Breaking newsHead linesMaharashtraMarathwadaPolitical NewsPoliticsWorld update

‘मी समाजाला शब्द दिलाय, अंत्ययात्रा निघाली तरी मागे हटणार नाही’!

– उपोषण सोडण्याची राज्य सरकारची विनंती मनोज जरांगे-पाटील यांनी धुडकावली
– आंदोलकांशी राज्य सरकारची चर्चा दुसर्‍यांदा अपयशी!

छत्रपती संभाजीनगर (जिल्हा प्रतिनिधी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी प्राणाची बाजी लावलेले सकल मराठा समाजाचे समन्वयक व उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याशी राज्य सरकारच्यावतीने चर्चा करण्यासाठी आज ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मंत्री संदीपान भुमरे व अतुल सावे, अर्जुन खोतकर हे जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे पोहोचले होते. परंतु, चार दिवसांचा वेळ देतो, आम्हाला अध्यादेश द्या, तरच उपोषण सोडतो नाही तर पाणीही पिणार नाही, असे जरांगे-पाटील यांनी या मंत्र्यांना ठणकावून सांगितले. आम्ही ओबीसीच आहोत, आम्हाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या, मी समाजाला शब्द दिला आहे. माझी अंत्ययात्रा निघाली तरी मागे हटणार नाही, असेही जरांगे-पाटील यांनी नीक्षून सांगितल्यानंतर सरकारचे शिष्टमंडळ निरूत्तर झाले.

राज्य सरकारच्यावतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकटमोचक असलेले ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार मुत्सद्देगिरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याला तेवढेच चाणाक्ष असलेले मनोज जरांगे-पाटील यांनी टोलावले व मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, ही मागणी रेटली. याप्रसंगी गिरीश महाजन म्हणाले, की तुम्ही तब्येतीची काळजी घ्या, आपण चर्चेतून मार्ग काढू. आंदोलन एवढे ताणून चालत नाही. आरक्षणाच्या मागणीवर सरकार सकारात्मक असून, अध्यादेश काढण्यासाठी वेळ लागतो. वेळ द्या, अशी मागणी महाजन यांनी याप्रसंगी केली. तुम्ही उपोषण मागे घ्या, आपण चर्चेतून यावर योग्य तो मार्ग काढून, असेही महाजन यांनी जरांगे-पाटील यांना सांगितले. तथापि, मी सरकारचा चार दिवसांचा वेळ देतो, सरकारने अध्यादेश घेऊन यावे. आम्ही ओबीसीच आहोत. मराठवाडा सोडून सगळीकडे आम्हाला ओबीसीचेच जातप्रमाणपत्र मिळते. तेव्हा आम्हाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या, अशी मागणी जरांगे-पाटील यांनी ठामपणे लावून धरली. आमच्या समाजाला तातडीने आरक्षण मिळाले पाहिजेत. सरकार मागत असलेला ३० दिवसांचा वेळ फार आहे. त्यामुळे उपोषण मागे घेण्यासाठी माझ्यावर दबाव आणू नका. आपण सरकारला तीन महिने दिले होते. तुम्ही पुन्हा वेळ वाढून का मागता, असे जरांगे-पाटील यांनी मंत्री महाजन यांना सांगताच ते निरूत्तर झाले. मी समाजाला शब्द दिला आहे, मी उपोषणावर ठाम आहे, असेही जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारला ठणकावून सांगितले.


आपल्या आईबहिणींवर हल्ला करणार्‍यांचा पराभव करावा लागेल – शरद पवार

जालन्यातील उपोषणाला बसलेल्या मराठा आंदोलकांवर कारण नसताना पोलिसांनी लाठीहल्ला केला. या लाठीहल्ल्यात अनेक महिला, शेतमजूर, शेतकरी, लहान बालके जखमी झाले. कुणाच्या आदेशावरून हा लाठीहल्ला झाला, हे सरकारमधल्या लोकांनी स्पष्ट करावे. परंतु आता आपल्याला आई बहिणींवर लाठीहल्ला करणार्‍यांचा पराभव करावा लागेल, असा हुंकार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार भरला. पवार यांची संत बहिणाबाईंच्या कर्मभूमीत म्हणजेच जळगावमध्ये ‘स्वाभिमान सभा’ पार पडली. या सभेला स्वत: शरद पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, एकनाथ खडसे, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, रोहिणी खडसे, गुलाबराव देवकर, माजी आमदार बी. एस पाटील उपस्थित होते. यावेळी पवार यांनी केंद्रीय भाजप आणि महाराष्ट्र राज्य शासनाला लक्ष्य केले. ते म्हणाले, ‘देशात फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. गेली काही वर्ष ईडी सीबीआयसारख्या यंत्रणांचा गैरवापर होतोय. त्यातूनच नवाब मलिक यांना जेलमध्ये टाकले गेले. फोडाफोडीशिवाय ९ वर्षात पंतप्रधान मोदींनी काय केले, याचे उत्तर त्यांनी द्यावे. शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली. फोडाफोडी करणार्‍यांना संधी मिळताच योग्य उत्तर द्यावे लागेल’.


आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या – वडेट्टीवार; लढा एका दिवसाचा नसतो, व्यवस्थेला अंगावर घ्यावेच लागेल – आंबेडकरांचा सल्ला

दुसरीकडे, सरकारकडून दोन समाजात भांडणे लावायचे काम सुरु आहे, मराठा-ओबीसीत भांडणे लावायचे काम करु नये, असा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केला. ओबीसी आरक्षण वाढवून द्या आणि त्यात मराठा समाजाचा समावेश करा, अशी आपली भूमिका आहे. याबाबत भुजबळांशीही बोलणे झाले आहे, असेही वडेट्टीवारांनी सांगितले. तर, या सरकारने आंदोलकांसमोर गुडघे टेकलेत अशी टीका संजय राऊत यांनी केली. सरकारच्या पन्नास खोक्यांनी जरांगे पाटील किंवा मराठा आंदोलक विकले जाणार नाहीत, असेही राऊत म्हणाले. तसेच, ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांनीही, ‘मनोज जरांगे पाटील यांना विनंती आहे की, त्यांनी हा लढा सुरू ठेवण्यासाठी आपल्या प्रकृतीकडे लक्ष दिले पाहिजे. हा लढा एक दिवसाचा नसतो, हे आपण महात्मा गांधींपासून पाहत आलो आहे. स्वातंत्र्याचा लढाही अनेक दिवस चालला. ब्रिटनमध्ये जोपर्यंत चर्चिल सत्तेत राहतील तोपर्यंत भारताला स्वातंत्र मिळणार नाही, असे इंग्लंडमध्ये सांगितले जात होते. त्यानंतर चर्चिल हरले, आणि सत्तेत अ‍ॅटली आले. सत्तेत आल्यानंतर अ‍ॅटलींनी सांगितले, आम्ही भारताला स्वातंत्र देऊ अाणि भारताला स्वातंत्र मिळाले.’ ‘आपल्यालाही अशीच वाटचाल करावी लागेल. येथील व्यवस्थेला आणि न्यायालयालाही तुम्ही अंगावर घ्यायला, तुम्ही शिकले पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही येथील व्यवस्थेला आणि न्यायालयाला अंगावर घ्याल, त्यादिवशी तुम्ही ज्या प्रश्नासाठी लढत आहात, तो प्रश्न मार्गी लागायला वेळ लागणार नाही, हे आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
—————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!