सहकार विद्या मंदिराच्या स्कूलव्हॅनला एसटी बसची भीषण धडक; १७ विद्यार्थी-विद्यार्थिनी गंभीर जखमी!
बिबी (ऋषी दंदाले) – शाळेत गोकुळाष्टमीचा कार्यक्रम असल्याने सहकार विद्या मंदिराचे चिमुकले विद्यार्थी-विद्यार्थिनी कृष्ण व राधेच्या वेशभुषेत नटूनथटून शाळेत चालले होते. परंतु, विद्यार्थ्यांच्या या आनंदावर विरजण पडले. या विद्यार्थ्यांना घेऊन जाणार्या सहकार विद्या मंदिराच्या स्कूलव्हॅनला एसटी बसने समोरून भीषण धडक दिल्याने झालेल्या अपघातात सहा ते १६ वयोगटातील १७ विद्यार्थी, विद्यार्थिनी जखमी झाले असून, या स्कूलव्हॅनचा चालकही गंभीर जखमी झाला आहे. बिबी येथे प्रथमोपचार केल्यानंतर या सर्वांना जालना येथे हलविण्यात आले आहे. या अपघातामुळे गोकुळाष्टमीच्या सोहळ्याचा आनंद हा भीती व चिंताग्रस्त वातावरणात बदलला. पालकांची एकच धावपळ उडाली होती. पोलिसांनी एसटी बसच्या चालकाला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू होती. केवळ नशीब बलवत्तर म्हणून मोठी जीवितहानी टळल्याचे सांगण्यात आले.
सविस्तर असे, की बिबी येथून एक किलोमीटर अंतरावर मांडवा रोडवर एसटी बस आणि सहकार विद्या मंदिराचे विद्यार्थी शाळेत बिबी येथे घेऊन येणार्या स्कूल व्हॅनला अपघात झाल्याची घटना आज (दि.७) सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. सकाळी चिखली -बुलढाणा (क्रमांक एमएच ४०, एक्यू ६२५८) ही बस बिबी येथून बुलढाण्याकडे जात असताना बसचालक विनोद वावळे यांचे नियंत्रण सुटल्याने सहकार विद्या मंदिराच्या स्कूलव्हॅनवर धडकली. यामध्ये ६ ते १६ वयोगटातील १७ विद्यार्थी जखमी झाले असून, विद्यार्थी व त्या वाहनाचा चालकदेखील गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती कळताच बिबी येथील दीपक गुलमोहर यांचे मित्रमंडळी, सहकारी, ग्रामस्थ, पोलीस कर्मचारी, बुलढाणा अर्बन बँकेचे कर्मचारी व सहकार विद्यामंदिरचे कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी यांनी धाव घेऊन विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढून अॅम्बुलन्स, खाजगी वाहनाने ग्रामीण रुग्णालय बिबी येथे आणले. मात्र चालकाला बाहेर काढण्यासाठी त्यांना शर्तीचे प्रयत्न करावे लागले. यावेळी बिबी येथील एसटी कर्मचारी वाघ हेही ताबडतोब मदतीला धावून आले. ग्रामीण रुग्णालयात सर्वांनाच दाखल केले. मात्र दवाखान्यात डॉक्टरांची कमी असल्याचे समजतात बिबी येथील डॉक्टर असोशियन खाजगी डॉक्टरांनी स्वतःचे दवाखाने सोडून ग्रामीण रुग्णालय गाठले. आणि, चिमुकल्या विद्यार्थ्यांवर उपचार करण्यास सुरुवात केली. प्रथोमचार करून पुढील उपचारासाठी जालना येथे पाठविण्यात आले.
गोकुळाष्टमीनिमित्त शाळेत दहीहंडीचा कार्यक्रम होणार होता. त्यामुळे शाळेच्या वाहनातील काही विद्यार्थी कृष्णा, राधिका यांची वेशभूषा करून आलेले होते. तर काही विद्यार्थिनी नटूनथटून आलेल्या होत्या. त्यांचे जेवणाचे डबे, हार, बांगड्या, पाणी बॉटल घटनास्थळी अस्ताव्यस्त पडलेले पाहून पाहणार्यांचे मने हेलावून जात होती. यावेळी बिबी पोलिस ठाण्याचे ठाणेदार सदानंद सोनकांबळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जमाव हटविला, व दवाखान्यातील गर्दी हटविण्यासाठी पोलीस कर्मचार्यांचे सहकार्यदेखील लाभले. बसचालक बिबी पोलिसांच्या ताब्यात असून या चालकाची वैद्यकीय तपासणी केली जाणार होती. पाऊस असल्यामुळे बसमध्ये नऊ प्रवासी प्रवास करीत असल्याची माहिती वाहक आर. टी. वनारे यांनी दिली. जास्त प्रवासी नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला, असेही सांगण्यात आले.