– शरद पवार आपल्या मित्राचा तरी सल्ला आता ऐकणार का?
– हुशार असूनही पवारांनी पंतप्रधानपदाची संधी दोनदा घालवली – पूनावाला यांची खंत
– डेंग्यु व मलेरियावर सीरम इन्स्टिट्यूट लवकरच लस आणणार – पूनावालांची घोषणा
पुणे (सोनिया नागरे) – ‘शरद पवार यांचे आता वय झाले आहे, त्यांच्याकडे दोनवेळा प्रधानमंत्री होऊन जनतेची सेवा करण्याची संधी होती, पण ती त्यांनी घालवली, आता त्यांनी थांबले पाहिजे.’ असा थेट सल्ला शरद पवार यांचेच वर्गमित्र असलेले व कोरोना काळात कोरोना प्रतिबंधक लस जगाला देऊन जीवन वाचविणारे सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख, ज्येष्ठ उद्योगपती सायरस पूनावाला यांनी दिला आहे. ते पुण्यातील कोरेगाव पार्क येथे मीडियाशी बोलत होते. पवार यांनी दोनदा पंतप्रधान होण्याची संधी घालवली आता त्यांनी आराम करावा, मी पण आरामच करतो आहे, असेही पूनावाला म्हणाले. यापूर्वी हाच सल्ला अजितदादा पवार यांनी दिला असता, पवारांनी अजितदादांना फटकारले होते. आता जीवलग वर्गमित्राचा सल्ला शरद पवार ऐकणार का, हा प्रश्न निर्माण झालेला आहे.
सायरस पुनावाला यांचा शरद पवारांना निवृत्तीचा सल्ला #CyrusPoonawalla #SharadPawar #MaharashtraPolitics pic.twitter.com/2sjSqooNMj
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) August 30, 2023
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वयावरून निवृत्तीच्या चर्चा राज्याच्या राजकारणात अनेकदा झाल्या आहेत. अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर त्यांच्या भाषणात अनेकदा, ‘शरद पवार यांचे वय झाले, आता तरी पुढच्या पिढीला संधी दिली पाहिजे, तुम्ही आता घरी बसले पाहिजे.’ असा उल्लेख केला होता. पण त्यानंतरच्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी ‘राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा शरद पवार हेच आहेत’ असे ठणकावून सांगितले आणि या वयातही आपण सक्षमपणे राजकारण करू शकतो हे दाखवून दिले आहे. भारताच्या लसीकरणाचे सम्राट म्हटले जाणारे उद्योगपती सायरस पूनावला यांनी मीडियाशी बोलताना चंद्रयान-३च्या यशस्वी लँडिंगबद्दल इस्त्रोचे कौतुक केले. यावेळी पत्रकारांनी त्यांना शरद पवार यांच्याबद्दल सवाल केले. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, की शरद पवार खूप हुशार व्यक्ती आहेत. ते देशाचे मोठी सेवा करू शकत होते. आता त्यांचे वय झाले आहे त्यांनी आता निवृत्त झाले पाहिजे. दरम्यान, यावेळी सायरस पुनावाला यांनी एक मोठी घोषणा केली. त्यांनी सीरम इन्स्टिट्यूट लवकरच डेंग्यू आणि मलेरियावर लस आणणार असल्याचे जाहीर केले. डेंग्यू आजार सध्या देशभरात पसरला आहे. डेंग्यूवरील लस वर्षभरात बाजारपेठेत आणणार असल्याचे पूनावाला म्हणाले.
‘माझं शरद पवारांना म्हणणं आहे की, त्यांना देशाचा पंतप्रधान होण्याची दोनवेळा संधी होती. पण त्यांनी ती संधी घालवली. कारण ते खूप फार हुशार आहेत. ते देशाची फार सेवा करु शकले असते. पण त्यांची संधी गेली. याबाबत मला जास्त वाईट वाटतं. आता त्यांचं वय झालं आहे. त्यांनी आता रिटायर व्हावं’.
– सायरस पूनावाला, पवारांचे वर्गमित्र व ज्येष्ठ उद्योगपती
——–