Breaking newsBULDHANAChikhaliHead linesVidharbha

समृद्धी महामार्गावर वाटमारी करणारी टोळी जेरबंद!

– सहा लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक धक्कादायक गुन्ह्यांचा लवकरच उलगडा?

मेहकर (अनिल मंजुळकर) – समृद्धी महामार्गाने जाणार्‍या प्रवाशांच्या वाहनासमोर गाडी आडवी लावून त्यांना मारहाण करून लुटणार्‍या टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून, त्यांच्या चौकशीत अनेक धक्कादायक घटनांचा उलगडा होण्याची शक्यता आहे. जेरबंद करण्यात आलेल्या तीन आरोपींकडून सहा लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून, अटकेतील आरोपी हे जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहेत. दरम्यान, या आरोपींच्या अटकेमुळे समृद्धी महामार्गावर किनगावराजा पोलिस ठाण्याच्या हद्दीत यापूर्वी झालेल्या जबरी चोरीच्या घटनेचाही उलगडा होण्याची शक्यता आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन भगवान जाधव (२२, रा. भिवपूर, जि. जालना), अनिल पवार (रा. तिसगाव, छत्रपती संभाजीनगर) आणि राजेश सुरेश गवळी (३६, रा. छपन्ननगर, मुकूंदवाडी, छत्रपती संभाजीनगर) अशी या आरोपींची नावे आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात येत असलेल्या उमरखेड येथील बाबुराव फुके हे समृद्धी महामार्गाने छत्रपती संभाजीनगरकडे त्यांच्या वाहनाद्वारे जात होते. मेहकर टोल नाक्यानजीक तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्या वाहनासमोर गाडी आडवी लावली. फुके यांना जिवे मारण्याची धमकी देत त्यांच्याकडील एक लाख २० हजार रुपये रोख व मोबाईल, असा १ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. प्रकरणी फुके यांनी २४ ऑगस्टरोजी याप्रकरणी मेहकर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.  दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक सुनिल कडासने यांनी तपास स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक लांडे यांच्याकडे सोपविला.

दरम्यान, २६ ऑगस्टरोजी गोपनीय माहितीच्या आधारावर एलसीबीच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातून गजानन भगवान जाधव आणि अनिल पवार यांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान, त्यांच्या तिसर्‍या सहकार्‍यास छत्रपती संभाजीनगरमधून ताब्यात घेण्यात आले आहे. या आरोपींकडून एक लाख ४० हजार रुपयांचे १४ मोबाईल, पाच लाख रुपयांची कार आणि ३५ हजार रुपये रोख, चांदीचे आठ हजार रुपयांचे दागिने असा ६ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. काल, २८ ऑगस्ट रोजी ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक विलासकुमार सानप, श्रीकांत जिंदमवार, सचिन काकडे व त्यांच्या सहकार्‍यांनी केली. या आरोपींच्या चौकशीतून अनेक धक्कादायक माहितीही उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून, त्यादृष्टीने पोलिस कसून तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!