स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फुट अटळ; शिस्तपालन समितीसमोर हजर होण्यास रविकांत तुपकरांचा नकार!
– राजू शेट्टींना सर्वकाही सांगितलेलं आहे, त्यांनी आता निर्णय घ्यावा, तुपकरांनी चेंडू शेट्टींच्या कोर्टात टोलावला!
– पक्ष आणि संघटना फोडण्याचे पाप भाजपचे, तुपकरांमागे भाजप?; राजू शेट्टी यांना संशय
बुलढाणा/पुणे (जिल्हा प्रतिनिधी) – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर नाराजी व्यक्त करत, टिकेची झोड उठविणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना आज (दि.८) पुण्यात शिस्तपालन समितीसमोर हजर होण्याचे फर्मान सोडण्यात आले होते. तसे लेखी पत्रच शिस्तपालन समितीचे अध्यक्ष प्रा.डॉ. प्रकाश पोपळे यांनी ४ ऑगस्टरोजीच तुपकरांना पाठवले होते. परंतु, या शिस्तपालन समितीसमोर हजर होण्यास तुपकरांनी नकार दिला असून, तशी माहिती पत्रकार परिषदेद्वारे दिली आहे. संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना सर्वकाही माहिती आहे. त्यांना सर्व सांगण्यात आलेले आहे. त्यांनी आता निर्णय घ्यावा, असे ठणकावून सांगत, आपण कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नाही. शेतकरी हा आपला आत्मा असून, शेवटच्या श्वासापर्यंत संघटनेत राहूनच शेतकर्यांसाठी लढत राहू, असा निर्णय तुपकर यांनी यावेळी जाहीर केला. त्यामुळे पुण्यातील आजच्या शिस्तपालन समितीच्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर शेट्टी व तुपकर यांच्यातून सद्या विस्तवही जात नसल्याची परिस्थिती असल्याने संघटनेत फुट अटळ असल्याचे मत शेतकरी चळवळीच्या जाणकारांनी व्यक्त केलेले आहे. दरम्यान, राजू शेट्टी यांनीही आपली प्रतिक्रिया दिली असून, आजच्या बैठकीला रविकांत तुपकर यांना निमंत्रण देण्यात आले आहे. बैठकीसमोर येऊन तुपकरांनी आपले म्हणणे मांडावे, असे ते म्हणालेत. पक्ष आणि संघटना फोडण्याचे अधिकृत काम भाजपचे आहे. स्वाभिमानी संघटनेत जे घडतंय यामागेसुद्धा भाजप असल्याचा संशय आहे. कारण भाजपकडून त्यांना ऑफर दिली जाते, निश्चितच संशयाला जागा आहे, असा गंभीर आरोपही राजू शेट्टी यांनी केला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर मागच्या काही दिवसांपासून नाराज असल्याची आणि ते संघटनेतून बाहेर पडणार असल्याची चर्चा रंगलेली आहे. यासर्व पृष्ठभूमीवर तुपकर यांनी बुलढाण्यात पत्रकार परिषद घेत, आपली भूमिका जाहीर केली. मी वारंवार तुम्हाला हा विषय सांगितला आहे. माझी नाराजी बोलून दाखवली आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. त्यामुळे आता निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, असे तुपकर यांनी यावेळी राजू शेट्टी यांना उद्देशून सांगितले. तसेच, मी या पक्षात जाणार त्या पक्षात जाणार या केवळ अफवा आहेत. मला संघटनेत राहूनच काम करायचे आहे. शेतकर्यांचे प्रश्न मांडायचे आहेत. शेतकर्यांसाठी लढायचे आहे. माझ्यासाठी शेतकरी हा माझा आत्मा आहे. शेतकरी हा माझा प्राण आहे. त्यामुळे मी त्यांच्याचसाठी काम करत राहणार. माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मला शेतकर्यांसाठी काम करायचे असून, त्यांच्यासाठी लढायचे आहे. त्यामुळे त्यासाठी मी आजपासूनच कामाला लागलो आहे, असेही तुपकरांनी जाहीर केले.
मला शेतकर्यांसाठी लढायचंय, महाराष्ट्राभरात तरुणांची फौज उभी करायचीय. राजू शेट्टी यांना मी वारंवार या सगळ्या गोष्टींची कल्पना दिली आहे. कार्यकर्त्यांची नाराजी त्यांच्या कानावर घातली आहे. त्यामुळे त्यांनी आता याबाबत निर्णय करावा. शेवटी माझी नाराजी ही वैयक्तिक स्वार्थासाठी नाहीये. तर संघटनेच्या हितासाठी, वाढीसाठी मी या बाबी त्यांना कल्पना दिली आहे.
– रविकांत तुपकर, शेतकरी नेते
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची शिस्तपालन आणि कोर कमिटीची पुण्यात आज बैठक होत आहे. या बैठकीत रविकांत तुपकर यांच्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. मात्र रविकांत तुपकर बैठकीला जाणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. या बैठकीत तुपकरांबद्दल काय निर्णय होतो, याकडे सर्व शेतकरी कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, आपण दुसर्या पक्षात जाणार या अफवा आहेत, असे रविकांत तुपकर यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, आज बैठकीत काय निर्णय होतो, हे पाहून पुढील भूमिका ठरवू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
राजू शेट्टींची विनंती – बैठकीला या!
दरम्यान, रविकांत तुपकर यांनी यांनी आजच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीला यावे, अशी विनंती राजू शेट्टी यांनी केली आहे. कार्यपद्धतीवर जी काही नाराजी असेल, ते बैठकीत सांगावे, त्यावर निर्णय घेतला जाईल, असे राजू शेट्टी यांनी सांगून, पक्ष व संघटना फोडण्याचे पाप हे भाजपचे आहे. ज्या पद्धतीने तुपकरांना भाजपकडून ऑफर दिली जात आहे, ते पाहाता तुपकरांच्या मागे भाजप असल्याचा संशय येतो आहे, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केलेले आहे.
नेमका अहंकार कुणाला?; तुपकरांना की शेट्टींना?
राजू शेट्टी म्हणाले, ‘आजची बैठक रविकांत तुपकर यांनी उपस्थित केलेल्या तक्रारीबद्दल बोलावण्यात आली आहे. तुपकरांनी संघटनेच्या कोणत्याही पदाधिकार्याकडे किंवा माझ्याकडे नाराजी व्यक्त केली नाही. मी माध्यमाच्याद्वारे सर्व ऐकत आहे. बैठकीत येऊन तुपकर यांनी आपले मत मांडायला हवे. माझ्या कार्यपद्धतीबद्दल आक्षेप असतील तर, मी समितीच्या बैठकीत असताना किंवा नसताना भूमिका मांडता येते.’ त्यावर रविकांत तुपकर यांनी म्हटले, ‘मी ४-५ वर्षापासून हे सर्व विषय राजू शेट्टी यांच्याकडे मांडले आहेत. शिस्तपालन समितीचे अध्यक्ष प्राध्यापक पोकळे यांच्याकडेही माझे मत मांडले आहे. सोमवारी (७ जुलै) माझे मत पुन्हा एकदा प्राध्यापक पोकळे यांच्याकडे मांडले आणि समितीच्या बैठकीला येऊ शकत नाही, असे सांगितलं.’ यावर राजू शेट्टी यांनी सांगितले, ‘संघटनेच्या अंतर्गत समिती आहे. त्या समितीच्या समोर येणार नाही, हा अहंकार बरोबर नाही. मी स्वत: समितीच्या समोर येण्यास तयार आहे. माझ्याबद्दल आक्षेप असतील, तर मी समितीच्या बैठकीला येणार नाही, असेही ते म्हणाले.’ यावर रविकांत तुपकर म्हणाले, ‘मी अजिबात अहंकारी माणूस नाही आहे. मी जमिनीवर काम करणारा कार्यकर्ता आहे. अशा बैठका अनेकदा झाल्या आहेत. समितीच्या सदस्यांकडे अनेकदा माझे मत मांडले आहे. माझ्या मताची दखल घेतली असती, तर पदाधिकार्यांच्या बैठकीत बोललो नसतो. बैठकीला आलो नाही, म्हणजे अहंकारी आहे, असे होत नाही.’