लोणार (विजय गोलेछा) – लोणार पंचायत समिती अंतर्गत येणार्या आरडव येथील शाळेवर शिक्षक नसल्याने ग्रामस्थांसह विद्यार्थी संतप्त झाले असून, आज पंचायत समिती कार्यालयावर बालगोपाळांनी धडक देऊन पंचायत समितीतच शाळा भरवली, व ठिय्या आंदोलन केले. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे गटविकास अधिकारी देशमुख यांनी गटशिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुख यांच्याशी चर्चा करून तातडीने या शाळेसाठी शिक्षकाची नियुक्ती केली.
सविस्तर असे, की तालुक्यातील आरडव येथील जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या शाळेमध्ये गेल्या दीड वर्षापासून शिक्षकांची जागा रिक्त होती. या ठिकाणी एकच शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत असताना नवीन शिक्षकाची नेमणूक करण्यासाठी प्रशासनाला गावकर्याच्यावतीने वेळोवेळी मागणी करण्यात आली होती. परंतु या ठिकाणी दीड वर्षाच्या कालावधीमध्ये नवीन शिक्षकाची नेमणूक करण्यात आली नव्हती. विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान यामुळे त्रस्त पालकांनी आपल्या लहान चिमुकल्या बालकांसह पंचायत समिती गटविकास अधिकारी देशमुख यांच्या कार्यालयातच शाळा भरवून विद्यार्थ्यांना बसवून ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी गावातील नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. ह्या लहान बालगोपाल चिमुकल्यांच्या ठिय्या आंदोलनामुळे त्वरित दखल घेऊन गटविकास अधिकारी देशमुख यांनी केंद्रप्रमुख व गटशिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा करुन आरडव गावासाठी तत्काळ नवीन शिक्षकांची नेमणूक केली.
————