– मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
चिखली (तालुका प्रतिनिधी) – पावसाने ओढ दिल्याने पिके सुकण्यास सुरवात झाली असून, शासनाने तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, व २५ टक्के विमा रक्कम तातडीने शेतकर्यांच्या खात्यात जमा करावी, यासह इतर शेतकरी हिताच्या मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्यावतीने आज चिखलीत ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदारांमार्फत राज्य सरकारला निवेदन देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दासा पाटील, नेते एकनाथ पाटील, समाधान कणखर, नामदेवराव जाधव, डॉ. सुरेश हाडे, शेनफडराव घुबे, भानुदास घुबे, भिका सोळंकी, धोंडू पाटील, विलास मुजमुले, विनायक सरनाईक, समाधान घुबे, दिनकरराव टेकाळे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला. मोठ्या संख्येने शेतकरी आपले ट्रॅक्टर घेऊन मोर्चात सहभागी झाले होते. कोरडा दुष्काळ जाहीर करा, २५ टक्के विमा रक्कम तातडीने जमा करा, कांदा निर्यातशुल्क रद्द करा, सहकारी बँकेने शेतकर्यांची जमीन जप्त करून हर्राशी करण्याची प्रक्रिया तात्काळ थांबवावी, आदी मागण्यांचे निवेदन यावेळी तहसीलदारांमार्फत राज्य सरकारला देण्यात आले.
———