जिल्हा परिषद आवारात विद्यार्थ्यांनी म्हटले राष्ट्रगीत आणि तिथेच भरवली शाळा!
बुलढाणा (संजय निकाळजे) – शेगाव तालुक्यातील माटरगांव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे भरावी, या प्रमुख मागणीसह इतर समस्या सोडवण्यासाठी आज, २ ऑगस्ट २०२३ रोजी जिल्हा परिषदेच्या आवारात राष्ट्रगीत म्हणून विद्यार्थ्यांनी येथेच शाळा भरवून एकप्रकारे या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘सीईओ मॅडम हाय, हाय’, ‘रिक्त असलेले शिक्षक मिळाले पाहिजे’, ‘शाळेला शिक्षक मिळाले पाहिजे’, अशा गगनभेदी घोषणाबाजी दिल्या.
शेगाव तालुक्यातील माटरगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी बुलडाणा येथील जिल्हा परिषदेच्या आवारातच शाळा भरविली. विद्यार्थ्यांसह पालकही या आंदोलनात सहभागी झाले होते. सकाळपासून आलेले विद्यार्थ्यांनी आवारात राष्ट्रगीत घेत दुपारी भोजनही घेतले. त्यानंतर परत या आंदोलनाला सुरुवात केली. शाळेत इयत्ता ५ ते १० वी पर्यंतचे वर्ग असून, तुकड्यांची संख्या १६ आहे. शाळेतील शिक्षकांची मंजूर पदांपैकी ८ शिक्षकांची पदे अनेक वर्षापासून रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने वर्ग खोल्यात पावसाचे पाणी टपकते. यामुळे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी अडचण निर्माण होते. तसेच पुरेसे डेक्स बेंचही नाही, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना विज्ञान व गणित विषय शिकवण्यासाठी शिक्षकच नाही, संगणक लॅब बंद आहे. या सर्व समस्या सोडवण्यात याव्या, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
या निवेदनातील ८ पैकी ४ शिक्षक हे ३१ जुलै रोजी जिल्हा परिषदेतर्पेâ शाळेवर देण्यात आले. उर्वरीत ४ शिक्षकांची भरती लवकरात लवकर करण्यात यावी, व इतर मागण्यांबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने येथील पालकांनी व शाळा व्यवस्थापन समितीने २ ऑगस्टरोजी इयत्ता आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना बुलढाणा येथे आणून जिल्हा परिषदच्या आवारात शाळा भरवल्यामुळे आश्चर्यच व्यक्त करण्यात येत आहे.
विद्यार्थिनी बेशुद्ध पडली, अन् उडाला गोंधळ!
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे गार्हाणे ऐकून घ्यावे, अशी मागणी विद्यार्थी करत होते. मात्र जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विद्यार्थ्यांना वेळ देत नव्हते. त्यामुळे बराच वेळ विद्यार्थी तात्कळत उभे होते. यावेळी एका विद्यार्थिनीला भोवळ आल्याने ती बेशुद्ध पडली. त्यामुळे आक्रमक झालेले गावकरी आणि विद्यार्थ्यांनी या बेशुद्ध विद्यार्थिनीला घेऊन थेट जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्यांचे दालन गाठले. यावेळी जिल्हा परिषदेच्या इमारतीत विद्यार्थिनी, गावकर्यांचा प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. पोलिसांनी विद्यार्थी आणि ग्रामस्थांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलनकरते विद्यार्थी आक्रमक झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले. शेवटी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.
https://breakingmaharashtra.in/fir_against_parents/