शेतकरी नेते रविकांत तुपकरांचाही बंडाचा झेंडा! स्वाभिमानी शेतकरी संघटनेवरच ठोकला दावा!!
– बुलढाण्यात पार पडली प्रमुख पदाधिकार्यांची बैठक
– राजू शेट्टींनाच बाजूला करून नव्या दमाने संघटना बांधणार!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – नेतृत्वाने कार्यकर्त्यांचे पंख छाटू नयेत, परंतु नेतृत्वच जर कार्यकर्त्यांचे पंख छाटत असतील तर यापेक्षा मोठे दुर्देव नाही. ज्याच्यासोबत आपण राहतो त्याने जर केसाने गळा कापला तर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहत नाही, परंतु मी आत्महत्या करणार नाही, असे म्हणत; फितुरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून वाघाची शिकार करता येत नाही, त्यासाठी खांदा इमानदार आणि खानदानी असावा लागतो, असा टोला शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी नामोल्लेख टाळत राजू शेट्टी यांना लगावला. संघटना ही कुणाची खाजगी मालमत्ता नाही, स्वाभिमानी शेतकरी संघटना आम्हा कार्यकर्त्यांच्या ताकदीवर उभी राहिली, त्यामुळे संघटना सगळ्या कार्यकर्त्यांची आहे, असे जाहीर करत रविकांत तुपकरांनी राजू शेट्टी यांच्याविरोधात बंडाचे निशान तर फडकविलेच, पण संघटनेवरही दावा सांगितला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख पदाधिकार्यांची महत्वपूर्ण बैठक २ ऑगस्टरोजी बुलढाणा येथील स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर येथे पार पडली. या बैठकीला जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामधील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी रविकांत तुपकर यांनी त्यांच्या मनातील खदखद कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केली. तर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संघटनेच्या नेत्यांच्या कार्यपद्धतीवर रोष व्यक्त करत, रविकांत तुपकर हेच आपले नेते आणि तेच आपली संघटना व पक्ष असल्याचे सांगत, तुपकरांना तुम्ही घ्याल ती भूमिका मान्य असल्याचा एकमुखी निर्णय घेतला. रविकांत तुपकर यांनी यावेळी बोलतांना स्व.शरद जोशींच्या शेतकरी संघटनेच्या सुरुवातीच्या काळापासून तर आतापर्यंत झालेल्या चळवळीचा प्रवास मांडला. यादरम्यान अनेक सोबती आले, एखादा टक्का गेले असतील, मात्र जेंव्हापासून छातीला संघटनेचा बिल्ला लावला तेंव्हापासून लाखो कार्यकर्ते सोबत आहेत, वर्षाला कार्यकर्ते बदलण्याचा धंदा मी केला नाही. कार्यकर्त्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे मला जपलं, माझ्यावर संकट आली तेंव्हा शेतकर्यांच्या पोरांनी छातीचा कोट करून माझी साथ दिली, असे रविकांत तुपकरांनी सांगितले. स्व.शरद जोशी यांची शेतकरी संघटना सोडल्यानंतर सदाभाऊ खोत आणि मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत स्वाभिमानी शेतकरी संघटना वाढविली आहे. दोन दोन – तीन- तीन महिने घरापासून दूर राहिलो, संघटनेसाठी स्वत:ला गाडून घेतले. घरादाराची, लेकरांची पर्वा केली नाही. शेकडो गुन्हे अंगावर घेतले, जेलात गेलो परंतु संघटना आणि चळवळ जीवंत ठेवली. परंतु, दरम्यानच्या काळात पक्षातील काही नेत्यांकडून पंख छाटण्याचे काम होत आहे. आपला कार्यकर्ता मोठा होत असेल, त्याचे नेतृत्व फुलत असेल तर नेत्याच्या पोटात दुखायला नको. नेतृत्वाने आपल्याच कार्यकर्त्यांचे पंख छाटणे यापेक्षा आयुष्यातील मोठे दुर्देव नाही, अशी व्यथा तुपकरांनी मांडली. आपल्या सोबत राहून आपलाच केसाने गळा कापला तर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. माझ्याऐवजी दुसरे कुणी असते तर आत्महत्या केली असती, मात्र माझे आयुष्य मी शेतकरी चळवळीसाठी, समाजासाठी अर्पण केले आहे. त्यामुळे आत्महत्या करणार नाही. कार्यकर्त्यांच्या बळावर मी कुणाशीही खेटायला तयार आहे, असे तुपकरांनी ठणकावून सांगितले.
२०१४ ला निवडणुकीसाठी आधी तयारी करायला आणि नंतर थांबायला सांगितले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून महामंडळ देण्याचा शब्द दिला. सत्ता आल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी शब्द पाळला. राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यात वाद झाले, त्यावेळी सदाभाऊंना बाजूला करू नका, असे मी त्यांना सांगितले, मात्र त्यावेळी त्यांनी ऐकले नाही. त्यांच्या शब्दाखातर मी राजीनामा दिला. २०१९ ला राजू शेट्टींनी लोकसभा निवडणुकीची तयारी करायला सांगितली, मात्र युतीमुळे तेव्हाव्ही माघार घ्यायला लावले. विधानपरिषद मिळेल असे आघाडीत ठरले, मात्र राजू शेट्टींचा पराभव झाला आणि विधानपरिषदेसाठी शेट्टी साहेबांचे नाव पुढे केले. तर आता रविकांत तुपकर हेच लोकसभेचे उमेदवार असे राजू शेट्टी सांगतात असले तरी बुलढाणा जिल्ह्यात येतात आणि आम्हाला सांगत नाही..? हा काय प्रकार आहे.? दौर्याची कल्पना आम्हाला का दिली जात नाही..? असाही प्रश्न रविकांत तुपकरांनी उपस्थित केला.
नेतृत्वाची भूमिका पालकत्वाची असायला हवी. नेतृत्वाने कार्यकर्त्याच्या पाठीवर हाथ ठेवत कार्यकर्त्याला बळ द्यायला पाहिजे. आम्ही बुलढाण्यात ५० हजार शेतकर्यांचा मोर्चा काढला, सरकार बरोबर आम्ही स्वतंत्र चर्चा केली ही आमची चूक आहे का? याउलट नेतृत्वाला त्यासाठी आनंद व्हायला पाहिजे होता. आम्ही कार्यकर्त्यांनी संघटना घडविली, वाढविली आणि आता आम्हाला संघटनेतून काढण्याचे प्रयत्न होत आहेत. परंतु संघटना कुणाची खाजगी मालमत्ता नाही. आयुष्याचे २० वर्षे संघटनेसाठी दिले आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आम्हा सर्व कार्यकर्त्यांचीच आहे, असेही यावेळी तुपकरांनी ठणकावून सांगताच, सभागृहात टाळ्यांचा कडकडाट अाणि घोषणाबाजीचा आवाज घुमला.
राज्यभर नव्या दमाची फौज उभी करणार!
आपला २० वर्षांचा संपूर्ण प्रवास आणि अलीकडील काळात पक्षीय नेतृत्वाकडून होत असलेली प्रतारणा हे सर्व कार्यकर्त्यांसमोर मांडल्यानंतर आता काय करायचे तुम्हीच निर्णय द्या? असे रविकांत तुपकरांनी कार्यकर्त्यांना विचारले असता, सर्वांनी तुम्हीच आमचे नेते आणि तुम्हीच संघटना व पक्ष आहात, असा एकमुखी निर्णय जाहीर केला. त्यानंतर तुपकरांनी माझ्या सहकर्यांना व आम्हाला संपविण्याचा जो कुणी प्रयत्न करेल त्याला ‘ईट का जबाब पत्थर से देंगे’ असे म्हणत खास आपल्या स्टाईलने इशारा दिला. आमची ताकद केवळ बुलढाण्यात नाही, ज्या जिल्ह्यात पाऊल ठेवू त्या जिल्ह्यात ताकद निर्माण करू. राज्यभर शेतकर्यांसाठी काम करणार्या पोरांच्या मागे उभे राहणार आहे. आता राज्यभर मोठी आणि नव्या दमाची फौज उभी करण्याचा निर्णय घेतला आहे, असे तुपकरांनी जाहीर केले.
यावेळी संघटना व पक्षीय पातळीवत काही नियुक्त्या जिल्हा कार्यकारिणीच्या मान्यतेने करण्यात आल्या. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (घाटावरील) जिल्हाध्यक्षपदी डॉ.ज्ञानेश्वर टाले व पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदी बबनराव चेके व विद्यार्थी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी पवन देशमुख यांची फेरनिवड करण्यात आली. तर अल्पसंख्याक आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी शेख जुल्फेकार यांची निवड करण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (घाटाखालील) जिल्हाध्यक्ष पदी अमोल राऊत यांची निवड करण्यात आली व युवा आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी अनंता मानकर व अल्पसंख्याक आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी मासुम शहा यांची फेरनिवड करण्यात आली. तर पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदी अनंदा अटोळे (खामगाव) यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख पदी श्याम अवथळे यांची निवड करण्यात आली.