राज्यात पतीविरूद्ध पत्नीची रंगणार लढत!
शेवगाव, जि.नगर (बाळासाहेब खेडकर) – राज्याचे कृषीमंत्री व माझे पती धनंजय मुंडे हे कुठूनही लढू देत, लोकसभा लढोत, की विधानसभा लढोत, मी त्यांच्याविरोधात निवडणूक लढविणार असल्याचे सौ. करूणा धनंजय मुंडे यांनी नीक्षून सांगितले. त्यामुळे आगामी निवडणुकांत पतीविरूद्ध पत्नी अशी लढत रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या दोघा पती-पत्नीत बेबनाव असल्याने सद्या सौ. मुंडे यांच्यासोबतच्या लढतीकडे राज्याचेही लक्ष लागलेले आहे.
संत भगवानगड येथे संत भगवान बाबांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त दर्शनासाठी सौ. करूणा मुंडे आल्या होत्या. दर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना करुना मुंडे म्हणाल्या, की माझी भगवानबाबावर श्रद्धा असून, मी संत भगवानबाबाच्या समाधीच्या दर्शनासाठी नेहमी येत असते. आज सोमवारी प्रमुख कार्यकर्त्यांसह भगवानबाबाच्या समाधीचे दर्शन घेतले. येत्या निवडणुकीत राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात बीड लोकसभा असो किंवा परळी विधानसभा निवडणूक असो, मी कुठल्याही मतदासंघातून निवडणुकीत उभी राहणार आहे. मला या जिल्ह्यातील स्वाभिमानी जनतेचा निश्चितच पाठिंबा मिळेल. कोणत्याही परिस्थितीमध्ये मी निवडणुक लढविणार आहे. मला गतवर्षी दसर्याला भगवानगडावर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मेळावा घ्यायचा होता. परंतु, गडाकडून तशी परवानगी मिळाली नाही. त्यामुळे हा मेळावा रद्द करावा लागला, असेही त्यांनी सांगितले. माझ्या पतीच्या विरोधात कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविणार असून, नवराविरुद्ध बायकोची लढत अटळ आहे, असेही त्यांनी नीक्षून सांगितले. दरम्यान, भगवानगड हा अराजकीय असल्याने येथे कोणत्याच राजकीय नेत्याला मेळावा वैगरे घेण्यास बंदी आहे, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. तरीही, भगवानगडाचे आपल्यालाही आशीर्वाद मिळावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
————-