बुलढाणा (प्रशांत खंडारे) – इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्या क्रांतीकारांना आज 12 वाजताच्या सुमारास येथील हुतात्मा स्मारक येथे बुलढाणेकर मेणबत्ती प्रज्वलित करून अभिवादन करणार आहेत. बुलढाणेकरांमध्ये देशभक्तीची भावना ओतप्रोत असून 15 ऑगस्टला तब्बल 6 लाखांवर घरोघरी राष्ट्रध्वज फडकणार आहेत.
8ऑगस्ट 1942 साली कॉग्रेसच्या मुंबई अधिवेशनात महात्मा गांधींनी ‘भारत छोडो’ आंदोलन सुरु केले. गांधीनी देशाला संबोधताना त्यांच्या भाषणात ‘करो या मरो’ चे आवाहन केले. भारतातील ब्रिटीशांची सत्ता संपवण्यासाठी ही सविनय कायदेभंगाची चळवळ सुरु केली होती. भारत छोडो आंदोलनाची सुरुवात ऑगस्ट महिन्यात झाल्यामुळे याला ‘ऑगस्ट चळवळ’ किंवा ‘ऑगस्ट क्रांती’ असेही म्हणतात. 9 ऑगस्ट 1942 रोजी चळवळीस सुरुवात झाल्यानंतर ब्रिटिश सरकारने महात्मा गांधींसह कॉग्रेसच्या इतर मोठ्या नेत्यांना अटक करुन चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या अटकेनंतर अरुणा असफ अली यांनी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे नेतृत्व केले. हा ऐतिहासिक दिवस लक्षात ठेवण्यासाठी ‘9 ऑगस्ट’ हा ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून साजरा केला जातो. जिल्ह्यातील अनेक सैनिकांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले.
बुलढाण्यातही मध्यरात्री हुतात्मा स्मारकावर मेणबत्ती प्रज्वलित करून स्वातंत्र्यवीरांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. दरम्यान जिल्ह्यात यावर्षीही ‘हर घर तिरंगा’ अभियान 13 ते 15 ऑगस्ट पर्यंत राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत बुलढाणा जिल्ह्यात 6 लाखांवर राष्ट्रध्वज फडकणार आहेत. या अभियानामध्ये प्रत्येक नागरिकांनी सहभाग घ्यावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. आजपासूनच जिल्हा मुख्यालय, तालुका स्थळे, गाव तांड्यापर्यंत राष्ट्रभक्तीचे उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. उद्यापासून यत्र, तत्र,सर्वत्र राष्ट्र प्रेमाची लाट उसळणार आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत राबविण्यात येणारा ‘हर घर तिरंगा’ उपक्रम नव्हे तर उत्सव शासकीय, निम शासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी,नेतेमंडळी, लाखो सामान्य जनता एक दिलाने एकत्रित येऊन मोठ्या जल्लोषात साजरा करणार आहेत.
राष्ट्र प्रेमाची उसळणार लाट
सुमारे 25 लाखावर लोकसंख्या असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागात 5 लाख 1125 तर नागरी भागात 1 लाख 13 हजार 252 घरे आहेत. यामुळे एकूण 6 लाख 14 हजार 377 घरांवर राष्ट्रध्वज दिमाखात फडकणार आहे. गेल्या वर्षी प्रत्येक घरांवर राष्ट्रध्वज फडकला होता आणि राष्ट्रप्रेम मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले होते. यावर्षी देखील गतवर्षाच्या तुलनेत अधिक प्रमाणात प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकणार असून देशभक्तीची लाट उसळणार आहे.
जिल्हाधिकारी काय म्हणतात?
यावर्षी ‘ हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वज यांचा अवमान होणार नाही, यासाठी ध्वजसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवावा. तिरंग्यासोबत सेल्फी काढून harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करावेत. घरोघरी तिरंगा फडकविताना ध्वजसंहितेचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. एच.पी.तूम्मोड यांनी केले आहे.