बुलढाणा (संजय निकाळजे) – जालन्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा समाज आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीमारच्या निषेधार्थ व आरक्षणाच्या मागणीसाठी १३ सप्टेंबररोजी बुलढाणा येथे भव्य मराठा क्रांती मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. गर्दे सभागृह येथे ६ सप्टेंबररोजी याबाबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मराठा मोर्चाच्या या वादळाने आता राज्य सरकारच्या पायाखालची वाळू सरकण्याची चिन्हे आहेत.
येथील गर्दे वाचनालयाच्या सभागृहात मराठा समन्वयकांची व समाज बांधवांची बैठक झाली. यासाठी जिल्हातील समाज बांधव एकत्र आले होते. संघटितपणे सामाजिक प्रश्नाकडे बघावे लागेल, यावर सर्वांचे एकमत झाले. या बैठकीमध्ये येत्या १३ सप्टेंबरला भव्य मोर्चाचे आयोजन करण्याचे नियोजन ठरले. त्या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधून जिल्हा समन्वयक तर प्रत्येक तालुक्यातून पाच तालुका समन्वयक घेण्याचे ठरले. या सर्वांच्या समन्वयातून मोर्चा कसा यशस्वी होईल, यावर विचारविनिमय करण्यात आला. मोर्चाची संहिता कशी असेल, त्यामध्ये कुठले स्लोगन राहतील, मोर्चाला कशाप्रकारे सुरुवात करता येईल, मोर्चाच नेतृत्व कोण करेल या सर्व विषयावर मराठा बांधवांच्यावतीने चर्चा करण्यात आली. या बैठकीला जिल्ह्याच्या तेराही तालुक्यातून प्रतिनिधी सहभागी झाले होते. मोर्चाची पुढील दिशा व वाटचाल वेळोवेळी इलेक्ट्रॉनिक मीडिया, वृत्तपत्रे, तसेच सोशल मीडियामार्फत कळविली जाणार असल्याचे समन्वयक समितीने म्हटले आहे.
———