मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – आरक्षणासाठी उपोषण करणार्या मराठा समाजावर अमानुष लाठीमार केल्याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांची माफी मागितली आहे. हा लाठीमार निषेधार्ह आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असून, चौकशीत जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई होईल. या मुद्द्यावरून काही नेते राजकारण करत आहेत. त्यांनी ते सत्तेत असताना मराठा आरक्षण का दिले नाही, असा सवालही फडणवीस यांनी केला.
१ सप्टेंबररोजी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण करणार्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष अत्याचार केले होते. त्यांच्यावर लाठीमार केला, अश्रुधुराचे नळकांडी डागली, बंदुकातून छर्रे डागले, तसेच हवेत गोळीबार करून दहशत निर्माण केली होती. त्यामुळे संपूर्ण राज्यभरात शिंदे-फडणवीस-पवार सरकारविरोधात संतापाची आग पेटली होती. राज्यभरात गेले तीन दिवस तीव्र आंदोलने सुरू आहेत. या नशंस घटनेबद्दल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर पत्रकार परिषदेत माफी मागितली. आंदोलकांवर पोलिसांनी केलेली कारवाई चुकीची होती. त्यात अनेक लोकं गंभीर जखमी झालेले आहेत. त्यात काही महिलांचाही समावेश आहे. झालेल्या या घटनेबद्दल मी आंदोलकांची माफी मागतो. यावेळी फडणवीसांनी मराठा आरक्षणप्रश्नी काही माजी मुख्यमंत्र्यांवरही टीकास्त्र डागले. तसेच, विरोध मराठा समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोपही केला.
मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र मिळणार; प्रक्रिया गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून निर्देश
मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रक्रिया करण्याकरिता नेमलेल्या अपर मुख्य सचिवांच्या समितीने तातडीने कार्यवाही करून महिनाभरात अंतिम अहवाल द्यावा, या कामी सर्वोच्च प्राधान्य द्यावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. मराठा आरक्षण व समाजाला सुविधा देण्यासाठी नेमलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक आज सह्याद्री अतिथगृह येथे झाली. मराठवाड्यातले महसूल आणि शैक्षणिक रेकॉर्ड तपासण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले. या समितीकडे मराठवाड्यातल्या पाच जिल्ह्यातून कुणबी समाजाची माहिती संकलित झाली आहे. याशिवाय, हैद्राबाद इथून निझामाचे जुने रेकॉर्ड तातडीने तपासण्यात येत आहे, अशी माहिती यावेळी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी बैठकीत दिली. कुणबी नोंद असलेल्यांची वंशावळी तपासण्यात येणार आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून, युती शासन सत्तेवर आल्यानंतर आम्ही युवकांना नोकर्या, शिक्षण, शिष्यवृत्ती तसंच उद्योग व्यवसायांसाठी कर्ज, आर्थिक सहाय या माध्यमातून मदत केली आहे. मराठा समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न सुरु असतांना कुणीही राजकीय स्वार्थासाठी समाजाला भडकावू नये, असे मुख्यमंत्री या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.
मराठा आंदोलनात झालेली ती दगडफेक भिडेंच्या कार्यकर्त्यांकडून; समन्वयकांचा गंभीर आरोप
मराठा आंदोलनात उद्रेक करणारे हे संभाजी भिडे यांचे कार्यकर्ते आहेत, असा गंभीर आरोप जालन्यात मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केला आहे. जालन्यात आज मराठा समन्वयकांची एक बैठक झाली. त्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हा आरोप करण्यात आला. आजपर्यंत मराठा समाजानं शांततेत मोर्चे काढले. कधीच धुडगूस घातला नाही. मात्र मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी संभाजी भिडे यांचे कार्यकर्ते आंदोलनात घुसले आणि त्यांनी उद्रेक केला, असा आरोप समन्वयक संजय लाखे पाटील यांनी केला. त्याचबरोबर लाठीचार्ज करण्याचे आदेश कुणी दिले, याची चौकशी झाली पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही यावेळी लाखे पाटील यांच्याकडून करण्यात आली.