Head linesMEHAKARVidharbha

‘मुख्यमंत्री येता घरी, रंगरंगोटी जोर धरी; घाणीचे उकिरडे साचले दारोदारी!’

– शहरात साचलेल्या घाणीकडे तोंड फिरवून शहरात रंगरंगोटी, दिखावूपणा जोरात!

मेहकर (अनिल मंजुळकर) – मेहकर येथे ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या जनजागृतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या दोन उपमुख्यमंत्र्यांना घेऊन मेहकरला येणार असल्याने मेहकर नगरपालिकेने आपले रुपडे बदलायला सुरवात केली आहे. त्यासाठी शहरात ठीकठिकाणी रंगरंगोटी करण्यात येत आहे. मात्र आनंदाच्या भरात नगरपरिषदेच्या अधिकार्‍यांना जराही भान राहिलेले दिसत नाही. रंगरंगोटी करण्यासाठी अत्यावश्यक सेवेचे वाहन असलेल्या अग्निशमन गाड्यांचाच वापर ते करत आहेत. मेहकर नगरपालिकेत प्रशासकराज आल्यापासून शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मात्र याकडे अधिकारी कानाडोळा करीत असून, मुख्यमंत्र्यांना खूश करण्यासाठी वरकरणी सजावट करण्यासाठी जोरदार धडपड मात्र सुरू आहे. या दिखावू रंगरंगोटीसोबतच शहरातील घाण साफ झाली असती तर खर्‍याअर्थाने मुख्यमंत्र्यांचा मेहकरला येण्याचा उद्देश सफल झाला असता, अशी जोरदार चर्चा सद्या शहरात रंगली आहे.

मेहकर शहरात सध्या प्रशासकराज सुरु आहे. पूर्वी तरी राजकारण आडवे येत असल्याने विकास कामे होत नव्हती, किंवा अधिकारी राजकारण्यांना पुढे करुन आपली घोंगडी झटकून मोकळे होत होते. प्रशासकराज आल्याने काही बरे होईल असे शहरातील जनतेला वाटत असतांना मेहकरमध्ये कित्येक ठिकाणी कचरा साचलेला आहे, तर नगरपालिकेच्या आवारातच अघोषित मुत्री आहे; अशात नगरपालिकेच्या आवारात उग्रवास येतो; तर दुसरीकडे शहरात कित्येक ठिकाणी घाण साचलेली आहे. मुत्रीघरात जाणे म्हणजे एक शिक्षा, असे होऊन बनलेले असताना अशात मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री मेहकर येथे येणार असल्याने नगरपालिकेने रंगरंगोटी करायला सुरवात केली. कित्येक वर्षांपासून नगरपरिषदेचा फलक गंजाटलेला होता, दुसरीकडे अग्निशमन वाहनाचा उपयोग करुन नगरपालिका प्रशासनाने आपल्या या फलकाची रंगरंगोटी करून घेतली. तसेच, इतरत्रही या वाहनांचा वापर सुरू आहे. अशाच प्रकारे जर शहरात ठीकठिकाणी साचलेले कचर्‍याचे मोठे मोठे ढीग जर नगरपालिका प्रशासनास दिसून आले असते व त्याचीही त्यांनी साफसफाई केली असती, तर मुख्यमंत्री हे मेहकरला येण्याचे सार्थक झाले असते.


मेहकर नगरपालिका तसेच प्रशासन हे मुख्यमंत्री ज्या ज्या ठिकाणी जातील आणि त्यांची नजर पडेल, अशा ठिकाणाला चकाचक करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मेहकर येथे येऊन मुख्यमंत्री हे ‘प्रशासन आपल्या दारी’ हे अभियान जनमाणसात पोहोचवण्याचा प्रयत्न करीत असतांनाच, मेहकर शहरात मात्र कित्येक ठिकाणी कचर्‍याचे ढीग असून, नगरपालिका प्रशासन त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा जनमानसात सुरु आहे. ‘शासन आपल्या दारी’तून तरी मेहकर शहरात साफसफाई होणार का? असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झालेला आहे.
————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!