Head linesMEHAKARVidharbha

पुढील सात दिवस धोक्याचे; मेहकर तहसीलदारांचा सावधानतेचा इशारा!

– पेनटाकळी नदीपात्राजवळील शेतकरी, ग्रामस्थांना दक्षतेचा इशारा!

मेहकर (अनिल मंजुळकर) : मेहकर येथील तहसीलदार नीलेश मडके यांनी भारत मोसम विज्ञान विभाग नागपूर यांनी विदर्भामध्ये पुढील सात दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे अनुमान जाहीर केल्याने, संभाव्य परिस्थितीचा धोका पाहाता, नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे. या संदर्भात त्यांनी एक परिपत्रकदेखील जारी केले आहे. तसेच, तालुक्यातील महत्वाचे धरण असलेल्या पेनटाकळी प्रकल्पात कालपर्यंत ४४.८८ टक्केइतका जलसाठा झाला असून, संभाव्य पूरस्थिती पाहाता पेनटाकळी नदीच्या पात्रानजीकच्या शेतकरी व ग्रामस्थांना दक्षतेचा इशाराही तहसीलदारांनी दिला आहे.

तहसीलदार यांनी काढलेल्या पत्रात नमूद आहे की, प्रादेशीक मोसम केंद्र, भारत मोसम विज्ञान विभाग नागपूर यांनी विदर्भामध्ये पुढील ७ दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे अनुमान दिले असून, काही ठिकाणी रेड अ‍ॅलर्ट, येलो अ‍ॅलर्ट याप्रमाणे जिल्हानिहाय अनुमान दिलेले आहे. त्यानुसार बुलढाणा जिल्हा येलो अ‍ॅलर्टमध्ये दर्शविण्यात आलेला आहे. त्यानुसार, मेहकर तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, पुढील ७ दिवस तालुक्यामध्ये होणार्‍या पावसाचा अंदाज घेवूनच कामकाजाचे नियोजन करावे. तसेच नदी-नाल्यांना पावसामुळे पूर आल्यास त्या ठिकाणाहून, पुलावरून, नाल्यावरून पाणी वाहात असतांना रस्ता, पूल ओलांडू नये. पूर आलेल्या भागात विनाकारण भटकू नये, व नागरिकांनी पुराचे पाणी पाहण्यासाठी नदी नाल्याचे ठिकाणी जाण्याचे टाळावे, असे तहसीलदारांच्या पत्रात नमूद आहे.


मेहकरातील आपत्ती निवारण विभागाचे कार्यालय वार्‍यावर!

मेहकर तालुक्यातील तहसील कार्यालयातील आपत्ती निवारण विभागाचे कार्यालय जळून दीड वर्षे होऊनदेखील अद्यापपर्यंत आपत्ती निवारण विभागाला संगणक, कपाटे आदी साधनसामग्री मिळालेली नाही. जिल्हा प्रशासनाने आपत्ती निवारण विभागाचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे, दरवर्षी पावसाळ्यात येणार्‍या आपत्तीला पाहता आपत्ती निवारण विभागाचे पुनर्वसन होणे महत्वाचे बनले असले तरी, याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष दिसून येत आहे.
——–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!