चुकीचे लॅब रिपोर्ट व चुकीच्या उपचारांनी घेतला मेहकरातील त्या १७वर्षीय विद्यार्थिनीचा बळी?
– मेहकरातील बोगस डॉक्टर, बोगस लॅबची तपासणी कधी?; आणखी किती बळी हवेत?
मेहकर (अनिल मंजुळकर) – ‘शासन आपल्या दारी’ हा शासनाचा लोकाभिमुख उपक्रमाची जिल्हासह मेहकर तालुक्यात जोरदार तयारी सुरू आहे. अशातच मेहकरात डेंग्युसदृश आजाराने १७ वर्षीय विद्यार्थिनीचा २८ ऑगस्टरोजी मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडालेली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या विद्यार्थिनीला डेंग्यु झाल्याचे निदानच लवकर झाले नाही. तिच्या रक्त-लघवीच्या तपासणीत मेहकरातील संबंधित लॅबवाल्यांना डेंग्युचे निदान करता आले नाही. त्यामुळे अचूक निदान व उपचाराअभावी या तरूणीचा बळी गेल्याची चर्चा मेहकरात आहे. या निमित्ताने मेहकरातील बोगस डॉक्टरांचा तसेच लॅबवाल्यांचा प्रश्न चव्हाट्यावर आला असून, तालुका आरोग्य अधिकारी यांच्यासह संपूर्ण आरोग्य विभागाचा अक्षम्य हलगर्जीपणाही या डेंग्युबळीने उघड पडला आहे. या विद्यार्थिनीच्या मृत्यूची उच्चस्तरावरून चौकशीची मागणी पुढे आली असून, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्यावतीनेदेखील हे प्रकरण राज्याच्या आरोग्य मंत्र्यांपुढे नेण्यात येणार आहे.
पूजा विजय जगदाळे ही विद्यार्थिनी थंडी-तापाने आजारी पडली. तिला शहरातील तीन ते चार ठिकाणी खाजगी दवाखान्यात नेण्यात आले. तेथील उपचारानंतरही प्रकृतीत फरक पडला नाही. एका डॉक्टरने तिला छत्रपती संभाजीनगर येथे रेफर केले. तिथे काही तपासण्या केल्यानंतर तिला डेंग्यु झाल्याचे निदानात कळाले, व घरच्यांना धक्काच बसतो. मेहकरात डॉक्टरांनी जवळच्या लॅबवाल्याकडून रक्त तपासण्या करून घेतल्या. यामध्ये डॉक्टरांना समजले नाही का? लॅब बोगस आहे का? डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे त्या मुलीचा जीव गेला हे सत्य नाकारता येणार नाही. कारण छत्रपती संभाजीनगरला दवाखान्यात पेशंट गेला की तेथील डॉक्टर मेहकरातील या लॅबवाल्यांच्या रिपोर्टवर विश्वास ठेवत नाही. हेही तेवढेच खरे. संभाजीनगरच्या डॉक्टरांनी तपासणी करून उपचार सुरू केले, तेव्हा फार वेळ निघून गेली होती. त्यामुळे मेहकरातील डॉक्टर व लॅबचालक यांच्या चुकीमुळे पूजाच्या आरोग्याशी खेळ होऊन तिची प्राणज्योत मालवली, असल्याचा संताप व्यक्त होत आहे. झालेल्या प्रकाराला दोषी कोण? असा प्रश्न मेहकरवासीयांना पडलेला आहे.
दरम्यान, ताप,सर्दी खोकला या आजाराने ग्रस्त पूजावर मेहकरातील तीन ते चार डॉक्टरांनी उपचार केले होते. या डॉक्टरांनी कोणते उपचार केले व कोणकोणत्या तपासण्या केल्यात, कोणती औषधी दिली यासह संबंधित पॅथॉलॉजी लॅबची चौकशी होणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रंजीत मंडाले यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.
डॉक्टरसह लॅबची तपासणी करा!
सध्या ताप, सर्दी, खोकला या आजाराने थैमान घातले आहे. आरोग्य यंत्रणेवर शासन इतका खर्च करत असतानाही अधिकारी, कर्मचारी बेसावधपणे वागताना दिसत आहेत. मेहकर तालुक्यात कुठेच औषध फवारणी नाही. गावागावात असलेले खड्डे, साचलेले पाणी दिसत आहे. जिकडे तिकडे गल्लीबोळात घाण साचलेले दिसत आहे. हिवताप निर्मुलन अधिकारी कुठेच काम करताना दिसत नाहीत. शिवाय, मेहकरातील बोगस डॉक्टरांचाही प्रश्न ऐरणीवर आला असून, बोगस लॅबचाही सुळसुळाट झाल्याने या बोगस डॉक्टरांची व लॅबवाल्यांची तपासणी करणे गरजेचे आहे. सध्या डॉक्टर हे रुग्ण आल्यावर त्याची रक्त व लघवी तपासणी करायला लावतात. त्याचे आलेले रिझल्टनुसार उपचार करतात. मात्र तेच पॅथोलॉजी लॅबमधील जर बोगस डॉक्टर व तंत्रज्ञ असतील तर त्यातून आलेले रिझल्ट कितपत योग्य, असा प्रश्न निर्माण होते आहे. यावर आरोग्य विभागाने तातडीने कार्यवाही करणे गरजेचे आहे.
जिल्हा हिवताप अधिकारी चव्हाण व एडीएमओ होगे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.जामकर यांच्या मार्गदर्शनाने मेहकर शहरात संशयित डेंग्यु रुग्ण निघाल्यानंतर आज काही भागांमध्ये कंटेनर सर्वेक्षण करण्यात आले. कंटेनरमध्ये टेमिफॉस टाकण्यात आले. काही दूषित कंटेनर रिकामे करून घेण्यात आले. नागरिकांना एक दिवस कोरडा दिवस पाळण्यासाठी सांगण्यात आले. तसेच हिवताप बाबतच्या हस्तपत्रिकेचे वाटप करण्यात आले. आरोग्य सेवक यांनी सर्वेक्षण करून यासाठी सहकार्य मिळाले आहे. या कार्यक्रमासाठी आरोग्य पर्यवेक्षक जगताप, घुले व गुंजकर आरोग्य निरीक्षक यांनी कंटेनरची पडताळणी करून मार्गदर्शन केले आहे. तसेच, ग्रामीण रुग्णालय मेहकर यांच्या सूचनेनुसार मेएसो हायस्कूल मेहकर येथे श्री गुंजकर आरोग्य निरीक्षक व श्री जाधव आरोग्य सेवक यांनी सर्व विद्यार्थी यांना हिवताप व डेंग्यू तसेच इतर आजाराबाबत सखोल माहिती देण्यात आली.