रविकांत तुपकरांची ‘संघटनेतून हकालपट्टी’ हे जिल्ह्यातील कोणत्या नेत्याचे षडयंत्र?
– राजू शेट्टी-रविकांत तुपकर हा वाद ‘मोठ्या राजकीय षडयंत्रा’चा भाग!
बुलढाणा/मुंबई (पुरूषोत्तम सांगळे) – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आक्रमक चेहरा व लोकप्रिय नेते असलेले रविकांत तुपकर यांची लोकसभा निवडणुकीआधीच संघटनेतून हकालपट्टी करण्यासाठी ‘जिल्ह्यातील एक मोठा नेता’ कामाला लागला असून, राजू शेट्टीविरूद्ध रविकांत तुपकर यांच्यातील सद्याच्या संघर्षाला या नेत्याचे नियोजनबद्ध षडयंत्रच कारणीभूत असल्याचे पुढे येत आहे. या नेत्याने लावलेल्या सापळ्यात तुपकर हे अलगद अडकत चाललेले असून, पक्षनेतृत्वाविरुद्ध बंड केल्यामुळे त्यांची संघटनेतून ‘हकालपट्टीची स्क्रीप्ट’ लिहिल्या गेलेली आहे. कदाचित, परवाच्या किंवा नंतरच्या ‘स्वाभिमानी’च्या शिस्तपालन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेतला जाईल. या हकालपट्टीसाठी जिल्ह्यातील नेत्याने राजू शेट्टी यांच्यासोबत असलेली आपली ‘संसदेतील मैत्री’ पणाला लावली असल्याची अगदी खात्रीशीर सूत्राकडूनची माहिती प्राप्त झाली आहे. घाटाखालील एका सामान्य कार्यकर्त्याला तुपकरांसारख्या राज्यस्तरीय नेत्यावर भिडवून तुपकरांचे मानसिक व संघटनात्मक खच्चीकरण करण्याचा हा डाव असून, तूर्ततरी हा डाव तुपकरांच्या लक्षात आलेला दिसत नाही.
रविकांत तुपकर हे बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी शड्ग ठोकून उभे ठाकलेले आहेत. जिल्ह्यातील सद्याची राजकीय समिकरणे काहीही असली तरी, जिल्ह्यातील विद्यमान नेतृत्वाविरुद्ध रविकांत तुपकर असाच सरळसरळ सामना होणार आहे. त्यामुळे रविकांत तुपकरांना मानसिक व राजकीयदृष्ट्या नामोहरम करण्यासाठी एका मोठ्या षडयंत्राची स्क्रीप्ट लिहिली गेली असून, त्यानुसार नियोजनबद्धरित्या आखलेल्या षडयंत्रात रविकांत तुपकर हे अलगद अडकत चालेले आहेत. तुपकर हे तरूण व आक्रमक नेते आहेत. चटकन गरम होणे हा त्यांचा स्वभाव आहे. अशी ‘गरम डोक्याची माणसे शांत डोक्याने रचलेल्या सापळ्यात अलगद अडकतच असतात’. आताही अगदी तसेच झालेले आहे. घाटाखालील एका सामान्य कार्यकर्त्याला थेट तुपकरांवर सोडले तर तुपकर गरम होतील, हे गृहीत धरूनच हे षडयंत्र रचले गेले आहे. झालेही तसेच; पूरग्रस्तांच्या मोर्चावरून तुपकर भडकले, थेट राजू शेट्टीवर खवळले, आणि मनात असलेली सर्व खदखद त्यांनी बाहेर काढली. रविकांत तुपकर हे मराठा-बहुजनातील नेतृत्व आहे. केवळ बुलढाणा जिल्ह्यातच नाही तर राज्य पातळीवर सद्या ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा चेहरा आहे. आपल्यापेक्षा इतर कुणी नेता मोठा होत असेल तर ते राजू शेट्टी यांना चालत नाही. त्यामुळे अ-मराठा असलेल्या शेट्टी यांना तुपकरांचे पंख छाटायचेच होते?, शेट्टींच्या या इराद्यांना जिल्ह्यातील एका नेत्याने संसदेतील मैत्रीच्या सहाय्याने खतपाणी घातले. आणि, त्यानंतर तुपकरांच्या खच्चीकरणाची आणि नामोहरम करून राजकीयदृष्ट्या उद््ध्वस्त करण्याची एक भलीमोठी स्क्रीप्ट लिहिली गेली असल्याचे खात्रीशीर सूत्राने विस्ताराने स्पष्ट केले आहे.
तेव्हा, रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी व जिल्ह्यातील या नेत्याच्या जाळ्यात न अडकता, बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर आपले लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. सद्या या लोकसभा मतदारसंघात तुपकर यांची जोरदार लाट असून, ही लाट मतांत परिवर्तीत होणारी आहे. शिवाय, तुपकरांना सर्वच राजकीय पक्षांची दारे खुली आहेत. जो घाटाखालील कार्यकर्ता तुपकरांना आव्हान देण्यासाठी बेंडकीसारखा फुगविला जात आहे, त्याला त्याच्या तालुक्याबाहेरच जिल्ह्यात कुणीही ओळखत नाही. त्यामुळे संघटनेअंतर्गत संघर्षात आपला वेळ, मानसिकता, प्रतिष्ठा, बुद्धी आणि कार्यकर्त्यांची शक्ती खर्च करण्यापेक्षा रविकांत तुपकरांनी मतदारसंघाची बांधणी व शेतकर्यांच्या प्रश्नांवर आपले लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे.
जिल्ह्यातील शेतकर्यांना अद्यापही शेतीपिकांची नुकसान भरपाई मिळालेली नाही. पूरग्रस्तांना मदतही मिळाली नाही. पीकविमा नुकसानीचे पैसेही मिळालेले नाहीत. गेल्या पंधरा वर्षांत जिल्ह्याच्या विकासाचा भलामोठा अनुशेष निर्माण झालेला आहे. जिल्ह्यातील कुणबी, ओबीसी, मागासवर्गीय अशा सर्वच समाजाची मुले नोकरी, रोजगारासाठी जालना, छत्रपती संभाजीनगर, पुणे-मुंबईकडे भटकत आहे. शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय झाला असून, सर्वच शेतकरी कर्जबाजारी होऊन मरणाच्या दारावर पोहोचलेले आहेत. संपूर्ण कर्जमाफी ही काळाची गरज बनलेली आहे. जिल्ह्याला विकासाच्या मार्गावर नेण्यात नेतृत्व कमी पडले असून, बेरोजगारी, औद्योगिक विकास, आणि पाणीप्रश्न या समस्या गंभीर आहेत. या मुद्द्यांवर रविकांत तुपकरांनी लोकांसमोर जाणे अपेक्षित आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हातच काय; पण विदर्भ व मराठवाड्यातही काहीच अस्तित्व नाही. जी काही संघटना सक्रीय दिसते, ती रविकांत तुपकर यांच्यामुळे आहे. त्यामुळे उद्या तुपकरांची संघटनेतून हकालपट्टी झाली तरी, तुपकरांवर फारसा काही परिणाम होणार नाही. शिवाय, संघटना काही शेट्टी यांची खासगी मालमत्ता नाही. त्यामुळे तुपकरांनी राजू शेट्टी यांच्या षडयंत्रात न अडकता आपल्या मतदारसंघावर व शेतकरीप्रश्नांवर लक्ष केंद्रीत करणे केव्हाही सोयीस्कर राहील.
————–