Breaking newsBULDHANAHead linesPolitical NewsPoliticsVidharbhaWorld update

सदाभाऊ खोत, शिवाजीराव माने संघटनेबाहेर पडले; रविकांत तुपकरांनी संघटनाच ताब्यात घेतली!

– कुणाशीही वाद दाखवून विषयाचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न; पक्षनेतृत्वावरच तुपकरांचा आक्षेप!

मुंबई (पुरूषोत्तम सांगळे) – शेतकरी संघटनेचे संस्थापक व शेतकर्‍यांचे पंचप्राण म्हणून ओळखले जाणारे स्व. शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेतून फुटून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मोट बांधणारे राजू शेट्टी यांच्यावर पुन्हा एकदा आपला बिनीचा शिलेदार गमाविण्याची वेळ आली आहे. संघटनेत दुसरे नेतृत्व मोठे होऊ द्यायचेच नाही, या छद्मी भूमिकेमुळेच त्यांच्यावर एकटे पडण्याची ही वेळ आली. त्यांनी संघटना तर दुबळी केलीच, पण राजकीय विश्वासदेखील गमाविला. आतापर्यंत सदाभाऊ खोत, शिवाजीराव माने यांच्यासारखे पोलादी नेते संघटनेतून बाहेर पडले. रघुनाथदादा पाटलांसारखे मासलीडर नेते त्यांच्यापासून दुरावले. परंतु, आता रविकांत तुपकरांनी राजू शेट्टींच्याच नेतृत्वाला आव्हान देत, संघटना ताब्यात घेतली आहे. राजू शेट्टी हे ‘हा स्थानिक दोन नेत्यांतील वाद’ असल्याचे भासवून विषयाचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न करत असले तरी, वस्तुस्थिती तशी नाही. सर्व स्वाभिमानी शेतकरी संघटना रविकांत तुपकर यांच्या बाजूने एकवटली असून, आजरोजी राजू शेट्टी हेच संघटनेत एकटे पडले आहेत. पहिल्यांदाच संघटना फुटण्याऐवजी नेतृत्वालाच ‘साईडलाईन’ होण्याची वेळ आली आहे.

शेतकरी चळवळीला फुटीचा शाप आहे. स्व. शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेची स्थापना करत, शेतकरी चळवळ सुरू केली. परंतु, शरद जोशी यांचे नेतृत्व स्वयंकेंद्रीत ठरल्याने संघटनेत अन्य नेता मोठा होणार नाही, याची काळजी त्यांनी घेतली. आंदोलन निर्णायक टप्प्यावर आले, की धक्कातंत्राचा वापर करून ते गुंडाळले जात असल्याचा अनुभव आल्याने रस्त्यावरचे कार्यकर्ते, शेतकरीवर्ग जसा बुचकळ्यात पडत होता; तसा संघटनेतील नेतृत्वाच्या विश्वासावरही मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत होते. त्यामुळे शेतकरी संघटनेतून चांगले चांगले नेते बाहेर पडले. त्यात पाशा पटेल, राजू शेट्टी, प्रकाश पोहरे, शंकरअण्णा धोंडगे, विजय जावंधिया या मोठ्या नेत्यांचा समावेश होता. राजू शेट्टी यांनी पश्चिम महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकरी चळवळ जीवंत ठेवली असली तरी, त्यांनीही स्व. शरद जोशी यांचाच कित्ता गिरवला. शेट्टी हेदेखील आपले नेतृत्व दाबत आहेत, त्यांच्या खच्चीकरणाच्या षडयंत्री प्रकाराला कंटाळून ज्येष्ठ नेते शिवाजीराव माने, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शेट्टींची साथ सोडली. त्याही परिस्थितीत भाजपकडून मंत्रिपद व उज्वल राजकीय भवितव्याची हमी मिळत असतानाही रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी यांच्यासोबत राहणे पसंत केले. शेट्टी यांच्या एका फोनवर त्यांनी राज्यमंत्रीपददेखील लाथाडले. परंतु, नंतरच्या काळात रविकांत तुपकर हे राज्यात शेतकरी नेतृत्व म्हणून वेगाने पुढे आल्याचे पाहून, तुपकरांचे खच्चीकरण करण्यासाठी शेट्टी यांनी बुलढाणा जिल्ह्यातीलच युवक नेतृत्वाला त्यांच्या मानगुटीवर बसविण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर त्या नव्या युवकाला संघटनेतून राजकीय रसददेखील पुरविणे सुरू केले. आणि, आता तर जाहीरपणे त्या दोघांत स्थानिक पातळीवर वाद आहेत, ते आम्ही मिटवू, असे सांगून विषयाचे गांभीर्य कमी करणे, आणि रविकांत तुपकरांचे राजकीय खच्चीकरण करणे, असा उपदव्याप शेट्टी यांनी चालविला असल्याचे दिसून येत आहे.

राजू शेट्टी यांनी विदर्भात रविकांत तुपकरांच्या बाबतीत जे चालवले ते त्यांनी तिकडे पश्चिम महाराष्ट्रही केले आहे. सामान्य कार्यकर्त्यांनी रस्त्यावरचे आंदोलन करून राजू शेट्टी यांना खासदार केले. नंतर त्यांना कार्यकर्त्यांचा विसर पडला. खासदारकी वाचविण्यासाठी ते सोयीची भूमिका घेत राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाशी जवळीक करीत राहिलेत. त्यांना आलेली सत्तेची धुंदी २०१९ ला शेतकर्‍यांनीच उतरवली, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील बंडखोर नेते शिवाजीराव माने यांनी शेट्टींबाबत यापूर्वी संताप व्यक्त केलेला होता. तर राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हणजे नाव स्वाभिमानी आणि धंदे बेईमानी, असा घणाघात यापूर्वी मूळ शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथदादा पाटील यांनी केलाच होता, हेही विसरून चालणार नाही. वास्तविक पाहाता, हातकणंगले लोकसभा मतदारसंघ वगळता राजू शेट्टी यांच्याकडे जिंकण्याची ताकद नाही. पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी हरवण्याची ताकद असली तरी, तेथे राष्ट्रवादी काँग्रेस, आणि आता भाजप मजबूत झालेले आहे. वास्तविक पाहाता, राज्यात काँग्रेसविरोधात वातावरण निर्माण करण्यासाठी ‘स्वाभिमानी’सारखी संघटना आवश्यक होती, हे जाणून दिवंगत भाजपनेते गोपीनाथ मुंडे यांनी राजू शेट्टी यांना सोबत घेतले होते. मंत्री महादेव जानकर व शेट्टी त्या दोघांना एकत्र आणून त्यांची ताकद भाजपच्या पाठिशी उभी केली होती. त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत ‘स्वाभिमानी’चा भाजपला नक्कीच फायदा झाला. विधानसभेत ‘स्वाभिमानी’चा एकही आमदार निवडून आला नसला तरी, भाजपच्या जागा वाढवण्यास मदत झाली. आता राजू शेट्टी ही भाजपची गरज संपली असून, राजकीय वर्तुळात शेट्टी यांचा तितकसा दबदबा रााfहलेला नाही. त्यातच, पश्चिम महाराष्ट्रात सदाभाऊ खोत यांनी शेट्टी यांची संघटनात्मक ताकदही आपल्याकडे खेचून घेतली आहे. शेट्टींचे निष्ठावंत कार्यकर्ते, व वजनदार नेते हे एकतर सदाभाऊ खोत, रघुनाथदादा पाटील, किंवा शिवाजीराव माने यांच्यासोबत काम करत आहेत. रघुनाथदादा पाटील यांच्यासारखा आक्रमक चेहरा बीआरएस (भारत राष्ट्र समिती) पक्षात गेल्याने कर्नाटकचे मुख्यमंत्री केसी चंद्रशेखर राव यांची पश्चिम महाराष्ट्रात चांगलीच ताकद वाढली आहे. त्यामुळे सदाभाऊ, शिवाजीराव माने हे नेते राजू शेट्टींची साथ सोडून गेल्यानंतर आक्रमक शेतकरी नेते म्हणून पुढे आलेले रविकांत तुपकर हेच ‘स्वाभिमानी’चा प्रमुख चेहरा होते. निवडणूक, आंदोलनांची मोर्चेबांधणी तुपकर हे एकहाती करतात, आणि तीच त्यांची ताकद आहे. बुलढाणा, विदर्भ आणि मराठवाड्यात तुपकर हे शेतकरीवर्गातील सर्वात लोकप्रिय चेहरा असताना, आणि त्यांच्या एका हाकेवर शेतकरी, युवक हजारोंच्या संख्येने एकत्र येत असताना, राजू शेट्टी यांनी त्यांचे राजकीय खच्चीकरण करण्याचा एकही प्रयत्न सोडला नाही.

बुलढाणा जिल्ह्यातच तुपकर यांना पर्यायी नेतृत्व उभे करण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहाता, तुपकरांच्या आंदोलनाने राज्य सरकारदेखील हादरते. देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे, नाना पटोले यासारखे नेते थेट तुपकरांशी चर्चा करतात, हीच बाब राजू शेट्टी यांना कदाचित खटकत असावी. कापूस, सोयाबीनला भाव व पीकविमाप्रश्नी तुपकरांनी घणाघाती आंदोलने केल्यानंतर राज्य सरकारने चर्चेसाठी रविकांत तुपकरांना बोलावले. या चर्चेत तुपकरांनी राजू शेट्टींना सोबत घेतले नाही, त्यामुळे त्यांचा ‘ईगो हर्ट’ झाला असावा; त्यामुळेच घाटाखालील युवकाला नेतृत्व म्हणून थोपविण्याचा व तुपकरांचे मानसिक खच्चीकरणाचा प्रयत्न त्यांनी चालविला असल्याची संघटनेत सद्या जोरदार चर्चा आहे. त्यामुळे रविकांत तुपकर यांनी थेट शेट्टी यांनाच आव्हान देत, संघटना ताब्यात घेतली आहे. वास्तविक पाहाता, तुपकरांच्या माध्यमातून भाजपला एक युवा, शेतकरी चळवळीचा चेहरा मिळेल म्हणून स्वतः देवेंद्र फडणवीस हे रविकांत तुपकरांनी विनाअट भाजपमध्ये यावे, यासाठी आग्रही आहेत. त्याअनुषंगाने फडणवीस आणि तुपकर यांच्यात चर्चेच्या अनेक फेरीदेखील झाल्या आहेत. भाजपकडून बुलढाणा लोकसभेसाठी उमेदवारी मिळत असेल तरच भाजपात येतो, अशी भूमिका तुपकरांनी घेतल्यामुळे, व बुलढाण्याची जागा शिंदे गटाकडे असल्याने याबाबत अद्याप फडणवीसांनी त्यांना काही शब्द दिलेला नाही. म्हणून, तुपकरांचा भाजपप्रवेश रखडलेला आहे. उद्या ही चर्चा फलदायी झाली तर तुपकर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह भाजपसोबत जाऊ शकतात. शेतकरी संघटना फुटण्याचा एक मोठा इतिहास आहे. आणि, रविकांत तुपकर हे त्याला अपवाद ठरले आहेत. त्यांनी संघटना फोडली नाही तर संघटनेच्या नेतृत्वालाच बाजूला सारून संघटना ताब्यात घेतली आहे. एका बाजूला तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे शेतकरी प्रश्नावर हात घालत, आपला पक्ष महाराष्ट्रात वाढवण्याचा प्रयत्न करत असतानाच, राज्यातील सर्वात मोठी संघटना असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधील दोन नेत्यांमध्ये सुरू असलेला हा वाद पाहाता, तुपकरांसारखा आक्रमक नेत्यावर ‘केसीआर’ही आपले दोरे घालण्याचा प्रयत्न करत आहेत. राजू शेट्टी व रविकांत तुपकरांमधील वाद वेळीच मिटला नाही तर, शेट्टी यांच्या हातातून संघटना तर जाईलच; पण राज्यात उरले सुरले राजकीय अस्तित्वदेखील धोक्यात येईल?


२००४ मध्ये शरद जोशी यांनी भाजपशी मिळतेजुळते घेतल्याने जातीयवादी शक्तीबरोबर घरोबा नको, या कारणाने राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना काढली. या संघटनेत माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोतही होते. या दोघांना सर्जा-राजाची जोडी म्हणूनच अख्खा पश्चिम महाराष्ट्र ओळखत होता. त्यांच्या आंदोलनामुळेच उसदराचा प्रश्न राजकीय पटलावर अधिक प्रकर्षाने मांडला गेला, आणि ऊस उत्पादकांना दरहमीही मिळवता आली. दरम्यानच्या काळात रघुनाथदादा पाटील यांनी आपला लढा स्वतंत्रपणे सुरूच ठेवला होता. त्यांनी शरद जोशी आणि शेट्टी यांच्याशी फारकत घेऊन, शेतकरी चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न केला. शेट्टी यांनी भाजपशी युती केल्यानंतर खोत यांच्या रूपाने सत्तेत सहभागही घेतला. मात्र, २०१६ मध्ये महायुती शासनाच्या काळात खोत सत्तेच्या मांडवात रेंगाळल्याने आत्मक्लेश यात्रेच्या निमित्ताने खोत यांना संघटनेतून बाजूला करण्यात आले. त्यांनीही रयत क्रांती संघटनेच्या नावाने सवतासुभा मांडला असला तरी छातीवरचा शेतकरी संघटनेचा बिल्ला कायम ठेवला आहे. आता रविकांत तुपकरांनी तर ही संघटनाच ताब्यात घेऊन शेट्टींना बाजूला सारण्याची तयारी चालवली आहे. पेरते तेच उगवते, याचा अनुभव राजू शेट्टी सद्या घेत आहेत.
————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!