– नुकसानग्रस्त ग्रामस्थांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी
चिखली (महेंद्र हिवाळे) – संपूर्ण राज्यात रेती बंद असताना अवैध रेतीवाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. विशेष करून धाड सर्कलमध्ये सुरू असलेल्या रेतीचोरीला कोणते अधिकारी पाठीशी घालत आहेत, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. ३१ ऑगस्टरोजी असेच एक भरधाव टिप्पर टाकळी गावात शिरल्याने व ते बेफाम असल्याने मोठी जीवितहानी घडू शकली असती, परंतु सुदैवाने दुर्घटना टळली असली तरी अनेक मोटारसायकली त्याने चिरडल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. ही रेतीतस्करी एखाद्याच्या जीवावर उठण्याची शक्यता आहे.
धाडमधील टाकळी गावात ३१ ऑगस्ट रोजी जाफराबाद वरून येणारे रेतीचे टिप्पर घुसले, व ते भरधाव व बेफाम होते. या टिप्परचा महसूल विभागाचे अधिकरी माहोरा येथून पाठलाग करत होते. ही घटना रात्री अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान घडली. अधिकारी पाठलाग करत असल्या कारणाने टिप्पर ड्रायव्हरने धाडला जाण्याचा मार्ग वळवून टाकळी गावात टिप्पर नेले असता, गावातील रस्त्यावर उभ्या असलेल्या चार ते पाच मोटारसायकली टिप्पर खाली आल्याने चुरा झाल्या, व रस्ता अरुंद असल्याने हे टिप्पर घरावर जाऊन धडकले असता काही घरांचे मोठे नुकसान झाले. केवळ नशीब बलवत्तर म्हणून लोकांचे जीव वाचले.
टिप्परने दिलेल्या धडकांमुळे यशोदाबाई कुटे, साळुबा रणुबा गोराडे, विनोद गोराडे यांच्या घरांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले असून, कृष्णा दत्ता जगताप, भारत रामदास जगताप, प्रमोद पंडितराव दांडगे, गौरव देवराव पांडे यांच्या दुचाकी गाड्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. हे सर्व ग्रामस्थ मोलमजुरी करून आपली उपजीविका चालवत असल्याने महसूल विभागाने तातडीने त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे. याबाबत ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे नुकसान भरपाईची मागणी केली असून, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत जाफराबाद येथील नायब तहसीलदार यांना दूरध्वनीद्वारे संपर्क केला असता, त्यांनी झालेले नुकसान भरून देण्याचे आश्वासन दिले आहे. पुढील तपास धाड पोलिस करत आहे.