Breaking newsHead linesMaharashtraPolitical NewsPolitics

पुण्यात ‘पवार काका-पुतण्या’ची गुप्त भेट!

– निवडणूक आयोगाकडील सुनावणींसंदर्भात खासगीत चर्चा झाल्याची सूत्राची माहिती!

पुणे (खास प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यात पुण्यातील उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या घरी खासगी भेट झाल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे. काका-पुतण्याने या भेटीबद्दल अधिकृत भाष्य केले नसल्याने या भेटीचा अधिकृत तपशील हाती आला नाही. पुण्यातील कोरेगाव पार्क येथील चोरडिया यांच्या निवासस्थानी जवळपास अर्धातास ही भेट झाल्याचे खात्रीशीर सूत्राने स्पष्ट केले. याभेटीबाबत चोरडिया यांना विचारले असता, त्यांनी अशी भेट झाल्याचे नाकारले.

https://twitter.com/i/status/1690368977015590912

पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. तर, दुसरीकडे साखर उद्योगाच्या दृष्टीने महत्वाची संस्था असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री राजेश टोपे हे पुण्यात होते. याच दरम्यान आज एका कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येणार होते. मात्र अजित पवार यांनी या कार्यक्रमात येण्याचे टाळले. यानंतर पुन्हा उलटसुलट राजकीय चर्चा सुरू असतानाच या दोन्ही नेत्यांच्या भेटीची बातमी पुढे आली. पवार काका-पुतण्यांच्या बैठकीला या दोन्ही नेत्यांसोबत जयंत पाटील हेदेखील उपस्थित असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. मात्र, ज्यांच्या घरी भेट झाल्याची चर्चा आहे त्या अतुल चोरडिया यांनी या भेटीचे वृत्त फेटाळले आहे. चोरडिया यांच्या बंगल्यात झालेल्या बैठकीतून शरद पवार हे बाहेर पडल्यानंतरही जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात चर्चा सुरू होती, अशी माहितीही सूत्रांनी दिली.
पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये लेन नंबर तीन आहे. या परिसरात ७३ नंबरच्या बंगल्यात या दोन्ही नेत्यांची भेट झाल्याचे सांगण्यात येत असून, अजित पवार आज पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यात होते. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते थेट सर्किट हाऊस येथे पोहोचले. त्यांचा ताफा सर्किट हाऊस याच ठिकाणी ठेवून ते खासगी गाडीने कोरेगाव पार्क परिसरात पोहोचले. उद्योगपती चोरडिया यांच्या बंगल्यात शरद पवार उपस्थित असताना अजित पवारही या बंगल्यावर जातानाचे दृश्य एबीपी माझा वृत्तवाहिनीने प्रसारित केली आहेत. काका-पुतण्याच्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना मात्र उधाण आल्याचे दिसून आले आहे.


नेमके काय घडले?
कोरेगाव पार्कमधून अजित पवारांची नेहमीची गाडी बाहेर पडली पण ती रिकामी होती. चोरडिया यांच्या बंगल्यावरून बाहेर पडताना अजित पवार हे दुसर्‍याच एका गाडीमध्ये बसल्याचे दिसून आले. माध्यमांच्या कॅमेरामध्ये येऊ नये यासाठी अजित पवार हे गाडीत पूर्णपणे झोपल्याचे स्पष्ट दिसत होते, पण ही गाडी चोरडिया यांच्या बंगल्याच्या गेटला धडकली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे दुपारी उद्योगपती चोरडिया यांच्या बंगल्यावर होते. त्या ठिकाणी त्यांनी जेवणही केले. शरद पवार यांच्यासोबत जयंत पाटीलही त्या ठिकाणी उपस्थित होते, अशी चर्चा आहे. त्याचवेळी चांदणी चौकातील कार्यक्रम झाल्यानंतर अजित पवार हे सर्किट हाऊसवर न जाता दुसर्‍याच गाडीने चोरडिया यांच्या बंगल्यावर गेले. संध्याकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास शरद पवार हे चोरडिया यांच्या बंगल्यावरून बाहेर पडले. त्याच्यानंतर सव्वासहा ते साडेसहाच्या सुमारास जयंत पाटील हे त्या ठिकाणाहून बाहेर पडल्याचे समोर आले. त्यानंतर ६.४० मिनिटांनी अजित पवार हे या ठिकाणाहून बाहेर पडले. अजित पवार बाहेर पडताना पुढच्या सीटवर होते आणि माध्यमांच्या कॅमेरात न येण्यासाठी ते गाडीतून पूर्णपणे झोपून गेल्याचे कॅमेरात कैद झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!