Breaking newsHead linesMaharashtraPolitical NewsPoliticsWorld update

आरक्षणासाठी आंदोलन करणार्‍या मराठ्यांवर पोलिसांची रझाकारी; बेछुट लाठीमार, हवेत गोळीबारने महाराष्ट्र पेटला!

  • News Update
  • …तर मी अख्खा महाराष्ट्र अंतरवलीत उभा करेल; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना इशारा, राजीनाम्याची केली मागणी

  • आता जर आंतरवाली सराटी गावातील लोकांच्या केसाला जरी धक्का लागला तर अख्खा महाराष्ट्र येथे उभा करेन, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी राज्यसरकारला दिला आहे. पोलिसांनी कोणाच्या आदेशाने हे कृत्य केले त्याचा देखील तपास लागला पाहिजे. सरकारने चुकीच्या लोकांशी टक्कर, पंगा घेतला आहे. मराठवाडा ही संतांची भूमी आहे तशीच वीरांची देखील भूमी आहे, हे राज्यकर्त्यांनी विसरू नये, त्यांच्यासोबत पंगा घेऊ नका, असा इशारा ठाकरे यांनी दिला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील आंतरवाली सराटा गावात चार दिवसांपासून शांततेत उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी शुक्रवारी अमानुष लाठीमार केला. त्याचे संतप्त पडसाद आता राज्यभरात उमटत आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शनिवारी रात्री त्या आंदोलकांची भेट घेतली व त्यांच्यांशी संवाद साधला. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री राजेश टोपे, खासदार संजय राऊत आदी नेत्यांची उपस्थिती होती.
  • देवेंद्र फडणवीस राजीनामा देत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार – मराठा समाज
    जालन्यात मराठा समाजाला ज्या प्रकारे मारले गेले, आई-बहिणींवर लाठीहल्ला केला. ते बघून कोणताही समाज शांत बसू शकत नाही. आम्ही रविवारपासून आंदोलनाची मालिका सुरू करणार असून, जोपर्यंत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, असा इशारा मराठा समाजाने दिला आहे. मराठा समाजाचे नेते अ‍ॅड. वीरेंद्र पवार आणि अ‍ॅड. प्रशांत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
  • मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर यांनी या घटनेचा निषेध करत पोलिसांनी जो लाठीचार्ज केला त्याला राज्यशासन जबाबदार असल्याची टीका केली. गृहमंत्र्यांच्या आदेश शिवाय हे शक्य नाही. त्यामुळे राज्यसरकारने जबाबदारी घेऊन चालते व्हावे, अशी मागणी त्यांनी केली. मराठा समाजात भांडण लावणे, केसेस दाखल करणे असे षडयंत्र सरकारने रचलेले आहे असा आरोप त्यांनी केला. तसेच संवैधनिक पद्धतीने आंदोलन सुरू ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले.
  • राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जालन्यातील घटनास्थळी आंदोलकांना भेट दिली. यावेळी उपस्थितांशी बोलताना आरक्षणाचा निर्णय आम्हीच घेतला होता, याची आठवण शरद पवारांनी शिंदे सरकारला करून दिली.

  • जालना शहरात मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या दरम्यान आंदोलकांनी तुफान दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी हवेत गोळीबार करत, अश्रूधुराच्या नळकांड्याचा मारा केला. त्यामुळे जालना शहरात आंदोलनाला हिंसक वळण मिळाले आहे. सध्या जालना शहरात तणावपूर्ण शांतता आहे.
  • ‘कालची घटना अत्यंत दुर्दैवी’ ,’सरकारनं दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही’, ‘आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने संघर्ष करू’, ‘मोठ्या प्रमाणावर पोलीस या ठिकाणी आणले गेले’, ‘एका बाजूने चर्चा तर दुसरीकडे पोलीस उतरवले’,  ‘रुग्णालयात जखमींची भेट घेतली त्यांना छर्रे मारलेत’, ‘आंदोलकांनी कोणतीही कायदा हातात घेतला नाही’, शरद पवार यांची माहिती.
  • जालन्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे आंदोलक लाठीचार्जनंतरही मागे हटले नाहीत. डोक्याला पट्टी बांधून ते आंदोलन करत आहेत. शुक्रवारच्या घटनेमुळे येथे तणावपूर्ण शांतता आहे. आंदोलकांनी राज्य शासनाने आरक्षण जाहीर करेपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्धार केला आहे.
  • ‘एक फुल आणि दोन हाफ’ला आंदोलकांची भेट घ्यावी वाटली नाही. आंदोलकांवर काल जो शासकीय अत्याचार झाला त्यावर केवळ निषेध करुन होणार नाही. जालन्यात शासन आपल्या दारी कार्यक्रम घ्यायचा होता म्हणून आंदोलन चिरडण्याचा निर्णय घेतला असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर केला आहे.
  • माजी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे देखील जालना येथे जाणार असून, आंदोलकांची भेट घेणार असल्याचे समोर येत आहे. आज संध्याकाळी उद्धव ठाकरे जालन्यात जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
  • मराठा समाजातील तरुण पोरं आक्रमक आहेत. त्यांच्यात जशास तसे प्रत्युत्तर देण्याची धमक आहे. त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला, तर नेत्यांना फिरणे मुश्कील होईल. त्यामुळे सरकारने या लाठीहल्ल्याचा मास्टरमाईंड शोधून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे, असे शेतकरी नेते रविकांत तुपकर म्हणाले.

  • छत्रपती संभाजीनगरमध्ये फुलंब्री तालुक्यातील सरपंच मंगेश साबळे यांनी जालन्यातील लाठीहल्ल्याचा निषेध करत स्वत:चीच कार पेटवून दिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. गाडी पेटवून देत असतानाच ‘एक मराठा, लाख मराठा’ अशी घोषणाबाजी करण्यात आली आहे.
  • अंतरवाली सराटी येथे झालेल्या लाठीचार्जप्रकरणी गोंदी पोलिस ठाण्यात 16 प्रमुख आंदोलकांसह 300 ते 350 आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा, दंगल भडकवणे व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा आरोप आंदोलकांवर ठेवण्यात आला आहे.
  • महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आक्रोश मोर्चातील आंदोलकांवर झालेल्या लाठीमारावरून सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. त्यांनी या प्रकरणी सरकारला एवढे टोकाचे पाऊल का उचलले? असा प्रश्न करत मराठी माणसाच्या आक्रोशातून उभे राहणाऱ्या कोणत्याही आंदोलनाला मनसेचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.
  • आज मराठा समाजाकडून जालना, धाराशिव, बीड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच, शुक्रवारी रात्री कोल्हापूर व छत्रपती संभाजीनगर आगारातील बसेसचीही तोडफोड करण्यात आली आहे.
  • संभाजीराजे छत्रपती यांनी शनिवारी सकाळी अंतरवाली सराटी गावात जावून आंदोलक व रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या जखमींची भेट घेतली. त्यांनी त्यांचे सांत्वन करून झाल्या घटनेची माहिती घेतली. तसेच त्यांना सर्वकाही ठिक होण्याचा धीरही दिला. यावेळी एका जखमी आंदोलकाने एक फोन आला अन् त्यानंतर अचानक लाठीमार झाल्याचे सांगितले.
  • शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आज संध्याकाळी अंबड आणि आंतरवाली सराटी गावांना भेट देणार आहेत. यावेळी मराठा आरक्षणासाठी आंदोलनकर्ते आणि मराठा कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत. कालच पोलिसांनी केलेल्या लाठीमारामुळे मराठा समाजात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. उद्धव ठाकरे पोलिसांच्या लाठीमारात जख्मी झालेल्या कार्यकर्त्यांनाही अंबड शाससकिय हॅास्पिटलमध्ये जाऊन भेटणार आहेत.
  • जालन्यात पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठीमाराच्या घटनेमुळे मराठा समाज आक्रमक झाला असून राज्यात ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहे. काही ठिकाणी आंदोलकांनी एसटी बसेसची तोडफोड केली आहे. तर आतापर्यंत १४ ते १५ एसटी बस जाळण्यात आल्या आहेत. यामुळे महामंडळाचं मोठं नुकसान झालं असून मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्या, असे आदेश राज्य परिवहन मंडळाने राज्यातील सर्व आगारांना दिले आहेत.
  • मराठा क्रांती मोर्चाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. उद्या म्हणजेच रविवारी ही बंदची हाक देण्यात आली आहे. थोड्याच वेळात राज्यभरातल्या मराठा समन्वयकांची बैठक होणार असून या बैठकीत हा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे.
  • मुंबईत सुरू असलेल्या इंडियाच्या बैठकीवरून जनतेचे लक्ष हटवण्यासाठी राज्य सरकारने जालन्यात सुनियोजित पद्धतीने मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला केला, असा गंभीर आरोप शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी केला आहे. लाठीचार्ज झाल्यानंतर गृहमंत्री फडणवीस म्हणत आहेत की, आम्ही चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोर कारवाई करू. मात्र, या घटनेत स्वत: सरकारच दोषी आहे. सरकारनेच सुनियोजीत पद्धतीने हा लाठीहल्ला रचला होता, असेही राऊत म्हणाले.
  • बळाचा गैरवापर करत जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीमार करणाऱ्या पोलिसांची चौकशी करण्यात येईल. यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
  • जालन्यातील अंतरवाली सराटी येथे झालेला लाठीमार दुर्दैवी असून या घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. जनतेला शांततेचे आवाहनही शिंदेंनी केले आहे.
  • जालन्यात जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत एकूण ३०० ते ३५० अज्ञात लोकांवरतीही गुन्हे दाखल केले आहे. तर काही ठिकाणी आंदोलकांना ताब्यात देखील घेतलं आहे. जालन्यातील गोंदी पोलीस स्थानकात कलम ३०७ आणि ३३३ अंतर्गत या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
  • मराठ्यांना अमानुष मारहाण व लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यात यावी व पोलिसांनी केलेल्या अत्याचाराला रोखण्यात राज्याचे गृह मंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी ठरल्याने किंबहुना या मागील सूत्रधार फडणवीसच असल्याने त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी केली आहे.
  • जालना येथील कालच्या घटनेनंतर आता आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच शहरातील आणि जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात देखील पोलिसांचा बंदोबस्त दिसून येत आहे. शुक्रवारी रात्री अनेक ठिकाणी गाड्या पेटवून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून, पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. तसेच पोलीस सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
  • पोलिसांनी केलेला लाठीमार पहा…

– राज्यात अनेक जिल्ह्यांत कडकडीत बंद; बसेसवर दगडफेक, जाळपोळ, हिंसाचाराचा आगडोंब उसळला!

छत्रपती संभाजीनगर (जिल्हा प्रतिनिधी) – जालन्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सनदशीर मार्गाने सुरू असलेले आंदोलन पोलिसांनी रझाकारी मार्गाने चिरडले. सकाळी आंदोलकांशी चर्चा करणार्‍या पोलिसांनी दुपारी आंदोलकांना घेरून बेछुट लाठीमार केला. हवेत गोळीबार करून प्रचंड दहशत निर्माण केली. महिला, लहानमुले, वृद्धांवर रक्तबंबाळ होईपर्यंत पोलिसांच्या लाठ्या चालत होत्या. पोलिसांनी तुफान लाठ्या चालविल्यानंतर यावेळी जोरदार दगडफेकही झाली. यात अनेकजण गंभीर जखमी झालेत. पोलिसांपासून वाचण्यासाठी आंदोलकांनी राम मंदिरात आश्रय घेतला. पोलिसांनी अश्रुधुराचा बेसुमार वापर केला, हवेतील गोळीबाराने दहशत निर्माण केली. रझाकारालाही लाज वाटेल, असा अमानुष लाठीमार पोलिसांनी मराठा आंदोलकांवर केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटले आहेत. मराठवाड्यासह राज्यात अनेक ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला असून, संतप्त मराठा तरूण रस्त्यावर उतरला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशीव, परभणी, लातूर, कोल्हापूर येथे मोठ्या प्रमाणात जाळपोळ, दगडफेक, बसेस फोडण्यात आल्या असून, हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. जालना जिल्ह्यासह हे वृत्तलिहिपर्यंत ११ बसेस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या आहेत. मराठा समाजाने मुंबई, कोल्हापूर, नाशिक येथे तातडीची बैठक बोलावली असून, या बैठकीत पुढील आंदोलनाची रणनीती निश्चित केली जाणार आहे. दरम्यान, छत्रपती उदयनराजे भोसले, शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जालना येथे जाऊन जखमी आंदोलकांसह महिला व पुरूषांची भेट घेऊन विचारपूस करणार आहे. या सर्व नेत्यांनी या लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. छत्रपती संभाजीनगरहून जालना येथे जाताना शरद पवार यांना मोठी सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली होती. पवार यांच्या गाडीची बीडीडीएस पथकाकडून तपासणी करण्यात आली. त्यांना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली असून, जालना येथे जात त्यांनी जखमींची विचारपूस केली. पवार हे दुपारी चार वाजता पत्रकार परिषदही घेणार आहेत.

https://breakingmaharashtra.in/jalana_police_attack/

दरम्यान, आज सकाळपासून मराठा तरूण रस्त्यावर उतरले असून, हिंसाचार सुरू आहे. कर्नाटक व महाराष्ट्र सरकारच्या दोन बसेस धुळे-सोलापूर महामार्गावरून जात असताना आंदोलकांनी अडविल्या. प्रवाशांना खाली उतरून त्या पेटवून दिल्याने एसटी महामंडळाने तातडीने आपली बससेवा बंद केली आहे. सद्या धुळे-सोलापूर महामार्गासह राज्यातील सर्व बससेवा बंद ठेवण्यात आल्या असून, एसटीच्या उच्चाधिकारप्राप्त कमिटीने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांचे राज्यभर हाल सुरू आहेत. या शिवाय, छत्रपती संभाजीनगरहून बीड, सोलापूर, धाराशीव, लातूरकडे जाणार्‍या रेल्वेगाड्याही बंद करण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या लाठीहल्ल्यात जखमी झालेले अनेक आंदोलक नजीकच्या खासगी व सरकारी रूग्णालयात पोहोचले असून, त्यांच्यावर मारहाणीचे गंभीर व्रण व अंगात छर्रे घुसले असल्याचे दिसून येत आहेत. या गंभीर जखमींमध्ये महिला, लहान मुले, वयोवृद्ध नागरिकांचाही समावेश आहे. यावेळी ३८ पोलिस कर्मचारी जखमी झाल्याचीही माहिती हाती आली आहे. पोलिसांनी गोळीबार केल्याचे आंदोलक सांगत असले तरी, पोलिसांनी गोळीबारीचे वृत्त नाकारले आहे.

‘आम्ही मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला होता. मात्र, काही जणांनी कोर्टात जाऊन त्यावर स्थगिती आणली. हे आंदोलन स्वार्थासाठी नाही. तर तरुण पिढीच्या भविष्यासाठी आहे. आंदोलन बदनाम होणार नाही, याची काळजी घ्या. आरक्षणासाठी आपण प्रयत्न करुया’

  • शरद पवार


जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला थेट आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी चार दिवसांपासून मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाने उपोषण आंदोलन सुरू केले होते. उपोषणादरम्यान मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे-पाटील यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली, पण आरक्षणाबाबत काय? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला गेल्याने ते ठोस आश्वासन देऊ शकले नाहीत. त्यामुळे जरांगे-पाटील यांनी आपले उपोषण सुरूच ठेवले. तरीही आंदोलन चालू ठेवा, किमान उपचार तरी घ्या, अशी प्रशासन व मुख्यमंत्र्यांची विनंती जरांगे-पाटील यांनी मान्य केली. तरीही ३१ ऑगस्टच्या रात्री सक्तीने हे आंदोलन मोडित काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. रात्रीच्या अंधारात मोठा पोलिस फौजफाटा गावात पोहोचला. पोलिसांनी आंदोलकांना हुसकविण्याचा प्रयत्न केला. परंतु, ग्रामस्थांनी रौद्रावतार धारण करताच पोलिस व प्रशासनाने माघार घेतली. परंतु, काल (दि.१) सकाळी जरांगे-पाटील व ग्रामस्थांशी पोलिस व प्रशासनाने चर्चा केली, व दुपारी पोलिसांनी त्यांना बळजबरी उचलण्याचा प्रयत्न केला. उपविभागीय अधिकारी दीपक पाटील, तहसीलदार चंद्रकांत शेळके, पोलिस उपविभागीय अधिकारी नीरज राजगुरू, अप्पर पोलिस अधीक्षक राहुल खाडे हे आणखी फौजफाटा घेऊन आंदोलनस्थळी दाखल झाले. पोलिस दादागिरीवर उतरले असल्याचे पाहून वडीगोद्री, शहागड, विहामांडवा, उमापूर, तीर्थपुरी, साष्टपिंपळगाव, हादगाव, शहापूर, मादळमोही, मांजरसुंबा, गोंदी, धोंडराई आदी गावांसह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ आंदोलनस्थळी धावून आले. त्यात महिला, मुले, वयोवृद्ध यांचा समावेश होता. यावेळी पोलिसांना विरोध झाल्याने पोलिसांनी अगदी रझाकारालाही लाज वाटेल, असा अमानुष लाठीहल्ला आंदोलकांवर केला. पोलिसांनी दिसेल त्याला झोडपले, अगदी लहान मुले व महिलांनाही सोडले नाही. त्यामुळे एकच हाहाकार उडाला. पोलिसांनी निझामी करून मराठा आंदोलन चिरडल्याचे वृत्त चोहीकडे पसरल्यानंतर मराठा आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्गावर तीन वाहने पेटवून दिली. जालना-छत्रपती संभाजी महामार्गावरही जाळपोळ करण्यात आली.

बीड मार्गावरही जाळपोळ, दगडफेक झाली. या हिंसाचारात एसटी महामंडळाच्या ११ बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्री १२ वाजता मध्यवर्ती बसस्थानकात कोल्हापूर आगाची बस मागून जाळण्यात आली. तर सिडको बसस्थानकात पैठण फलाटावर उभी बस फोडण्यात आली. तसेच, शुक्रवारी रात्री कोल्हापूर व छत्रपती संभाजीनगर आगारातील बसेसचीही तोडफोड करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने गेवराई-शेवगाव मार्ग पोलिसांनी बंद केला. छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहने शेवगाव मार्गाने वळवण्यात आली. याठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गेवराई, संभाजीनगरकडे जाणार्‍या बस डेपोत ठेवल्या असून, सोडलेल्या नाहीत. गेवराईतून पुणे, मुंबईकडे जाणार्‍या बसेस सध्या बंद आहेत. रस्ता सुरळीत होईल तेव्हा सोडण्यात येतील, असे बीडचे एसटी विभागाचे विभाग नियंत्रक अजय मोरे यांनी सांगितले. आज मराठा समाजाकडून जालना, धाराशीव, बीड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे.

दरम्यान, बळाचा गैरवापर करत जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीमार करणार्‍या पोलिसांची चौकशी करण्यात येईल. यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. तसेच, स्वराज्य संघटनेचे छत्रपती संभाजीराजे यांनीदेखील जालन्यात जात पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या ग्रामस्थांची भेट घेत त्यांची विचारपूस केली आहे. यावेळी ग्रामस्थ महिला छत्रपतींसमोर ढसाढसा रडल्या व पोलिसांनी केलेल्या अत्याचाराची माहिती राजेंना दिली. या प्रकरणी दोषींवर कारवाई करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घेण्याची मागणी काँग्रेसच्यावतीने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्रही लिहिले आहे. आ.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, मराठा आरक्षणबाबत सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. पण आता तर हे शांततापूर्ण आंदोलन दडपण्याचे काम सरकारकडून सुरु आहे. आंदोलन दडपण्याचे आदेश मुंबईतून दिले असल्याचे कळते. या निंदनीय घटनेची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचा त्वरित राजीनामा घेतला पाहिजे. या घटनेचा सर्व स्तरातील नेत्यांकडून निषेध व्यक्त होत आहे. उदयराजे भोसले यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली असून, दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणात उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवर दगडफेक करण्यात आल्यानंतर लाठीचार्ज करण्यात आला, अशी प्रतिक्रिया दिली. तर, जाणीवपूर्वक लाठीचार्ज करून महाराष्ट्रात तणावाचे वातावरण निर्माण करणे, इंडिया आघाडीवरून लक्ष हटवण्यासाठी सरकारचा हा सुनियोजित कट असल्याचा आरोप शिवसेना नेते खा. संजय राऊतांनी केला. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा इतके हे प्रकरण गंभीर असल्याचे खा. राऊत म्हणाले.


मराठ्यांवर गोळी चालवायची असेल तर आधी मला गोळी घाला; संभाजीराजेंनी पोलिसांना ठणकावले!

छत्रपती संभाजीराजे यांनी जालना येथे रूग्णालयात जाऊन गंभीर जखमी झालेल्या मराठा आंदोलकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी लाठीचार्जच्या घटनेचा निषेध केला. आंदोलकांवर तुम्ही गोळीबार कसाकाय करु शकता? मराठ्यांवर गोळी घालायची असेल तर ती आधी छत्रपती संभाजीराजेवर घाला, अशी उदिग्न प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. ते म्हणाले की, कालच्या घटनेवर बोलणं मी क्रमप्राप्त समजतो. शिवाजी महाराजांचा आणि राजर्षी शाहू महाराजांचा वंशज म्हणून मी येथे बोलत आहे. शाहू महाराजांनी जगाच्या, देशाच्या इतिहासात पहिल्यांदा आरक्षण लागू केले. शाहू महाराजांनी ५० टक्के आरक्षण बहुजनांना दिले होते. मराठ्यांनी कायम शांततेने मोर्चे काढले आहेत. ५८ मोर्चे काढले पण कुठेही हिंसाचार झाला नाही. त्याची दखल जगानेसुद्धा घेतली. पण, कालच्या घटनेमध्ये लाठीचार्ज झाला, गोळ्या झाडल्या, अश्रू धुरकांड्या फोडल्या. कालचा प्रकार निंदनीय आहे. आम्ही सरकारचा निषेध करतो, असे राजे म्हणाले. निजामाच्या, मोगलांच्या राज्यात असे प्रकार व्हायचे असे ऐकले होते, पण शिवराय-शाहूंच्या राज्यात असं होतंय? शिवरायांचं नाव घेऊन सरकार चालवता, स्वराज्य पुन्हा आणायचंय म्हणता मग हेच का तुमचं स्वराज्य? मला सरकारला सांगायचंय मराठ्यांवर गोळी चालवायची असेल तर आधी मला गोळी घाला, अशा उद्गिग्न भावना छत्रपती संभाजीराजेंनी व्यक्त केल्या. तसेच शिवाजी महाराजांचं नाव घेऊन मोगलांच्या पद्धतीने राजकारण करायचं असेल तर आम्हीही वाटच बघतोय, असा इशारा सरकारला देताना आता मराठ्यांसोबत बहुजन समाज आहे, असंही संभाजीराजेंनी आवर्जून सांगितले. छत्रपती संभाजीराजे बोलत असताना मनोज जरांगे यांना भावना अनावर झाल्या. त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. यावेळी आक्रमक राजेंचे हळवे रूपही बघायला मिळाले. त्यांनी जरांगे यांचे रुमालाने डोळे पुसत त्यांना पाणीही दिले.
——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!