‘सोनाली’ परतल्याने उजळला सोनियाचा दिस, ‘रेखा’ची बदलली भाग्यरेखा; त्या मातेला ‘प्रभू’चे ८ महिन्यानंतर दर्शन!
बुलढाणा (प्रशांत खंडारे) – राज्यात मनोरुग्णांची संख्या मोठी आहे, परंतु बोटावर मोजण्याइतक्या सामाजिक संस्था त्यांचा सांभाळ करतात. शासकीय यंत्रणाही मनोरुग्णांची जबाबदारी निश्चितच पार पडते. वरवंड येथील दिव्य फाउंडेशन संस्थादेखील समाजसेवेचा वसा घेऊन मनोयात्रींचा प्रवास सुखकारक करीत आहे. नुकतेच दिव्य सेवा प्रकल्पातील बरे झालेले तीन मनोरुग्ण सोलापूरची सोनाली, लातूरची रेखा आणि मलकापूरच्या प्रभूला त्यांच्या स्वगृही पोहविण्यात आले. यावेळी त्यांना पाहताच कुटुंबीयांचे अक्षरशा आनंदाश्रू अनावर झाले होते.
बुलढाणा लगत असलेल्या वरवंड येथील दिव्य सेवा प्रकल्पात सद्यस्थितीत ९१ मनोरुग्ण दाखल आहेत. त्यापैकी तीन मनोरुग्णांची प्रकृती ठीक झाल्याने आणि त्यांनी राहत असलेल्या मूळ गावाचा पत्ता दिल्याने कायदेशीर बाबींची पूर्तता करून त्यांना स्वगृही पोहोचते करण्यात आले. सोलापूरची सोनाली चार वर्षापासून मनोवस्था बिघडल्यामुळे कुटुंबापासून दुरावली होती. कुटुंबाला तिचा थांगपत्ता नव्हता. सोनाली मात्र दिव्य सेवा प्रकल्पात गेल्या एक वर्षापासून उपचार घेत होती. योग्य उपचारामुळे तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने तिला तिच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आल्याने सोनालीचे मुले, वडील,भाऊ, वहिनी यांच्यासाठी सोनियाचा दिवसच उजळला. ज्या लातूरच्या रेखाची भाग्यरेखा बदलली तीला लातूर जिल्ह्यातील मुरुड पोलीस स्टेशनच्या कर्मचार्यांनी व समाजकार्यकर्ते राहुल पाटील, सय्यद मुस्तफा, आशिष गायकवाड यांनी दिव्या फाउंडेशनला माहिती कळविली होती. या माहितीवरून रेखाला दिव्य सेवा प्रकल्पात लातूर येथून आणून दाखल करून घेण्यात आले होते. रेखाला ५ महिन्यांचा अवधी मानसिक प्रकृती ठीक होण्यासाठी लागला.
विशेष म्हणजे, तिची ७ वर्षापासून मनस्थिती ठीक नव्हती. विचित्र वागण्यामुळे घरातले लोक वैतागले असताना तीही अचानक निघून गेली होती. दरम्यान, रेखा बेपत्ता झाल्याची तक्रार कर्नाटक येथील बेळगाव शहापूर येथे दाखल करण्यात आली होती. दरम्यान ठीक झालेली रेखा कुटुंबात पोहचल्यामुळे तिचा साडेसहा वर्षाचा मुलगा, दोन मुली सासू-सासरे नवरा, आई, वडील,भाऊ, मामा अशा आप्त परिवाराच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. यावेळी हसायचे की रडायचे या मनोवस्थेत कुटुंब दिसून आले.वाशिम येथील प्रभूजी ८ महिन्यांपासून दिव्य सेवा प्रकल्पात उपचार घेत होते. त्यांना मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल करण्यात आले होते. मुलगा बेपत्ता असल्याने तो जिवंत आहे किंवा नाही, अशा विवांचनेत जगणार्या त्यांच्या आईसमोर मनस्थितीत सुधारणा झालेल्या प्रभूला पाहून तिला अश्रू आवरता आले नव्हते.
कर्तव्यपूर्तीतच खरा आनंद…
परिसरात रस्त्यावर फिरणारे, भीक मागणारे, मनोरुग्ण पाहतो. अनेकदा आपण त्यांना पाहून नाक मुरडतो कारण त्यांच्या अंगाचा वास येतो त्यांच्या अनेक समस्या असल्यामुळे आपण त्यांच्या जवळ जात नाही. मात्र या मनोरुग्ण, कचर्याच्या ढिगार्यात रहाणार्या, रस्त्यावर झोपणार्या अशा माणसांसाठी काम करण्यात खरा आनंद आहे. त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्याशी गप्पा माराव्या. त्यांच्यासाठी कुठल्याही गोष्टीची किळस न करता त्यांचं सुख दुःख जाणून घ्यावे. त्यांचे दुःख समजून घेऊन त्यांना मदत करून त्यांचा सांभाळ करावा.
– अशोक काकडे, संस्थापक अध्यक्ष, दिव्या फाउंडेशन बुलढाणा
सेवाकार्याला पाहून जिल्हाधिकारी ठाकूर आनंदल्या!
बर्या झालेल्या मनोरुग्ण रेखा हिला लातूर येथे पोहोचवीत असताना, लातूरच्या जिल्हाधिकारी वैशाली ठाकूर यांची भेट झाली. दरम्यान दिव्य सेवा प्रकल्पाची दिव्य सेवा जाणून घेत असताना, जिल्हाधिकारी ठाकूर म्हणाल्या की, आपली सेवा पाहून माझी सकाळ खूप गोड झाली. लातूरचा रुग्ण आपण बरा करून त्यांच्या घरापर्यंत पोहोचविला ही अभिमानास्पद बाब आहे. मानवी दृष्टीकोन, अनेक लोकांपर्यंत पोहोचण्याची व्यापक क्षमता आणि सेवाभावी वृत्ती ही या संस्थेची वैशिष्ट्य प्रेरणादायी आहे. शासन दरबारी या संस्थेच्या मदतकार्यासाठी काहीतरी प्रयत्न करू, असेही त्यांनी आश्वासित केले.