ChikhaliVidharbha

अंत्रीकोळी, वाघापूरसह परिसरात रोहींचा उच्छाद; शेतीपिकांचे अतोनात नुकसान!

चिखली (महेंद्र हिवाळे) – चिखली तालुक्यात रोही (नीलगाय) व इतर वन्य प्राण्यांनी हैदोस घातला असून, कोवळी पिके फस्त करत असल्याने शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान होत आहे. या प्राण्यांचा बंदोबस्त करून शेतीपिकाच्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. या मागण्यांबाबत अंत्रीकोळी-वाघापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ.वर्षा विठ्ठल गिरी व परिसरातील शेतकरी याप्रश्नी लवकरच वनविभागाला निवेदन देणार आहेत.

चिखली तालुक्यातील अंत्री कोळी, वाघापूरसह परिसरात रोही (नीलगाय) प्राण्याकडून पिकाची नासाडी होत असल्याने शेतकरी सध्या संकटात सापडले आहेत. याकडे वन विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन नुकसानाची पाहणी करावी व शेतकर्‍यास नुकसान भरपाई द्यावी, तसेच वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी अंत्री कोळीसह परिसरातील शेतकरी करीत आहे. अतोनात खर्च करून कष्टाने जगविलेली पिके रोही व अन्य वन्यप्राण्याकडून उध्वस्त केले जात आहेत. सध्या साकेगाव, अंत्री कोळी, वाघापूर, रायपूरसह परिसरात पिके चांगली असून रोही (नीलगाय) व इतर वन्य प्राण्यांचा धुमाकूळ सुरू आहे. बरेच शेतकरी रात्री जागून पिकाची राखण करीत आहे. मात्र अनेक भागात परिसरात रोही व अन्य वन्य प्राण्याकडून पिकाची नासाडी सुरू आहे. त्यामुळे शेतकरी गंभीर संकटात सापडला आहे. सध्या सोयाबीन, तुर, उडीद, मूग या पिकावर वन्यजीव प्राण्याने हल्ला चढवला असून, पेरणी आटोपल्यानंतर पिके डोलायला लागले होते. मात्र आधीच संकटात असलेले शेतकर्‍यांना आता वन्यजीव प्राणी पिकाची नासाडी करत असल्याने शेतकरी सध्या पीक वाचवण्यासाठी धडपड करत आहे. तरी पिकाच्या नुकसानी भरपाई वन विभागाकडून तात्काळ मदत करण्यात यावी, अशी मागणी सध्या चिखली तालुक्यासह अंत्री कोळी, वाघापूर, साकेगाव, रायपूर परिसरातील शेतकर्‍याकडून होत आहे.

दरम्यान, अंत्री कोळी वाघापूरच्या उपसरपंचा सौ.वर्षा विठ्ठल गिरी यांनी याप्रश्नी आक्रमक भूमिका घेतली असून, शेतकर्‍यांच्या मागणीकडे लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तसेच यासंदर्भात लवकरच वनविभागाला निवेदन देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अंत्री कोळी येथील त्रस्त शेतकरी सुरेश वाघ, दिनेश काळे, कल्याण जायभाय, विशाल डुकरे, तुकाराम हिवाळे, संदीप शेंभेकर, बाबुराव काळे, बबन वाघ व गावातील व परिसरातील शेतकरी यांनीदेखील वनविभागाने तातडीने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, यासाठी निवेदन देणार असल्याचे सांगून, आक्रमक भूमिका घेण्याची तयारी दर्शविली आहे.


शेतामध्ये रोही प्राण्यांचे शंभर ते दिडशेच्या संख्येत कळप असून, एवढे रोही नुसते शेतामधून गेले तरी पिकांची मोठी नासाडी होत आहे व निघून आलेले पीक हे रोही खात आहे. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांना रात्रंदिवस पहारा देऊन पीक वाचवण्याचा प्रयत्न करावा लागत आहे. तरी संबंधित विभागाने ह्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा. जेणेकरून पहिलाच शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना आता पिके वाचवण्यासाठी धडपड करत आहे. तरी सरकारने वेळीच या गोष्टीची दखल घ्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
———–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!