Breaking newsBULDHANAHead linesVidharbha

पूर ओसरला, संसार वाहून गेला, जखमा उघड्या पडल्या!

– नुकसानीचे सर्वेक्षण सुरू; आता सरसकट मदतीची गरज!
– मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील शेगावात, नुकसानीचा घेणार आढावा
– पालकमंत्री गुलाबराव पाटील गायबच? जिल्हाभर संतापाची लाट!

बुलढाणा (बाळू वानखेडे) – जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत घाटाखाली तुफान पाऊस पड़ला. दि.२२ जुलैच्या सकाळी विशेषत: संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यात ढगफुटीने नदी नाल्यांना महापूर येवून अनेक गावात पाणी शिरले. आता पूर ओसरल्यानंतर नुकसानीचा अंदाज येत असून, यामध्ये घर, संसार उपयोगी साहित्य तसेच शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. संग्रामपूर, जळगावजामाेद, नांदुरा, मलकापूर, खामगावांत नदीनाल्यांना पूर आल्याने हजारो हेक्टरवरील शेती खरडली गेली आहे. सर्व्हे व पंचनामे युध्दपातळीवर सुरू आहेत. तर सगळीकड़ेच नुकसान असल्याने आता सरसकट मदतीची गरज आहे. दरम्यान, नुकसानीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आज (दि.२३) बुलढाण्यात आले असून, शेगाव तालुक्यात जाऊन ते नुकसानीचा आढावा घेणार आहेत. तर जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे नेहमीप्रमाणे गायब असून, त्यांना या संकटाचे काहीही सोयरसुतक दिसत नाही. पालकमंत्र्यांच्या या बेपर्वा वृत्तीबद्दल जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

जिल्ह्यावर तसा पाऊस रूसलेलाच होता. तब्बल एक महिना उशिराने पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. त्यातही घाटावरच्या तुलनेत घाटाखाली पावसाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे पेरण्याही उशिरा झाल्या. चार दिवसापूर्वी पावसाने मलकापूर, नांदुरा, शेगाव तालुके चांगलेच झोड़पले तर घाटावरही पिकालायक पाऊस झाला. गेल्या दोन दिवसात तर पावसाने कहरच केला. २१ जुलैच्या राञी व २२ जुलैच्या पहाटे चार वाजेदरम्यान विशेषत: संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस पड़ला. या पावसाने केदार, लेंड़ीसह इतर नद्या व नाल्यांना महापूर आल्याने जळगाव जामोद, बावनबीर, सोनाळा यांसह अनेक गावांत पाणी शिरले तर अनेकांची घरे, संसारपयोगी साहित्य वाहून गेले आहेत. शेतात पाणीच पाणी असल्याने हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले. ठिबक व तुषार संच वाहून गेले, विहीरी खचल्या असून, शेतीही खरडून गेली. यामध्ये शेतकरी पूर्णतः नागड़ा झाला. तसेच इतर तालुक्यांशी संपर्कदेखील तुटला होता. एचड़ीआरएफचे पथक तसेच प्रशासन व ग्रामस्थांच्या सहकार्याने काथरगाव येथील पुरात अड़कलेल्या दिडशे ग्रामस्थांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून, मंदिरात व नातेवाईकांकड़े ठेवण्यात आले आहे. तर सोनाळा येथील साठ जणाना तेथीलच शाळेत ठेवण्यात आले आहे. एकलारा येथील पुरात वाहून गेलेले शेतकरी मदन पांड़ुरंग धुळे (वय ४६) यांचा अद्याप थांगपत्ता लागला नव्हता. संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यात नुकसानीचे सर्वेक्षण व पंचनाम्याचे काम तलाठी, ग्रामसेवक, कृषीसहाय्यक, मंड़ळ अधिकारी यांच्यामार्फत युध्दपातळीवर सुरू आहे. प्रशासन नियमाचे बांधिल असल्याने त्यांना विशिष्ट चकोरीतूनच जावे लागते, पण नुकसान हे प्रचंड व सगळीकड़ेच झाले आहे. त्यामुळे सर्व्हे व पंचनाम्यात वेळ न घालता तातड़ीने मदत देणे गरजेचे आहे.

राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील हे आज बुलढाण्यात आले आहेत. दुपारी चार वाजता ते जिल्हाधिकारी कार्यालयात नुकसानीचा आढावा घेणार होते, परंतु नंतर ते नुकसानग्रस्त शेगाव तालुक्यात गेले व नुकसानीचा पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी बाेलताना त्यांनी सरकार आपदग्रस्तांच्या पाठीशी असून, त्यांना सर्वताेपरी मदत दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील नेहमीप्रमाणे गायबच असून, त्यांना या संकटाचे काहीच सोयरसुतक नसल्याच्या संतप्त भावना बुलढाणावासीय व्यक्त करत आहेत. असा निष्क्रिय पालकमंत्री तातडीने बदलावा, अशी मागणीदेखील पुढे आली आहे. जळगाव जामोदचे आ.संजय कुटे हे गावोगावी फिरून नुकसानीची पाहणी करीत धीर देत आहेत तर खामगावचे आमदार आकाश फुंड़कर यांनीही काल शेगाव तालुक्यातील कालवड़सह नदीकाठच्या गावांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनीदेखील तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पूरस्थितीची माहिती देत तातडीने मदतीची मागणी केली आहे.
सद्या पूरग्रस्त भागात नालेसफाई सुरू असून, घर, शेती व इतर नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. पुराने बाधीत कुटुंबांना दहा किलो गहू व १० किलो तांदूळ वाटप करण्यात येत आहे. सगळीकड़ेच मोठे नुकसान असल्याने नुकसानीचा नेमका आकड़ा सर्वेनंतरच समजेल, असे संग्रामपूरचे तहसीलदार योगेश्वर टोंपे व जळगाव जामोदच्या तहसीलदार शीतल सोलाट यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.


बुलढाण्यातील संग्रामपूर, जळगाव जामोद आणि शेगाव तालुक्यात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना तात्काळ दिलासा मिळावा, त्यासाठी महसूल विभागाने व प्रशासनाने रस्त्यावर उतरत पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. एकट्या संग्रामपूर तालुक्यात ४० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!