बुलढाणा (संजय निकाळजे) – जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेला लाठीमार यामुळे राज्यभर संताप व्यक्त होत आहे. या घटनेचा निषेध व आरक्षण मागणी या मुद्यावर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच पार पडली. यात बुलडाणा येथे मराठा क्रांती मोर्चा काढण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे पुन्हा ‘एक मराठा लाख मराठा’चा गजर गुंजणार आहे. समन्वयकांच्या बैठकीत भव्य मोर्चाचे नियोजनावर सखोल चर्चा करण्यात आली.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनावर लाठी हल्ला झाला. शासनाने वेळोवेळी मराठा समाजाला दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याने समाजामध्ये रोष आहे, त्यासाठी शांतता पूर्ण सुरू असलेल्या आंदोलनात उपोषणकर्त्यां महिला भगिनी, सहभागी मराठा बांधव यांच्यावर निर्दयीपणे, अमानुष, लाठीचार्ज व झालेला गोळीबार ही बाब सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण जगाने बघितली. सत्तेचा इतका माज आजवर कधी दिसला नसेल. लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलकांच्या अमानुष मारहाणीचा निषेध लोकशाही मार्गाने नोंदविणे हा या मोर्चाचा उद्देश आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही मागणी जुनी आहे. ती या वेळी राहणार आहे. या समर्थानार्थ जिल्हास्तरीय मोर्चा काढण्याचे ठरवण्यात आले असून, तालुकानिहाय सर्व मराठा क्रांती मोर्चाचे सर्व कार्यकर्ते (संपूर्ण समाज बंधू भगिनी) यांनी आपली वङ्कामूठ परत एकदा बांधून या लढ्यात सामील व्हावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने करण्यात आले आहे. यासंदर्भात दिनांक ६ सप्टेंबर, बुधवाररोजी सायंकाळी ५:०० वाजता गर्दे हॉल, बुलढाणा येथे नियोजन बैठक ठेवण्यात आली आहे. तालुक्यातील समन्वयक व प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्ते यांनी यासाठी हजर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय मोर्चाची दिनांक व वेळ ही ६ सप्टेंबरच्या बैठकीत निश्चित होणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने कळविण्यात आले आहे.