समृद्धी महामार्गावर ‘बर्निंग ट्रक’चा थरार; सुदैवाने जीवितहानी नाही!
मेहकर (अनिल मंजुळकर) – नाशिकवरून नागपूरच्या दिशेने केमिकल घेऊन जाणार्या ट्रकला समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात हा ट्रक जळून खाक झाला असून, चालक व क्लिनरने वेळीच ट्रकमधून उड्या घेतल्याने या दोघांचे जीव वाचले आहेत. या अपघातामुळे तब्बल चार तास हा महामार्ग ठप्प पडला होता. पोलिस, अग्निशमन दल व महामार्गाचे कर्मचारी यांनी ही आग आटोक्यात आणल्यानंतर महामार्ग सुरू झाला. मेहकरनजीकच्या धानोरा राजनी गावाजवळ हा भीषण प्रकार घडला. ट्रकचे टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले आहे.
मेहकर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धानोरा राजनी गावानजीक समृद्धी महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास भरधाव जात असलेल्या या ट्रकचे टायर अचानक फुटले. त्यानंतर हा ट्रक साईड बॅरिअरला जावून धडकला. त्यामुळे घर्षण होऊन ट्रकमधील रसायन व डिझेल यांनी पेट घेतला. काहीक्षणातच संपूर्ण ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. ट्रकमधील चालक व क्लिनरने समयसूचकता दाखवत ट्रकमधून उड्या घेतल्याने दोघांचाही जीव वाचला आहे. ही आग इतकी भीषण होती, की दोन्ही मार्गाची वाहतूक ठप्प झाली होती.
तब्बल चार तास हा महामार्ग बंद पडला होता. घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलिस, अग्निशमन दलाचे बंब व महामार्गाचे द्रूतगती पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाचे चार बंब तब्बल चार तास झटत होते. ट्रकमध्ये केमिकल असल्याने आगीचे लोळ व धूर चोहीकडे पसरला होता. या आगीत ट्रक जळून खाक झाला आहे. ही आग इतकी भयानक होती, की जवळपासच्या गावातील नागरिकांनी महामार्गावर धाव घेतली. या घटनेचा अधिक तपास मेहकर पोलिस करत आहेत.
———–