– पंचायत समितीने ‘गुड मॉर्निंग पथके’ही गुंडाळली!
मेरा बुद्रूक, ता. चिखली (कैलास आंधळे) – केंद्र व राज्य सरकार स्वच्छतेविषयी अनेक योजना राबवत असून, या योजनांवर कोट्यवधींचा निधी खर्च होत आहे. अशीच स्वच्छतेची हागणदारीमुक्त गाव योजना शासनाने राबविली. यामध्ये तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. मात्र, आजही तालुक्यातील गावे हागणदारीमुक्त झाली नसून, ग्रामस्थांच्या हाती टमरेल कायम आहे. याबाबतची कोणत्याही प्रकारची संबंधितांकडून चौकशी करण्यात येत नाही. अनेक गावांत केवळ हागणदारीमुक्तीचे फलकच लावण्यात आले असून, अनेक पुरस्कारप्राप्त गावांमधील ग्रामस्थ हातात टमरेल घेऊन जाताना दिसत आहेत. ग्रामस्थांनी अनुदान लाटले पण शौचालये बांधली नाहीत किंवा वापर करत नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी पुढे आली आहे.
बुलडाणा जिल्ह्यात प्रत्येक गाव हागणदारीमुक्त व्हावे, या अनुषंगाने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कोट्यवधी रुपयांचे अनुदान देऊन घरोघरी शौचालये बांधण्यात आली. शंभर टक्के अनुदान प्राप्त होऊनही बुलढाणा जिल्ह्यासह तालुक्यातील अनेक गावात हागणदारीमुक्तीचा फज्जा उडवून सर्रास उघड्यावर शौचवारी सुरू असल्याचे चित्र चिखली तालुक्यातील मेरा खुर्द, अंत्री खेडेकर, मेरा बुद्रुक, गुजाळा, चंदनपूरसह चिखली तालुक्यात अनेक गावात दिसून येत आहे. शौचासाठी महिलांना शेतात प्रत्येक गाव किंवा गावाबाहेरील मुख्य रस्त्यावर जावे लागू नये, म्हणून हागणदारीमुक्त गाव ही योजना राबविण्यात आली. गावोगावी शौचालये उभारण्यासाठी अनुदान देण्यात आले, काहींनी यातून शौचालये बांधली तर काहींनी बांधलीच नाही. मिळालेले अनुदान पचवून, हागणदारीमुक्त गाव योजनेला हरताळ फासून, तालुक्यातील ग्रामीण भागात उघड्यावर शौचवारी अजूनही सुरूच आहे.
शौचालये बांधण्यासाठी राज्य शासनाने लाखो रुपयांचे अनुदान दिले. शौचालये बांधली पण त्यांचा वापर ग्रामस्थ करीत नसल्याने ग्रामीण भागातील शौचालय ही फक्त शोभेची वस्तू बनून राहिली आहे. किंबहुना फक्त अनुदान रेटण्यासाठी शौचालये बांधली, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. बांधलेल्या शौचालयांचा उपयोग ग्रामस्थ करतात की नाही, याबाबत ग्रामपंचायतीकडून कुठलीही पडताळणी केली जात नाही, असे दुर्देवी चित्र तालुक्यात सर्वत्र दिसून येत आहे. त्यामुळे बांधलेली शौचालये अडगळीत पडून आहेत. काही ठिकाणी शौचास जाण्यासाठी अंधाराची वाट पाहिली जाते. उघड्यावर शौचवारी सुरू असल्याने सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य पसरते. त्यामुळे आरोग्याचा प्रश्नसुद्धा गंभीरपणे निर्माण होत आहे.