शाळेला शिक्षक मागणार्या विद्यार्थ्यांच्या पालकांवरच गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल!
– माटरगावच्या पालकांविरोधात शिक्षणाधिकार्यांनीच दिली फिर्याद; ११ पालकांवर गंभीर गुन्हे दाखल
बुलढाणा (विशेष प्रतिनिधी) – शाळेची दुरवस्था व शाळेवर तातडीने शिक्षक देण्यासाठी आपल्या पाल्यांसह जिल्हा परिषदेवर धडक देणार्या व लोकशाही मार्गाने आंदोलन करणार्या पालकांवरच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गुन्हे दाखल करून आपल्या मानवताशून्य कारभाराचा प्रत्यय दिला आहे. शिक्षण विभागाच्या या उफराट्या कारभाराविरोधात जिल्हाभर तीव्र संतापाची लाट उसळली असून, शाळेवर शिक्षक मागणे गुन्हा आहे का? असा संतप्त सवाल जिल्हावासीय करत आहेत. विशेष बाब म्हणजे, सरकारी कामात अडथळा आणणे (कलम ३५३)सह बालन्याय मुलांचे काळजी संरक्षण कायद्यान्वये (कलम ७५)देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेगाव तालुक्यातील माटरगाव येथील शाळेवर शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच, या शाळेची दुरवस्थादेखील झालेली आहे. याबाबत तेथील ग्रामस्थांनी शिक्षणाधिकारी यांना वारंवार कळवले होते. परंतु, त्यांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे संतप्त पालकांनी आपल्या पाल्यांना घेऊन जिल्हा परिषदेवर धडक दिली. ही मुले जिल्हा परिषदेत आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांना भेटून त्यांच्याकडे आपले गार्हाणे मांडणार होते. परंतु, सीईओंनी चिमुकल्या मुलांना भेटण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे भरदुपारी ही मुले जिल्हा परिषदेच्या अंगणात बसून होती. त्यामुळे एका मुलीला भोवळ आली व पालकांच्या संयमाचा कडेलोट झाला. त्यामुळे विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालक सीईओंच्या दालनात घुसले, तेव्हा कुठे सीईओंनी त्यांच्याशी चर्चा केली. या पालकांना शिक्षणाधिकारी व पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केल्याने काहीकाळ गोंधळ निर्माण झाला होता. या सर्व प्रकारात शिक्षण विभाग व वरिष्ठ अधिकार्यांनी पालक व मुलांच्या भावनांचा विचार केला नाही. या उलट आपल्या मानवताशून्य मानसिकतेचा परिचय देत, या पालकांविरोधात बुलढाणा पोलिसांत फिर्याद दाखल केली.
पोलिसांत दाखल एफआयआरची प्रत वाचण्यासाठी येथे क्लीक करा!
या फिर्यादीवरून पोलिसांनी दिनेश तांबटकर, राजू देवचे, गणेश सपकाळ, हरिश घोंगडे, एकनाथ मिर्गे, नीलेश खंडारे, प्रकाश हिरळकर, विजय हिरळकर, गजानन राऊत, वैâलास फाटे व एकनाथ शेगोकार या पालकांविरोधात भारतीय दंडविधानाच्या ३५३, १४३, १४९ या कलमांसह बालन्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम २०१५च्या ७५ कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रकाश मुकुंद यांनी स्वतः फिर्याद दाखल केलेली आहे. पोलिसांनीदेखील तातडीने गुन्हे दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. लोकशाहीमार्गाने आंदोलन करणे व विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी त्यांच्या पालकांनी वरिष्ठांकडे दाद मागणे गुन्हा आहे का? असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. हे गुन्हे जिल्हा परिषद सीईओंच्या मान्यतेने दाखल झालेत का? असाही सवाल निर्माण झाला आहे. शिक्षण विभागाने सूड म्हणून पालकांवर गुन्हे दाखल केले असले तरी, हे गुन्हे व घटनेची पृष्ठभूमी, वास्तविकता पाहाता, हे गुन्हे न्यायालयात टिकेल का? अशीही चर्चा जिल्हाभरात सुरू झाली आहे. तर, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी याप्रश्नी राज्य सरकारला धारेवर धरणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे हा मुद्दा नजीकच्या काळात राज्यभर पेटण्याची शक्यता आहे.
पालकांच्या आंदोलनाला शिक्षण विभाग, ‘सीईओं’चे दुर्लक्षच कारणीभूत?
शेगाव तालुक्यातील माटरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आठ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी पालकांनी वारंवार शिक्षण विभागाला निवेदन दिले. ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन थेट मुख्य कार्यकारी अधिकारी यांचीही भेट घेतली व त्यांच्याकडे मागणी केली. मात्र, तरीही शिक्षकांची नियुक्ती केली गेली नाही. सीईओ, व शिक्षणाधिकारी यांनी वेळीच शाळेवर शिक्षक दिले असते तर आजची आंदोलनाची वेळ आली नसती. त्यामुळे आजच्या अपरिहार्य आंदोलनाला सीईओ, आणि शिक्षणाधिकारीच जबाबदार आहेत, असा संताप माटरगाववासीय व्यक्त करत आहेत. शिक्षण विभागाने पालकांवर गुन्हे दाखल करून जिल्ह्यात ‘मोगलाई माजली’ असल्याचा प्रत्यय दिला, असा संतापही ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
https://breakingmaharashtra.in/zp_buldhana_matrgaon/