BULDHANAHead linesMEHAKARVidharbha

पुण्यवान श्वानाचीही संतश्रेष्ठ गजानन महाराज पालखीसोबत पायीवारी!

मेहकर (अनिल मंजुळकर) – ‘मना समजे नित्य । जीव हा ब्रह्मास सत्य । मानू नको तयाप्रत । निराळा त्या तोचि असे ।।.’ या गजानन विजय ग्रंथातील ओवीची प्रचिती भाविक-भक्तांना सद्या येत असून, जीव आणि ब्रम्ह एकच असल्याचे जाणून येत आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पुण्यवान श्वानाने शेगावीचे योगीराणा संतश्रेष्ठ गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्यासोबत पंढरपूरहून पायीवारी सुरू केली असून, हा दिंडी सोहळा आज शिर्ला नेमाणे येथे मुक्कामी थांबला. याप्रसंगी या पुण्यवान श्वानाला पाहण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती.

तीन जुलैला पंढरपूर येथून संतश्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी मार्गस्थ झाल्यापासून वारकर्‍यांसोबत हा पुण्यवान श्वास पायी चालत आहे. पूर्वजन्मीचे संचित की संत गजानन महाराजांशी असलेले त्याचे श्रद्धायुक्त ऋणानुबंध; पण या श्वानाचे पालखीसोबत शेगावी येणे निश्चितच कुतुहल व अढळ श्रद्धेचा भाग ठरले आहे. प्रेम, सद्भावना, शिस्त असे सर्वगुण या श्वानात असून, या मूक्या प्राण्याकडून शिकण्याची गरज निर्माण झाली आहे. संत गजानन महाराजांच्या पालखीचे दोनवेळा परिक्रमा पूर्ण करुन दर्शन घेऊन वारकर्‍यांसोबत पायी चालत श्वान शेगावच्या ठिकाणी पोहोचत आहे. या पायी चालणार्‍या श्वानाबद्दल माहिती घेतली असता, पंढरपूर येथून वारकरी बांधवांसोबत हा श्वान पायी चालत आहे. वारकरी जिथे मुक्कामाला थांबतील तेथेच हा श्वान थांबतो. या श्वानाला वारकरी बिस्किटे, दूध, पोळी खाऊ घालतात. रस्त्यानेसुद्धा शिस्तबद्धपणे तो चालत असल्याने भाविक-भक्त कुतुहलाने पाहत असतात.

परतीच्या प्रवासात अश्व, रजत पताका, भगव्या पताका, टाळकरी, वारकरी हे गण गणात बोते, जय गजानन हरिनामाच्या गजरात तल्लीन झालेले असतात, तसा हा श्वानही हरिनाम करत चालत असल्याचे भासतो. भाविक भक्त भक्त वारकर्‍यांना आपापल्या परीने लाडू, बिस्किटे, चहा, आरोचे पाणी, भजे, आलुवडे देत होते. या श्वानालाही काहींनी बिस्कीट देऊन त्याच्या श्रद्धेचा आदर केला गेला. परतीच्या मार्गावर असलेल्या पालखी सोहळ्याचे ठीकठिकाणी स्वागत करण्यात आले. संगम फाटा येथे परंपरेनुसार सर्व वारकर्‍यांना संत गजानन महाराज संस्थानतर्पेâ पाच रुपये नाणें भेट दिली जाते. जानेफळ येथील युवकांनी ९० लीटर दूध घेऊन चहा व आरोचे पाणी पाजले. शिस्तबद्ध चालणार्‍या वारकर्‍यांना आरोग्य विभाग, पोलिस विभागाकडून च़ौक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चार वाजता संत गजानन महाराजांची पालखी मुक्कामी शिर्ला नेमाने येथे होती. दरवर्षी पालखीसोबत चालणारा श्वान कुतूहलाचा विषय ठरत होता, पण आता तो श्रद्धेचादेखील भाग बनत चालल्याने संतांच्या सहवासात आल्यानंतर श्वानालादेखील देवत्व प्राप्त होत असल्याची प्रचिती येऊ लागली आहे.
————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!