उत्पन्नाचे दाखले द्या; प्रशासनाचे तुघलकी फर्मान, गोरगरिबांचा जीव मेटाकुटीला!
– उत्पन्नाचे दाखले काढणे व सादर करण्यासाठी, निराधार, विधवा, वृद्ध, परित्यक्त्या झिजवताहेत तहसील, पंचायत समिती, तलाठी कार्यालयाचे उंबरठे!
नंदूरबार (आफताब खान) – संजय गांधी निराधार योजने सह विविध योजनांसाठी उत्पन्नाचा दाखला शासनाच्यावतीने अनिवार्य करण्यात आला आहे. उत्पन्नाचा दाखला देण्याची अंतिम तारीख ३० जून देण्यात आली होती. लाभार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून मुदत संपल्यानंतरही प्रशासन दाखले जमा करुन घेत आहे. मात्र ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या या योजनांमध्ये उत्पन्नाचा दाखला अनिवार्य झाल्याने निराधार आणि वृद्ध व्यक्तींची उत्पादनाचा दाखला काढण्यासाठी दमछाक होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच आता उत्पादनाचे दाखल्यासाठी ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांना शहराच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत.
गाेरगरिबांचा त्रास टाळण्यासाठी प्रशासनाच्या वतीने यासंदर्भात कुठलीही ठोस भूमिका घेतली नसल्याचे चित्र दिसून येत आहे. ३० जून पर्यंत अनेक लाभार्थ्यांनी दाखले जमा केले नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हे दाखले मिळवण्यासाठी तालुका ठिकाणावरील पंचायत समिती, तहसील कार्यालय आणि तलाठी कार्यालयांजवळ ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. अचानक उत्पन्नाच्या दाखल्याची अट टाकली गेल्याने विधवा, अपंग, ज्येष्ठ नागरिक यांना विविध योजनेतील लाभार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे ३० जून पासून अनुदान बंद होणार असल्याने आपले पोट कसे भरावे, असा प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित झाला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी गावा गावात महसूल विभागाकडून कॅम्प घेऊन उत्पादनाच्या दाखल्यांचे वाटप करावे, अशी मागणी केली जाते.