– महाविकास आघाडीच्यावतीने उद्या सकाळी जिल्हाभरात रस्ता रोको!
– बुलढाणा, खामगाव, मोताळा येथे तीव्र निदर्शने, प्रशासनाला दिले निवेदन
बुलढाणा/मेहकर (प्रतिनिधी) – आरक्षणासाठी आंदोलन करणार्या जालना जिल्ह्यातील मराठा समाज बांधवावर अमानुष लाठीमार झाल्याचे बुलढाणा जिल्ह्यात संतप्त पडसाद उमटले आहेत. सकल मराठा समाजाने उद्या, रविवारी बुलढाण्यात आयोजित ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली. तसेच ‘बुलढाणा बंद’चेही आवाहन करण्यात आले आहे. या शिवाय, महाविकास आघाडीसह विविध मराठा संघटनांनीही बंदची हाक दिली आहे. दुसरीकडे, ‘शासन आपल्या दारी कार्यक्रमात राडा करण्याचा प्रयत्न केल्यास तर मी त्यांना सोडणार नाही, राडा केल्यास मी पण मर्द मराठा आहे,’ असा इशारा शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, आज मोताळा, खामगाव, बुलढाणा येथे मराठा समाजाच्यावतीने निदर्शने करत, जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले.
जालना जिल्ह्यात मराठा समाजावर झालेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद बुलढाणा जिल्ह्यात उमटू लागले आहेत. शनिवारी सकल मराठा समाजाने घटनेचा निषेध नोंदवीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत निदर्शने केली. मराठा समाज शांत आहे, अंतपाहू नका, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. झालेली घटना पूर्वनियोजीत आहे की, कसे याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जिल्हाधिकार्यांमार्फत राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मराठा समाजाचे वेगवेगळ्या स्तरातील कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी निवेदन देताना सार्वजनिक शिवजयंती उत्सव समतीचे डॉ. शोन चिंचोले, सुनिल सपकाळ, डी. एस. लहाने, सुनिल जवंजाळ, राजेश हेलगे, सागर काळवाघे, दत्ता काकस, अॅड. विजय सावळे, नरेश शेळके, अमोल रिंढे, संजय हाडे, पत्रकार गणेश निकम, गणेश उबरहंडे, अॅड. राज देवकर, अॅड. संदीप ठेंग, अॅड. अमर इंगळे, प्रा. रामदास शिंगणे, डॉ. पुरुषोत्तम देवकर, प्रा. अनुजा सावळे, वंदना निकम, अनिल बावस्कर, मनिष बोरकर, सचिन परांडे, आशीष गायकी, विशाल फदाट, गौरव देशमुख, संभाजी पवार, आशीष काकडे, नीलेश हरकळ, नितीन कानडजे, विनय मोटे, दीपक मोरे, रमेश बुरकूल, लक्ष्मण ठाकरे आदी उपस्थित होते.
राज्यात वातावरण बिघडत चालले आहे. मराठा समाज संतप्त आहे. अशावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जिल्ह्यात येत आहे. घटनेची तीव्रता पाहून हा कार्यक्रम रद्द करावा, अशी मागणी याप्रसंगी मराठा समाजाचे नेते सुनील जवंजाळ यांनी केली. तर मराठा समाजावर झालेला लाठी हल्ला निषेधार्थ आहे. याचा निषेध करावा तेव्हढा कमी आहे. मी याचा निषेध करतो. अमानुष मारहाण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे, असे डॉ. शोन चिंचोले म्हणाले.
समाजापेक्षा राजकीय पक्षाला महत्व देणार्या पुढार्याला वाहिली श्रद्धांजली!
मराठा समाजावरील हल्ल्याचा शनिवारी सकाळी खामगावात तीव्र निदर्शने करून निषेध करण्यात आला. यावेळी समाजापेक्षा राजकीय पक्षाला महत्व देणार्या नेत्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नमूद आहे, की मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना, पोलीस प्रशासनाच्यावतीने ते अमानुषपणे चिरडण्यात आले. आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला, ही घटना अतिशय निंदनीय आहे. यावेळी अमानुषपणे करण्यात आलेल्या लाठीचार्जचा निषेध नोंदविण्यात आला. दरम्यान, समाजापेक्षा राजकीय पक्षाला महत्व देणार्या राजकीय पुढार्यासह कार्यकर्त्यांचा निषेध करून त्यांचे नाव न घेता सकल मराठा समाजाच्यावतीने श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर उपविभागीय अधिकार्यामार्फत राज्यपालांना निवेदन सादर करण्यात आले. या आंदोलनात माजी नगराध्यक्ष गणेश माने, माजी नगरसेवक किशोरआप्पा भोसले आदी सहभागी होते. याप्रसंगी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. तसेच महामागार्वरही कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली. उपविभागीय कार्यालयावर सकल मराठा समाजाच्यावतीने या घटनेचा निषेध नोंदवित. नेते आणि कार्यकर्त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच, सकल मराठा समाजाच्यावतीने मोताळा येथे निषेध करण्यात आला. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करीत सकल मराठा समाजाच्यावतीने २ सप्टेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
महाविकास आघाडीच्यावतीने उद्या जिल्हाभर रस्ता रोको आंदोलन
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने समाजाचे आंदोलन सुरू होते. सदर आंदोलन पोलिसी बळाचा वापर करून दडपण्याचे काम या जुलमी राज्य सरकारने केले. आंदोलनाकांवर पोलिसांनी अमानुष असा लाठीचार्ज करून गोळीबार केला. यामध्ये शेकडो स्त्री, पुरुष जखमी झाले. या जुलमी व हुकूमशाहीचे प्रतीक असणार्या सरकारच्या निषेधार्थ रविवार (दि.३) सकाळी दहा वाजता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात महाविकास आघाडीच्यावतीने रस्ता रोको आंदाेलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने व्हावे, असे आवाहन महाविकास आघाडीच्यावतीने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी केले आहे.
———-
https://breakingmaharashtra.in/jalana_maratha_andolan/