चिखली (तालुका प्रतिनिधी) – रिपब्लिकन सेनेचे युवा प्रदेश उपाध्यक्ष भाई दिलीप खरात यांना त्रास देणारे व जातीयवादी भूमिका घेणारे सिंदखेडराजा पोलिस ठाण्याचे ठाणेदार केशव वाघ यांच्यावर अॅट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलनाचा इशारा रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विजयकांत गवई व इतर पदाधिकार्यांनी बुलढाणा येथे जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
या संदर्भातील निवेदनात नमूद आहे, की सिंदखेडराजा तालुक्यातील बामखेडा येथे दोन समाजात हाणामारी झाली असता, ठाणेदार वाघ यांनी जातीयवादी भूमिका घेतली. या संदर्भात भाई दिलीप खरात हे पोलिस ठाण्यात गेले असता, ठाणेदारांनी त्यांना जातीयवाचक बोलून अपमानास्पद वागणूक दिली. समाजाला न्याय मिळत नसल्याने, व अपमानास्पद वागणूक व त्रासामुळे खरात यांनी पोलिस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केला असून, त्यांच्यावर जालना येथे उपचार सुरू आहेत. त्यामुळे या घटनेला जबाबदार असलेल्या ठाणेदार वाघ यांच्यावर अॅट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हे दाखल करून, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्यावतीने करण्यात आली आहे. अन्यथा, संघटनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशाने राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, प्रदेशाध्यक्ष सागर डाबरासे, युवा प्रदेश अध्यक्ष किरण घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा जिल्ह्यामध्ये आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रिपब्लिकन सेनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष विजयकांत गवई, जिल्हा उपाध्यक्ष ब्रह्मा साळवे, जिल्हा महासचिव सलीम भाई, युवा जिल्हाध्यक्ष लखन कुसळकर, तालुकाध्यक्ष शाम लहाने, शहराध्यक्ष सुनील सोळंके, युवा शहराध्यक्ष शेख मलिक, सतीश पवार, सौरभ भास्कर, स्वराज क्षीरसागर, दीपक तायडे, रमेश आंभोरे, दानिश शेख, संजय मोहिते यांनी केली आहे.
https://breakingmaharashtra.in/sindkhedraja_dilip_kharat/