Head linesMEHAKARVidharbha

लाईनमनच्या आशीर्वादाने जानेफळात खुलेआम आकडे टाकून वीजचोरी!

– ‘महावितरण’च्या अधिकार्‍यांनी डोळ्यावर ओढली गेंड्याची कातडी!

मेहकर (अनिल मंजुळकर) – तालुक्यातील जानेफळ येथे मुख्य रस्त्यावर असलेला वीजेच्या तारांवर आकडा टाकून गेल्या सहा महिन्यांपासून जानेफळ येथील मोठे व्यापारी आपल्या इमारतीचे बांधकाम करत असताना, खुलेआम तारांवर आकडे टाकून वीजचोरी करत आहेत. ही धक्कादायक बाब स्थानिक नागरिकांनी लाईनमनच्या निदर्शनास आणून दिली असता, या लाईनमनने अर्थपूर्ण व्यवहारातून या धक्कादायक प्रकाराकडे कानाडोळा चालवला आहे. तसचे, महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्याही निदर्शनास आणून दिले असता, त्यांना मलिदा जात असल्याने त्यांनीही डोळ्यावर गेंड्याची कातडी ओढून दुर्लक्ष चालवले आहे. सर्वसामान्य माणूस किंवा शेतकरी यांनी चुकून जरी आकडा टाकला तर सर्रास वीजचोरीचे गुन्हे दाखल करून दंड उकळला जातो. तसेच, त्यांच्यावर खटले भरले जातात. परंतु, हा व्यापारी सहा महिन्यांपासून लाखो रुपयांची वीज चोरी करत असताना, त्याला पाठीशी का घातले जात आहे? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.

गेले सहा महिने हा व्यापारी तारांवर आकडे टाकून वीजचोरी करत आहे. ही बाब अनेकदा स्थानिकांच्या लक्षात आली, त्यातील काहींनी याबाबत लाईनमनलादेखील कळवले. हा लाईनमन व संबंधित महावितरण कंपनीचे कर्मचारी हे अर्थपूर्ण बाबीतून या चोरीकडे दुर्लक्ष करत आले आहेत. पत्रकारांनी या संदर्भातील फोटो आणि व्हिडिओ शूटिंग करून संबंधित कर्मचारी तथा अधिकारी यांना याबाबत माहिती दिली होती. तरीसुद्धा या अधिकार्‍यांनी, सांगतो-बोलतो अशा प्रकारची उडवाउडवीची उत्तरे देऊन कारवाईस टाळाटाळ चालवली आहे. त्यामुळे गोरगरिबांना एक न्याय अन् या पैशावाल्या व्यापार्‍याला वेगळा न्याय, असे का? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. तरी, महावितरणच्या वरिष्ठांनी हा वीजचोरी करणारा व्यापारी व संबंधित लाईनमन, तसेच अधिकारी यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करावी, व या व्यापार्‍याकडून सहा महिन्यांपासूनचा वीज चोरीपोटीचा दंड वसूल करून घ्यावा, त्याच्यावर वीजचोरीचे गुन्हेही दाखल करावेत, अशी मागणी पुढे आली आहे. दुसरे असे, की इतकी खुलेआम वीजचोरी करण्याचे धाडस दाखविणारा हा व्यापारी कुणाच्या जोरावर महावितरणला चुना लावत आहे? असादेखील सवाल निर्माण झाला असून, त्याच्या पाठीमागे कुणाचा हात आहे? याचीही चौकशी महावितरणने आपल्या दक्षता पथकामार्फत करण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!