उमेश कोल्हे हत्याप्रकरणातील आरोपी इरफान खान राणा दाम्पत्याचा कार्यकर्ता?
– भाजपा व अतिरेक्यांचे संबंध; राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक: डॉ. अजोय कुमार
– ढोंगी राष्ट्रवादाच्या नावाखाली भाजपा रक्तरंजित कारवायांमध्ये सक्रीय
मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – भारतीय जनता पक्ष ढोंगी राष्ट्रवादाच्या नावाखाली देशातील वातावरण रक्तरंजित करत असून, अनेक घातपाती कारवाया व अतिरेकी कारवायांत सापडलेले आरोपी व भाजपाचे घनिष्ठ संबंध उघड झाले आहेत. पुलवामा घटना, उदयपूरमधील कन्हैयालाची हत्या, आसाममध्ये अतिरेक्यांना टेटर फंडिग करणारा निरंजन होजाई, या सर्व प्रकरणातील मुख्य आरोपींचे भाजपाशी संबंध उघड झाले असून भाजपाच्या ढोंगी राष्ट्रवादाचा बुरखा फाटला आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. अजयकुमार यांनी केली आहे. तर प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यावेळी म्हणाले की, अमरावतीमध्ये व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या इरफान खान याने खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या निवडणुक प्रचारात भाग घेतला होता. राणा दाम्पत्य व भाजपाचे संबंध लपून राहिलेले नाहीत.
गांधी भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते व सिक्कीम, त्रिपुरा व नागालँडचे प्रभारी डॉ. अजयकुमार यांनी भारतीय जनता पक्षाच्या ढोंगी राष्ट्रवादाची पोलखोल केली. देशात घडलेल्या काही घातपाती कारवाया व अतिरेकी कारवायांशी भाजपाचा कसा संबंध आहे हे त्यांनी उघड केले. डॉ. अजयकुमार पुढे म्हणाले की, उदयपूर येथे कन्हैयालाल हत्येतील आरोपी मोहम्मद अटारी भाजपाचा कार्यकर्ता निघाला. भाजपा नेता गुलाबचंद कटारिया यांच्या जावयाच्या कंपनीत तो कामाला होता. भाजपाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांसोबत त्याचे घनिष्ठ संबंध असल्याचे उघड झाले आहे. जम्मू – काश्मीरमध्ये पकडण्यात आलेल्या लष्कर ए तैयबाच्या दोन अतिरेक्यांपैकी एक तालिब हुसेन शाह भाजपाचा पदाधिकारी निघाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर त्याचे फोटोही सार्वजनिक झाले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये २०२० साली अतिरेक्यांना शस्त्रांचा पुरवठा करण्याच्या आरोपाखाली भाजपाच्या नेता व सरपंच तारिक अहमद मीर याला अटक करण्यात आली होती.
मध्य प्रदेश मध्ये २०१९ साली टेटर फंडिंगच्या प्रकरणात बजरंग दलाचा कार्यकर्ता बलराम सिंहला अटक करण्यात आली तर २०१७ साली अवैध टेलिफोन एक्सचेंज प्रकरणी अटक केलेल्यांमध्ये भाजपाच्या आयटी सेलच्या ध्रुव सक्सेनाचे पाकिस्तानच्या आयएसआयशी संबंध उघड झाले. अतिरेकी मसूद अजहरचा समर्थक मोहम्मद फारुख खानला भाजपाने श्रीनगरमधून स्थानिक निवडणुकीत उमेदवारी दिली होती. जम्मू काश्मीरमधून दोन अतिरेक्यांना दिल्लीपर्यंत पोहचवताना जम्मू काश्मीरचा डीवायएसपी देवेंद्र सिंह याला अटक करण्यात आली. या प्रकरणी चौकशी करू नका ते राष्ट्रीय सुरक्षेच्या हिताचे नाही असे तत्कालीन नायब राज्यपाल यांनी पत्र लिहिले होते. हा देवेंद्र सिंह आता कुठे आहे? हाच देवेंद्रसिंह पुलवामा घटनेवेळी त्या परिसरात होता. पुलवामा घटनेत वापरलेले २०० किलो आरडीएक्स आले कुठुन याचा अजून शोध लागला नाही.
संसदेवरील हल्ला, पुलवामा हल्ला, २००८ मधील मुंबईवरील हल्ला अशा प्रमुख हल्ल्याचा मास्टर माइंड अतिरेकी मसूर अजहरला कंदहारपर्यंत अटलबिहारी वाजपेयी सरकारनेच सोडले होते. आसामचा भाजपा नेता निरंज होजाई याला अतिरेक्यांना आर्थिक मदत केल्याच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एक हजार कोटींचा घोटाळा व टेटर फंडिंग प्रकरणी तो दोषी आढळला. भारतीय जनता पक्ष हा भाजपा झुठी पार्टी, भारत जलाओ पार्टी असून अतिरेक्यांशी संबंध हे राष्ट्रीय सुरक्षेशी समझोता करणे आहे हे देशहिताचे नाही. काँग्रेस पक्ष असा समझोता कधीच करत नाही. देशासाठी काँग्रेसचे दोन पंतप्रधान शहिद झाले पण राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड केली नाही, असेही अजयकुमार म्हणाले.
प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यावेळी म्हणाले की, अमरावतीमध्ये व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या इरफान खान याने खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या निवडणुक प्रचारात भाग घेतला होता. राणा दाम्पत्य व भाजपाचे संबंध लपून राहिलेले नाहीत. २१ जूनला अमरावतीची घटना घडली तर उदयपूरची घटना २८ तारखेला पण या दोन्ही घटनांची एनआयएकडून चौकशी करावी, असे पत्र खासदार नवनीत राणा यांनी २७ तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठवले होते. नवनीत राणा यांना घटना घडण्याआधीच त्याची चाहूल कशी लागली हे आश्चर्यकारक आहे. हे सर्व पूर्वनियोजित होते का? कोल्हे यांची हत्या होऊन अजून महिना-सव्वा महिना झाला नाही तरी नवनीत राणा कोल्हेंच्या घरी जाऊन सांत्वन करण्याऐवजी पूजा पाठ करतात, हे अत्यंत हीन दर्जाचे राजकारण आहे. भाजपाने देशाला तालिबानी देश करण्याचा प्रयत्न चालवला आहे पण आम्ही तो कदापी होऊ देणार नाही, असे लोंढे यांनी सांगितले.