– खरात यांना तातडीने जालना येथे हलविले; प्रकृती सद्या स्थीर, रिपब्लिकन कार्यकर्ते आक्रमक!
सिंदखेडराजा (सचिन खंडारे) – रिपब्लिकन सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खरात यांनी आज ऐन गोकुळाष्टमीच्या दिवशी सिंदखेडराजा पोलिस ठाण्याच्या आवारात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. खरात यांना तातडीने जालना येथील रूग्णालयात हलविण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थीर आहे. ठाणेदार केशव वाघ यांनी आपला छळ चालविला असून, त्यांनी खूप त्रास दिल्याने आपण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे खरात यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. ठाणेदार वाघ यांच्यावर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
आज (दि.) गोकुळाष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना दुसरीकडे मात्र सिंदखेडराजा येथे एका वेगळीच घटना घडल्याने संपूर्ण जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे. रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या खांद्याला खांदा लावून आंबेडकरी चळवळीसाठी सदैव धावून जाणारे रिपब्लिकन सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खरात यांचा काल सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यामध्ये खरात हे जोरजोराने केशव वाघ हे ठाणेदार आल्यापासून मागासवर्गीय समाजावर मोठ्या प्रमाणात अन्य अत्याचार होत आहे. ठाणेदार वाघ हे समाजासमाजामध्ये भांडणे लावण्याचे काम करत आहेत. त्यांनी मला खूप त्रास दिला असून, माझ्या मरणाला ठाणेदार केशव वाघ जबाबदार राहतील, असे ते व्हायरल व्हिडिओत बोलताना दिसत आहेत. त्यानंतर आज ते अचानक िंसदखेडराजा पोलिस ठाण्याच्या आवारात आले व त्यांनी पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी उपस्थित असलेले त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्वरित त्यांना उपचाराकरिता सिंदखेडराजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हलवले. डॉक्टरांनी त्यांना तपासून जालना येथे जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे दिलीप खरात यांना जालना येथील हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. खरात यांनी पोलिस ठाणे आवारात विषारी द्रव प्राशन केल्याची माहिती स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी यांना कळताच त्यांनी तातडीने रूग्णालयात धाव घेतली. दुसरीकडे व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली असून, नेमके दिलीप खरात यांना ठाणेदार यांनी कोणता त्रास दिला व का? याची चौकशी होऊन नेमके कर्तव्यदक्ष व कार्यतत्पर म्हणून प्रसिद्ध असलेले जिल्हा पोलीस अधीक्षक कडासने हे ठाणेदार वाघ यांच्यावर काय कारवाई करतात हे पाहणेसुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे.
https://breakingmaharashtra.in/republican_sena_andoln/