वडगाव तेजनमध्ये सशस्त्र दरोडेखोरांचा धुमाकूळ; चार घरे फोडली, परिसरात प्रचंड दहशत!
लोणार (विजय गोलेछा) – शेगाव – पंढरपूर महामार्गावर असणार्या तालुक्यातील लोणार पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वडगाव तेजन येथे काल रात्री सशस्त्र दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत, तब्बल चार घरे फोडली. मुद्देमालासह लाखोंचा ऐवज लंपास केल्याने गावासह परिसरामध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, दरोडेखोराने सैन्यदलात कार्यरत असलेल्या एका जवानाचेही घर फोडले. पोलिसांनी या दरोडेखोरांचा कसून तपास चालविला होता.
शेगाव पंढरपूर महामार्गावर मेहकर ते लोणार रस्त्यावरील राज्य महामार्ग सुलतानपूरला लागून असलेल्या वडगाव तेजन येथील गावांमध्ये ४ सप्टेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीने गावाला लागून असलेल्या वयोवृद्ध शेतकरी दाम्पत्य रामकिसन रामराव तेजनकर वय अंदाजे ६५ वर्ष यांचे घर फोडून घरात प्रवेश केला. दोघेही पती-पत्नीला दोरीने बांधून तसेच तोंड कापडने बांधून चाकूचा धाक दाखवत घरात असलेले पैशाची व दागिन्यांची मागणी केली. त्यांच्या समोर घरातील मुद्देमाल घेऊन पसार झाले. त्याचवेळी भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले सैनिक नारायण तुकाराम कुलाल यांच्या घरी असलेले सीसीटीव्ही कॅमेर्याची तोडफोड करून त्यांचेही घर फोडले व घरातून मुद्देमाल लंपास केला. यानंतर जुन्या गावात (वडगाव तेजन) राहणार्या विशाल रमेश तेजनकर व इंदुबाई त्र्यंबक मानवतकर यांच्या घरावर दरोडा घालून सोने व रोख रक्कम लंपास केली. या दरोड्यात विशाल तेजनकर यांच्या घरातील रोख रक्कम ३२ हजार रूपये व अडिच ते तीन तोळे सोने, इंदुबाई मानवतकर यांच्या घरातील दोन हजाराची रोख रक्कम व दागिणे असे चोरीस गेले आहे. गावात दरोडेखोर आल्याची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिल्यानंतर लोणार पोलीस स्टेशनचे ठाणेदार निमीश मेहेत्रे व त्यांची सर्व टीम घटनास्थळी येऊन त्यांनी बुलढाण्यावरून श्वानपथक पाचारण केले व पोलिसांकडून गावातील अन्य ठिकाणची सीसीटीव्ही कॅमेरा तपासणी करून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू होता. या घटनेने या गावासह परिसरात एकच दहशत निर्माण झालेले आहे. हे सर्व दरोडेखोर हे चाकू-सुर्यासह सशस्त्र होते. त्यामुळे पोलिसांनी या भागातील गस्त वाढविण्याची मागणी पुढे आली आहे.
———