बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – आगामी निवडणुका पाहाता पक्षबांधणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट कामाला लागले असून, पक्षाच्या जिल्हाध्यक्षा रेखाताई खेडेकर व अजित पवार गटाचे नेते आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पक्ष संघटनेचा आढावा व नवीन कार्यकारिणी गठीत करण्यासाठी बैठका लावल्या आहेत. सौ. रेखाताई खेडेकर यांनी तर आज मोताळा, मलकापूर, नांदुरा या तालुक्यांत घणाघाती दौरा करून पक्षाचा आढावा घेतला. तसेच, निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आदेश कार्यकर्ते व पदाधिकारी यांना दिलेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची पहिली बैठक मंगळवारी (दि. ८) होऊ घातली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यावर होणारी ही पहिलीच बैठक असून, जिल्ह्यातील प्रभावी नेते व एकमेव आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी ही बैठक बोलावलेली आहे. जिल्हा बँकेच्या मुद्यावरून अजितदादांसोबत जाण्याचा निर्णय डॉ. शिंगणे यांनी घेतला असला तरी, त्यांच्यासोबत इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मात्र गेलेले नाहीत. बहुतांश पदाधिकारी व कार्यकर्ते शरद पवारांसोबत आहेत. त्यामुळे डॉ. शिंगणे यांनी बोलावलेल्या बैठकीला कोणते पदाधिकारी व कार्यकर्ते हजर राहणार आहेत, याकडे सर्वांच्या लक्ष लागलेले आहे. या गटाची पहिली बैठक बुलढाण्यात ८ ऑगस्टला जिल्हा राष्ट्रवादी भवनात दुपारी एक वाजता बोलावण्यात आलेली आहे. यावेळी जिल्हा प्रभारी असलेले डॉ. राजेंद्र शिंगणे हे मुख्य मार्गदर्शन करणार आहेत. अजितदादांच्या अभिनंदनाचा ठराव, जिल्हा कार्यकारिणीचे गठन, शपथपत्र अभियान हे बैठकीचे मुख्य विषय असल्याचे सांगण्यात आले.
दुसरीकडे, पक्षाच्या जिल्हाध्यक्षा सौ. रेखाताई पुरूषोत्तम खेडेकर यांनी परवाच जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेऊन पक्ष संघटनेची पुनर्बांधणी करण्याचे सूतोवाच केले होते. त्यादृष्टीकोनातून त्या जिल्हा दौर्यावर बाहेर पडल्या आहेत. पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी त्यांनी आज (दि.६) मोताळा, मलकापूर, नांदुरा तालुक्याचा दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रसेनजीतदादा पाटील व नरेश शेळके यांचीदेखील उपस्थिती होती. या नेत्यांनी या तीनही तालुक्यांत पक्ष संघटनेचा आढावा घेतला, व पुढील काळातील निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे निर्देश कार्यकर्ते व पदाधिकारी यांना दिलेत. लवकरच जिल्हा कार्यकारिणीचे पुनर्गठण करण्यात येणार असून, तालुका कार्यकारिण्यांमध्येही अनेकांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
————