सिंदखेडराजा (सचिन खंडारे) – सिंदखेडराजा तालुक्यासह चिखली, लोणार, मेहकर, देऊळगावराजा तालुक्यांतून पाऊस गायब झाला असून, सोयाबीनसह खरीप पिके धोक्यात आली आहेत. पाऊस नसल्याने सोयाबीन वाळून जात असल्याने हतबल झालेल्या मनुबाई येथील शेतकर्याने आपले दोन एकरातील सोयाबीन उपटून टाकले. त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हे सोयाबीन उपटताना त्यांचा जीव कासावीस झाला होता.
सध्या उन्हाळ्यासारखे तप्त ऊन पडत आहे. त्यामुळे शेतकरी हवामान खात्याच्या अंदाजावर अवलंबून असून, हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज पाऊस पडेल, उद्या पाऊस पडेल, त्यामुळे सर्व शेतकर्यांनी आकाशाकडे डोळे लावलेले आहे. तर पाऊसही नाही आणि विहिरीमध्येसुद्धा मुबलक पाण्याचा साठा नसल्यामुळे शिंदी येथून जवळच असलेल्या मनुबाई येथील तरुण शेतकरी वसंता लक्ष्मण वायाळ यांनी त्यांच्या गट नंबर ७१ मधील पाण्याअभावी सुकलेली दोन एकर सोयाबीन उपटून टाकली. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून, पाऊसही येत नाही, आणि विहिरीमध्येसुद्धा पाणी नाही, त्यामुळे जी पिके निसर्गावर अवलंबून आहे, ती वाळून चालली असल्याने शेतकरी कमालीचा खचून गेला आहे.
राज्यातील शिंदे-फडणवीस व पवार सरकारने इतर ठिकाणी पैसा खर्च न करता शेतकर्यांच्या उपयोगी असलेल्या रडार यंत्रणेवर पैसा खर्च करून पाऊस पाडावा, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे. शेतकरी रावसाहेब वायाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक शेतकरी आपल्या शेतातील सोयाबीन पिके उपटून टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे दुष्काळाचे संकट शेतकर्यांच्या अवतीभवती घोंगावत असून, अजूनही पावसाने कृपादृष्टी दाखवावी व शेतकर्यांना दुष्काळाच्या खाडीतून बाहेर काढावे, याकरिता मोठ्या आशेने शेतकरीवर्ग आकाशाकडे डोळे लावून बघत आहे.