रविकांत तुपकरांचा मराठा आंदोलनाला पाठिंबा; शर्वरीताईंनी घेतली मनोज जरांगे-पाटलांची भेट!
– सरकारने दडपशाही केली तर सहन करणार नाही – तुपकर
मेहकर (अनिल मंजुळकर) – शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मराठा आंदोलनाला आपला पाठिंबा दिला असून, तुपकरांच्या पत्नी अॅड. शर्वरीताई रविकांत तुपकर यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण करणार्या मनोज जरांगे पाटील यांची काल जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे जात भेट घेऊन त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवला.
मराठा मोर्चाचे समन्वयक मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या सात दिवसांपासून जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू आहे. त्यांनी कालपासून उपोषण तीव्र केले असून, पाण्याचाही त्याग केला आहे. रविकांत तुपकर यांना जरांगे पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पाठिंबा देण्याची प्रचंड इच्छा होती. मात्र प्रकृतीच्या कारणामुळे तसे शक्य होत नाही, याची रविकांतभाऊंच्या मनात प्रचंड खंत आहे. मराठा आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज हा सर्वतोपरी निंदणीय आहे. मराठा आरक्षण हा समाजाच्या अस्मितेचा प्रश्न असून त्याकरिता कितीही मोठा लढा द्यावा लागला तरी आपण तो देऊ…! मनोजभाऊंच्या या संग्रामाला आमचा सक्रिय पाठिंबा आहे, असे रविकांत तुपकरांचे लेखी पत्र मनोज जरांगे पाटील यांना शर्वरीताईंनी दिले. यापुढे सरकारने जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत जर दडपशाही केली तर महाराष्ट्रातील जनता गप्प बसणार नाही, सरकारला हे महागात पडेल..! असा इशारा रविकांत तुपकर यांनी यावेळी दिला आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे, गणेश गावडे, पांडुरंग गटकळ, अंकुश तारख, बाबासाहेब दखणे, पुष्पाताई सपकाळ व अन्य यावेळी उपस्थित होते.