Breaking newsHead linesMaharashtraMumbaiPachhim MaharashtraPuneWorld update

महाराष्ट्राचा पुरोगामी आधारवड कोसळला; प्रा. हरी नरके यांचे हार्टअ‍ॅटॅकने मुंबईत निधन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) – पुरोगामी चळवळीचे आधारवड तथा ज्येष्ठ विचारवंत, लेखक प्रा. हरी नरके यांचे बुधवारी (दि.९) सकाळी निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यांच्यावर मुंबईतील एशियन हार्ट रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह समता परिषदेचे अध्यक्ष तथा मंत्री छगन भुजबळ, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह सर्वस्तरातील मान्यवरांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. ते सकाळी मुंबईला येत असताना सहा वाजता गाडीत त्यांना दोनवेळा उलट्या झाल्या. त्यानंतर एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती हरी नरके यांचे निकटवर्तीय, जवळचे मित्र, मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.  प्रा.नरके त्यांच्या पश्च्यात पत्नी संगिता, एकुलती एक मुलगी अभिनेत्री प्रमिती नरके असा परिवार आहे. ते पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे येथे वास्तव्यास होते. बालपण अतिशय गरिबीत गेलेल्या प्रा. नरके यांनी स्मशानात काम करून आपले शिक्षण पूर्ण केले होते. प्रा. नरके यांच्या निधनाने त्यांचे कुटुंब प्रचंड खचले आहे. पुण्यातील वैकुंठधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

महाराष्ट्र शासनाने अद्ययावत करून प्रकाशित केलेल्या समग्र महात्मा फुले या हजारपानी ग्रंथाचे संपादन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र वाडःमयाचे २६ खंडाचे संपादन प्रा. नरके यांनी केले होते. तसेच, त्यांनी समता परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून केलेले काम उल्लेखनीय ठरले होते. अभिजात मराठी, ओबीसी आरक्षण, ओबीसी जनगणना, मराठा आरक्षण, शिक्षण, समाजशोध आदी विविध विषयांवरही हरी नरके यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी आतापर्यंत ५६ पुस्तकांचे लेखन आणि संपादन केलेले आहे. ते महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्यदेखील होते. याच आठवड्यात त्यांना ‘जीवनगौरव पुरस्कारा’ने सन्मानीत करण्यात येणार होते. मात्र त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. गेल्या काही दिवसांपासून प्रा. हरी नरके यांची प्रकृती खालावलीच होती. तसेच मागील वर्षभरापासून ते आजारीदेखील होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी लिलावती रुग्णालयात १५-२० दिवस दाखल करण्यात आले होते. त्यानंतर एक-दोन महिन्यापूर्वी राजकोट येथील रुग्णालयात गेले होते. तिथे त्यांची प्रकृती स्थिर झाली होती. यानंतर आज ते मुंबईला येत असताना प्रवासात सहा वाजताच गाडीत त्यांना दोन उलट्या झाल्या. त्यानंतर त्यांना तातडीने एशियन हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांना रुग्णालयातच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

प्रा. हरी नरके यांचा जन्म १ जून १९६३ ला झाला होता. ते महात्मा फुले साहित्याचा अभ्यास आणि संशोधन, व्याख्याते म्हणून सुपरिचित होते. तत्कालीन पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते प्रमुखदेखील होते. महात्मा फुले साहित्य समितीवर त्यांनी काम केले. त्या माध्यमातून महात्मा फुले यांचे साहित्य प्रकाशित करण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. तसेच राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले होते. ‘महात्मा फुले-शोधाच्या नव्या वाटा’ अशा अनेक पुस्तकांचे त्यांनी लेखन केले. त्यांचा महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीशी निकटचा संबंध होता. सामाजिक चळवळींना विचार पुरवायचे काम ते करत होते. महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज यांच्या ग्रंथाचे संपादन त्यांनी केले. महाराष्ट्रातील महापुरूषांच्या जीवितकार्याचे ग्रंथ संपादन करण्याचेदेखील काम त्यांनी केले. राज्य सरकारच्या प्रकाशन विभागाने महापुरुषांचे ग्रंथ प्रकाशित केले होते, त्याचे संपादन नरके यांनी केले होते. याचबरोबर समता परिषदेशी ते जोडले गेले होते. पुण्यातील समता परिषदेकडून दरवर्षी पुरस्कार प्रदान केले जातात, यामध्येदेखील त्यांचा मोठा वाटा होता. परखड आणि स्पष्ट विचारांसाठी ते प्रसिध्द होते. सध्या समाजात घडणार्‍या घटनांवर ते व्यक्त व्हायचे, मत मांडायचे. त्यांच्या निधनामुळे संशोधन, सामाजिक क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. महाराष्ट्राच्या चळवळीचा आधारवड निघून गेल्याने चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!