– आज सकाळी पुण्यातील रूबी हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास; उद्या पळसखेड (ता. अजिंठा) येथे अंत्यसंस्कार
– जवळचा मित्र गमाविल्याचे शरद पवारांना दुःख; ‘अखेर पावसाळ्यातच हा वृक्ष उन्मळून पडला’; महानोरांच्या निधनाने शरद पवार भावूक!
पुणे (सोनिया नागरे) – प्रसिद्ध निसर्गकवी, गीतकार तथा माजी आमदार पद्मश्री डॉ. ना. धो. महानोर यांचे पुण्यातील रूबी हॉस्पिटलमध्ये मूत्रपिंडाच्या विकाराने आज (दि.३) सकाळी उपचारादरम्यान निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. प्रकृती ढासळल्याने त्यांना कृत्रिम श्वसन यंत्रणेवर (व्हेंटिलेटर) ठेवण्यात आले होते. उद्या (दि.४) अजिंठाजवळील पळसखेड या त्यांच्या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, आपला जवळचा मित्र गेल्याचे दुःख शरद पवार यांनी व्यक्त केले आहेत. महानोरांच्या निधनामुळे मराठी साहित्य विश्वासह समाजाच्या सर्वस्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. आपल्या तरल काव्याच्या जोरावर काव्यप्रेमी मराठी वाचकांच्या मनात ना. धों. महानोर यांनी हक्काचे स्थान प्राप्त केले होते. महानोर यांनी काव्यसंग्रहांबरोबरच अनेक चित्रपटांसाठीही गीते लिहिली. त्यांच्या या गीतांना त्यांच्या कवितांप्रमाणेच मराठी प्रेक्षकांची जोरदार पसंती मिळाली.
महानोरांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठाजवळील पळसखेड गावात झाला होता. शालेय शिक्षण या गावात झाल्यानंतर पुढील शिक्षण त्यांनी जळगावात घेतले. महानोर हे गेल्या काही वर्षांपासून मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर पुण्यातील रूबी हॉल क्लिनिक येथे उपचार सुरू होते. मराठी कवी, गीतकार, शेतकरी, आणि माजी आमदार म्हणून ते महाराष्ट्राला परिचित होते. अनेक सुप्रसिद्ध गाणी त्यांनी लिहिली होती. निसर्गगीते आणि कविता म्हणजे ना. धो. महानोर हे एक समीकरणच महाराष्ट्रात तयार झाले आहे. त्यांनी रचलेली कितीतरी गीते महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाच्या ओठी आहेत. वानगीदाखल सांगायचं तर, ‘नभ उतरू आलं.’ ‘आम्ही ठाकर ठाकर’ ‘घन ओथंबून येती’, ‘चिंब पावसानं रान झालं’, ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली’ अशी अनेक गाणी वर्षानुवर्षं रसिकांच्या ओठी आहे. ‘मी गाताना गीत तुला लडिवाळा’ ही अंगाईसुद्धा त्यांनी लिहिली.
निसर्गावरच्या असंख्य कविता केल्यामुळे ते रानकवी म्हणून प्रसिद्ध होते. अजिंठा, गंगा वाहू दे निर्मळ, जगाला प्रेम अर्पावे, पावसाळी कविता, रानातल्या कविता हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहे. एक होता विदुषक, जैत रे जैत, दोघी, मुक्ता, सर्जा, अशा प्रसिद्ध चित्रपटांसाठी त्यांनी गीते लिहिली होती. त्यांना १९९१ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. २००९ मध्ये जनस्थान पुरक्कार, विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार, असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते. महानोरांचा पहिला काव्यसंग्रह, रानातल्या कविता (१९६७) हा आहे.. त्यानंतर वही (१९७०) आणि पावसाळी कविता (१९८२) असे आणखी दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. गांधारी (कादंबरी-१९७२), गपसप (१९७२), गावातल्या गोष्टी (१९८१-दोन्ही लोककथासंग्रह) असे गद्यलेखनही त्यांनी केले आहे. त्यांनी केलेले लोकगीतांचे एक संकलनही (पळसखेडची गाणी, १९८२) प्रसिद्ध झालेले आहेत.
जवळचा मित्र गेल्याचं दु:ख : शरद पवार
माझे जवळचे मित्र आणि महाराष्ट्राचा रानकवी ना. धो. महानोर यांच्या निधनाने मला अतिशय दुःख झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड खेड्यात गरीब शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या ना. धों.चे बालपण कष्टात गेले, पण कष्ट झेलताना त्यांचे संवेदनशील मन रानात रमले. तिथेच त्यांच्या सर्जनशीलतेला धुमारे फुटले. ना.धों.च्या कवितांनी रानातल्या कविता, पावसाळी कवितांनी, जैत रे जैत सारख्या अनेक चित्रपट गीतांनी मराठी माणसांच्या मनावर गारूड केले. ना. धोंची विधान परिषदेतील भाषणेदेखील माणसाच्या काळजाचा ठाव घेत. ना. धो. खूपच हळवे, त्यात पत्नीच्या निधनाने ते आणखी खचले. मी, प्रतिभा त्यांच्या खचलेल्या मनाला उभारी देत राहिलो. पण अखेर हा वृक्ष उन्मळून पडलाच. ना. धो.चे निधनदेखील पावसाळ्याच्या दिवसांत व्हावा, हा योग मनाला चटका लाऊन जाणारा आहे. मी आणि माझ्या कुटुंबातर्पेâ या मृदू मनाच्या निसर्गकवीला श्रद्धांजली अर्पण करतो, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. उद्या पळसखेड येथे होणार्या अंत्यविधीच्या कार्यक्रमाला शरद पवार हे स्वतः उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
————