाती सरोवराकडे जाणारा रस्ता पूर्णतः खड्ड्यात गेल्याने सरोवराकडे जाणारी वाट बिकट झाली असून, पर्यटकांमध्ये तसेच शहरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. या रस्त्यांच्या कामांत कोट्यवधींचा घपला झाल्याचा सूरही उमटू लागला आहे.
केंद्र शासन व राज्य शासनाकडून सरोवर विकास आराखडा तयार करून ३७० कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला. या अंतर्गत विविध विकास कामे सुरू करण्यासाठी अमरावती आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली अनेक कामे सुरू असताना या कामाची पाहणी करण्यासाठी स्वतः आयुक्त वेळोवेळी सरोवराला भेट देत आहेत. परंतु प्रत्येकवेळी संबंधित विभागाकडून व नगरपालिकेकडून या रस्त्यावर थातूरमातूर मुरूम टाकून रस्ता तयार करण्यात येत आहे. याबाबत हजारो रुपयांची बिले काढल्यानंतर सतत पावसामुळे या रस्त्यावर खड्डे निर्माण झाल्याने रस्त्यावर तळ्याचे स्वरूप निर्माण झाले आहे. एकीकडे पर्यटनाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासनामार्फत पर्यटन विभाग, पुरातत्त्व विभाग, वन विभागामार्फत विविध विकास कामांसाठी करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याच्या घोषणा केल्या जातात. परंतु या विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात असल्याने पर्यटकांना नागरिकांना त्रासाचे बनले आहे. पुन्हा अमरावती आयुक्त यांची लवकरच लोणार सरोवर ला भेट होणार असल्यामुळे त्यांना या खड्डेमय, चिखलमय, रस्त्याचा व पाण्याचा त्रास होऊ नये, यासाठी नगरपालिकेकडून पुन्हा याच ठिकाणी हजारो रुपये खर्च करून मुरूम टाकल्या जात आहे.