‘कवितेचे हिरवे आकाश काळाच्या पडद्याआड’; बुलढाण्याचे साहित्यविश्व शोकमग्न!
बुलढाणा (गणेश निकम) – मातीचं गार्हाणं कथन करणारा कवी, शेतीत निरनिराळे नवनवीन प्रयोग करणारा कास्तकार, शेतीचे बांध आणि कोने संतवाणीने बोलके करणारे व्यक्तिमत्व. रानाच्या, मातीच्या आणि माणसाच्या कथा आणि व्यथेला काव्यरूप देऊन समाजाच्या मुख्यप्रवाहात चर्चेला ठेवणारे जेष्ठ कवी पदमश्री ना. धों. महानोर यांचे काल निधन झाले. बुलडाणा जिल्ह्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे. साहित्यविषयक कार्यक्रमात ते आवर्जुन उपस्थित राहत असत. त्यांच्या निधनाने साहित्य वर्तुळावर शोककळा पसरली आहे.
जळगाव जिल्ह्यातील पळसखेडसारख्या छोटे गावात जन्मलेले ना. धो. महानोर यांच्या लेखनीचे राज्यभर चाहते होते. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, ज्येष्ठ नेते शरद पवार, लता मंगेशकर अशी दिग्गज माणसं त्यांच्या पळसखेड येथील शेतावर जाऊन आली, ती त्यांच्या सकस लेखणीच्या प्रेमातून…
राजकीय क्षेत्राशी त्यांचे संबंध जिव्हाळ्याचे राहिले. विधान परिषदेचे आमदार म्हणूनही त्यांना नियुक्त केले गेले होते. महानोर यांनी शेतीविषयक व्यथा आपल्या साहित्यातून मांडल्या. शेतकरी उभा करण्यासाठी हंगामी नव्हे तर बारमाही उत्पन्न घेता आले पाहिजे, ही त्यांची मांडणी होती. बुलढाण्यातील साहित्यिकांनी त्यांच्या साहित्य वर प्रबंध केला आहे. येथील जिजामाता महाविद्यालय, प्रगती वाचनालय येथे ते कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यांच्या निधनाने रानकवी हरवल्याची भावना व्यक्त होत आहे.
शेतीविषयक साहित्य त्यांच्यामुळे कळले – सदानंद देशमुख
महानोर यांच्या कवितेत शेती व शेतकरी रेखाटलेला असायचा. त्यांचे साहित्य वाचून खर्याअर्थाने माझ्या साहित्यविषयक व शेतीविषयक जाणिवा प्रगल्भ झाल्या. या नभाने या भुईला दान द्यावे… असे आशयगर्भ तेच लिहू शकतात. त्यांच्या निधनाने साहित्य वर्तुळाची मोठी हानी झाली.
कृषीपंढरीचा वारकरी गेला – सुरेश साबळे
माजी आमदार, पद्मश्री, चित्रपट गीतकार, आधुनिक प्रगत शेती कसणारा कास्तकार अशा विविध उपाध्या ना. धो. महानोर यांना असून, रानंकवी म्हणून ते परिचीत होते, महाराष्ट्राच्या अग्रणी राजकारणी मंडळीत उठबस असूनही सामान्यांशी संबंध टिकवून ठेवणारे कवी ना. धों. महानोर यांच्या निधनाने मातीशी निगडित व्यक्तीमत्वास आपण मूकलो आहोत.
कवितेचे हिरवे आकाश हरवले – अजीम नवाज राही
ना. धो. महानोर यांचा निसर्ग काल्पनिक नव्हता. अजिंठा डोंगरदर्या आणि शेतीमातीवर त्यांचा वावर होता. त्यामुळे त्यांच्या लेखनाला वस्तूनिष्ठतेची किनार होती. ग्रामीण कवितेचा आकृतीबंध बदलण्याचे काम ना. धो. महानोर यांनी केले. पळसखेडची गाणी, अजिंठा वही आदी साहित्य त्यांचे उत्तुंग उंचीची साक्ष आहे. त्यांच्या निधनाने कवितेचे हिरवे आकाश हरविले आहे.
रानवनातला कवी हरपला – संजय भारती
महाराष्ट्राचे निसर्गभान जपणारे, बहिणाबाई चौधरी ते बालकवी यांच्या कवितेचा वारसा समृद्ध करणारे रानकवी ना. धो. महानोर यांचे जाणे मराठी साहित्य वर्तुळाला बसलेला मोठा हादरा आहे. कवितेचं हे नभ आता ओथंबून उतारू येणं, आणि काव्यरसिकांच्या मनाचं रान चिंब करणं, यापुढे अशक्य आहे. ‘आबादानी होवो शेत भरु दे दाण्यांचे, तुझ्या पालखीला शब्द बांधू तुकोबाचे…’ असे सकस शब्दमातीचे लेणं पुन्हा निर्माण होणे नाही. निसर्गाला बोलतं करणार्या या महाकविला विनम्र अभिवादन.