प्रथमवर्ग न्यायालयाच्या न्यायाधीशांची पदे रिक्त; जिल्ह्यातील १६ हजार खटले प्रलंबित
बुलढाणा (संजय निकाळजे) – जेएमएफसी अर्थात प्रथमवर्ग न्यायालयांच्या न्यायाधीशांची पदे रिक्त असल्याने जिल्ह्यातील १६ हजार खटे प्रलंबित आहेत. ही पदे भरून पक्षकारांना तातडीने न्याय द्यावा, या मागणीसाठी ३ ऑगस्ट २०२३ रोजी जिल्हा सत्र न्यायालय परिसरात वंचित बहुजन युवा आघाडीच्यावतीने जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या नेतृत्वामध्ये ‘एक स्वाक्षरी न्यायासाठी’ हे अभियान राबविण्यात आले.
या स्वाक्षरी अभियानादरम्यान न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या एक हजार पक्षकारांच्या स्वाक्षरी घेण्यात आल्या. स्वाक्षरी मोहिमेअंतर्गत एक निवेदन पत्र वंचित बहुजन युवा आघाडीद्वारा सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला पाठविण्यात येणार आहे. यावेळी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार म्हणाले, बर्याच दिवसापासून बुलढाणा न्यायालयामध्ये जे एम एफ सी न्यायाधीशांच्या जागा रिक्त आहेत. तेथे चार न्यायाधीश असणे गरजेचे असताना त्या ठिकाणी केवळ एकच न्यायाधीश आहे. त्यांच्याकडे सुद्धा अतिरिक्त जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे एका हप्त्यामध्ये केवळ दोनच दिवस संबंधित न्यायाधीशांचे कामकाज चालते. ही बाब न्याय निर्णय प्रक्रियेला वेळ लावणारी ठरत आहे. त्यामुळे संबंधित न्यायालयामध्ये १६ हजार प्रकरणे प्रलंबित आहेत.
यामुळे ज्या पक्षकारांना न्याय निर्णय अपेक्षित आहे, त्यांना केवळ न्यायालयामध्ये चकरा माराव्या लागत असल्याचा आरोप पवार यांनी केला. पक्षकारांची न्यायाकरिता करावी लागणारी प्रतीक्षा दूर करण्यासाठी एक स्वाक्षरी न्यायासाठी हे अभियान राबविण्यात आले. या अभियानाला पक्षकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १ हजार स्वाक्षरी घेण्यात आल्या. या अभियानामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक बाला राऊत, जिल्हा महासचिव अर्जुन खरात, उपाध्यक्ष विजय पवार, जिल्हा परिषद सर्कल प्रमुख अनिल पारवे, किरण पवार , शेख यासिन सह पदाधिकार्यानी सहभाग घेतला.