मेहकर (अनिल मंजुळकर) – शहरातील एका नामांकित शाळेत खेड्यापाड्याहून मुली शिक्षणासाठी येतात. या मुलींना पाहून अश्लील हातवारे करणे, त्यांची छेडखानी करणे, त्यांच्याकडे पाहून शिट्ट्या वाजविणे आदी प्रकार करणार्या दोघा रोडरोमिओंना मेहकरच्या ठाणेदारांनी चांगला धडा शिकविला. त्यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्यांची चांगलीच धुलाई करत, डोक्यावर वाढलेले झिपरे केसं कापून, पुन्हा टुकार धंदे करताना दिसले तर कायदेशीर कारवाईचा इशारा व लेखी समन्स देऊन सोडले. या कारवाईबद्दल विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
मेहकर शहरात दररोज बाहेर गावावरून विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी शाळेची स्कूलबसची व्यवस्था करण्यात आली आहे. मेहकर शहरातील नामांकित स्कूल बसचा पाठलाग करून मुलीला इम्प्रेस करण्यासाठी डोणगाव व गावखेड्यात राहणार्या दोन टवाळखोर रोडरोमिओंना मेहकरच्या ठाणेदारांनी धू धू धुतल्याचा प्रकार काल सकाळी ११ वाजेदरम्यान घडला. गेल्या काही दिवसापांसून सुरू असलेल्या रोडरोमिओच्या चकरा व हातवारे करण्याचे स्कूल ड्रायव्हरच्या लक्षात येतात, ड्रायव्हरने हा प्रकार शाळेतील शिक्षकांच्या लक्षात आणून दिला. व ठाणेदारला फोन लावताच कर्तव्यदक्ष ठाणेदार विलंब न लावता सहकार्यांसह शाळेत पोहोचले व त्या दोन जणांना पकडून शाळेतील विद्यार्थ्यांसमोर चांगलेच धुवून काढले. या रोडरोमिओंना चांगलीच अद्दल दबंग ठाणेदार शिंगटे यांनी घडवली. ठाणेदार या दोघांना पोलीस ठाण्यात घेऊन गेले व तेथेही चांगलीच धुलाई केली. अशातच न थांबता ठाणेदारांनी त्यांची झिपरी केसांची बारिक कटिंग करून घेऊन, व लेखी समन्स देऊन सोडले.
महिला, युवती व विद्यार्थ्यांनीना बघून चित्रविचित्र हातवारे करणे, लज्जास्पद गाणे मोबाईलवर वाजवणे, शिट्टी वाजवणे, पाठलाग करणे असे प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल व जागरूक पालकांनी पोलीस ठाण्यात फोन लावून पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनही ठाणेदार शिंगटे यांनी केले आहे.
———-