‘वंचित’च्या युवा आघाडीचे ‘१ हजार सही’ अभियानाचा दणका; रिक्त न्यायाधीशांची भरली पदे!
– पक्षकारांना न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्ये मिळणार दिलासा!
बुलढाणा (संजय निकाळजे) – प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्यांच्या जागा रिक्त असल्याने सुमारे १६ हजार प्रकरणे प्रलंबित आहेत. प्रकरणे निकाली निघण्यास विलंब लागत असल्याने पक्षकार न्यायाच्या प्रतीक्षेत होते. लोकांची ही मागणी लक्षात घेत वंचित बहुजन युवा आघाडीने ‘एक स्वाक्षरी न्यायासाठी अभियान’ अभियान राबवले. एक हजार पक्षकारांच्या स्वाक्षरी घेऊन हे निवेदन उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला पाठवण्यात आले. या अभियानाची उच्च न्यायालयाने तत्काळ घेत जेएमएफसी न्यायालयात दोन न्यायाधीशांची नियुक्ती केली. उर्वरिक्त दोन न्यायाधीशांची नियुक्ती लवकरच होईल. यामुळे निश्चितच पक्षकारांना न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्ये दिलासा मिळणार असल्याचे युवा जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.
जेएमएफसी (कोर्ट तिसरे) न्यायालयात एस.एम. जोशी व जेएमएफसी (कोर्ट दुसरे) न्यायालयात पी.बी. देशपांडे हे न्यायाधीश रुजू झाले आहेत. पक्षकारांची निकड लक्षात घेत न्यायाधीशांची नियुक्ती केल्याने वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी विद्यमान उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालयाचे आभार मानले. तसेच पक्षकारांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. बुलढाणा न्यायालयामध्ये जेएमएफसी न्यायाधीशांच्या चार जागा रिक्त होत्या. एकच न्यायाधीश असल्याने त्यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी होती. न्यायाधीशांअभावी जिल्ह्यातील १६ हजार प्रकरणे प्रलंबित आहेत. न्यायाधीशांची उणीव भासत असल्याने पक्षकारांना न्यायाची प्रतीक्षा करावी लागत आहे. न्यायालयाचा आदर करत ही बाब विद्यमान उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याकरिता वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या नेतृत्वात ३ ऑगस्ट २०२३ रोजी जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात ‘एक स्वाक्षरी न्यायासाठी अभियान’ राबवण्यात आले. पक्षकारांच्या एक हजार सह्या झाल्यानंतर याबाबतचे निवेदन उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासोबतच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांना पाठविण्यात आले होते. विद्यमान उच्च न्यायालयाने आढावा घेत जेएमएफसी कोर्ट दुसरे व तिसरे या न्यायालयांमध्ये दोन न्यायाधीशांची नियुक्ती केली आणि दोन्ही न्यायाधीश तातडीने रुजू झाले. न्यायालयीन कामकाजाला गति मिळाली असून, उर्वरित दोन न्यायाधीशांचीदेखील लवकरच नियुक्ती होणार असल्याने न्यायप्रविष्ट असलेली पक्षकारांची प्रकरणे निकाली निघतील, असेही सतीश पवार यांनी सांगितले.