– डोंगरखंडाळा येथे शुक्रवारी सकाळी १० वाजता रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम
बुलढाणा (संजय निकाळजे) – महाराष्ट्रभर लोककलेच्या माध्यमातून महापुरुषांचे विचार पोहोचवणारे महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीचे प्रदेश उपाध्यक्ष ज्येष्ठ शाहीर प्रेमसागर कांबळे यांचे २१ ऑगस्ट रोजी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या या निधनामुळे कलाक्षेत्रावर दुःखाचा सागरच कोसळला आहे. गेल्या ५० ते ६० वर्षापासून कलेशी’नाळ’जोडलेला शाहीर प्रेमसागर कांबळे सत्तरी पार केल्यानंतरही कलावंतांसाठी झटतच राहिले. कलावंतांसाठी त्यांनी शासन दरबारी आंदोलने, उपोषणे, मोर्चे काढून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रभर त्यांच्या तालमीमध्ये शिकलेले अनेक कलावंत आहेत. अनेकांना शासकीय योजना व मानधन मिळून देण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे.
अनेकांना शासनाच्या माध्यमातून मिळणारे विविध विभागाचे कार्यक्रम त्यांनी मिळवून दिले, मात्र आता तब्येत साथ देत नसल्याने स्वतःच्याच गावामध्ये ‘स्नेहभेट’ मेळाव्याची कल्पना त्यांना सूचली. आणि आयुष्यातील हा अखेरचा कार्यक्रम होतो की काय, असे भावनिक होऊन कलावंतांना कळविले. मात्र या स्नेहभेट मधून कलावंतांचा ‘संगम’ होईल हा ‘हर्ष’ देखील त्यांना तेवढाच होता. शाहिरी लोककलेबरोबरच शाहीर व लोककलावंतांच्या हितसंवर्धनार्थ कांबळे प्रतिष्ठानच्या माध्यमातून ज्येष्ठ शाहीर प्रेमसागर कांबळे काम करीत असतांना आयुष्याची संध्याकाळ कधी झाली, हे उमजलेच नाही.वयाची सत्तरी केंव्हाच ओलांडली आहे. काळ खुणावतो आहे. आयुष्याचा शेवट हा आता केंव्हा होईल हे काही सांगता येत नाही.
‘कधी प्राण जाईल ना ठावे कुणा,
देहाचा पिंजरा हा पडेल सुना,
राहू नको भ्रमांत भल्या माणसा’!
ह्या काव्यपंक्तीनुसार हा’प्राण’ह्या कुडीतून केंव्हा निघून जाईल.हे काही सांगता येणार नाही. हे त्यांना जणू कळलेच होते. आयुष्यांत आतापर्यंत शाहीर लोककलावंतांचे असलेले प्रश्न व समस्यांची शासन दरबारी सनदशीर मार्गाने सोडवणूक करण्यासाठी व त्यांच्या न्याय मागण्यासाठी शासन दरबारी सनदशीर मार्गाने निदर्शने, धरणे आंदोलन, लाक्षणिक उपोषण, बेमुदत आमरण उपोषण,घेराव आंदोलन व मोर्चे इत्यादी क्रांतिकारी स्वरूपाचे आंदोलने त्यांनी केली. क्रांतिकारी आंदोलने यशस्वी करणेसाठी ज्या शाहिरांनी, लोककलावंतांनी आश्रयदात्यांनी व हितचिंतकांनी तन-मन-धनाने सहकार्य केले.त्या सर्वांना मरता- मरता एकदा भेटून घ्यावं, त्यांचं दृष्टी-दर्शन घ्यावं व त्यांच्याशी प्रेमाने दोन शब्द बोलावं ह्या शुध्द हेतुने ज्येष्ठ शाहीर प्रेमसागर कांबळे यांनी बुलडाणा जिल्ह्यातील तमाम शाहीर लोककलावंत व आश्रयदाते व हितचिंतक यांचा एक बुलडाणा जिल्हास्तरीय स्नेहभेट मेळावा मातृभूमीत मौजे डोंगरखंडाळा,ता.जि.बुलडाणा येथे २९ एप्रिल २०२३ रोजी आयोजित केला होता. सर्वांनी सदरहू स्नेहभेट मेळावा यशस्वी करणेसाठी तन-मन-धनाने सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन देखील त्यांनी केले होते.
मौजे डोंगरखंडाळा गावांत सदैव मोठमोठे शाहीर लोककलावंतांचे मेळावे, ही रात्र शाहीरांची,शाहीर लोककलावंतांचे सत्कार समारंभ इत्यादि अनेक कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित लोककलावंतांचा सन्मान केला. ह्या वेळेला मात्र हा स्नेहभेट मेळावा आयुष्यातला बहुतेक शेवटचाच कार्यक्रम असेल असेही त्यांनी कलावंत व व्हाट्सअपद्वारे पोस्ट केली होती. आणि शेवटी तन-मन-धनाने सहकार्य करण्याची विनंती देखील केली होती. यासाठी ९०११८५८९२३ या व्हाट्सअप वर संपर्क करण्याचे आवाहन देखील ज्येष्ठ शाहीर प्रेमसागर कांबळे यांनी केले होते. अशा या ज्येष्ठ शाहिराचे अखेर २१ ऑगस्ट रोजी रात्री अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यामुळे निश्चितच कलाक्षेत्र दुःख सागरात बुडाले आहे. त्यांचा रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम शुक्रवार, २५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता त्यांच्या मूळ गावी डोंगरखंडाळा येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती त्यांच्या आप्त स्वकीयांकडून मिळाली आहे.