– तारा ओढताना थ्रीफेजच्या जीवंत तारेला घासल्याने उतरला करंट, चौघे काही सेकंदात तडफडून मेले
– चौघा मजुरांच्या मृत्यूला ठेकेदार कारणीभूत, महावितरणला कामाची कल्पनाच दिली नाही!
कन्नड (ब्रेकिंग महाराष्ट्र) – जीवाचा थरकाप उडविणारी घटना औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील हिवरखेडा नांदगीर वाडी येथे शुक्रवारी दुपारी घडली आहे. वीजेच्या तारा ओढणार्या चार मजुरांचा वीजेचा करंट लागून जागीच मृत्यू झाला. हे मजूर जी तार ओढत होते, तिचा स्पर्श थ्रीफेजच्या जीवंत तारेला झाला. त्यामुळे अवघ्या काही सेकंदात हे चारही मजूर जागीच तडफडून मेले. या घटनेने औरंगाबाद जिल्ह्यात खळबळ उडाली असून, महावितरणच्या खासगी ठेकेदारामुळेच हे चार जीव गेले आहेत. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. हे चारही मजूर गरीब होते, आणि त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे पोट त्यांच्या कष्टावरच भरत होते. आता या चारही मजुरांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे.
हे चारही मजूर ठेकेदारामार्फत हिवरखेडा नांदगीर वाडी येथे नवीन तारा ओढण्याचे काम करत होते. नवीन उभारलेल्या पोलवर या तारा बांधल्या जात होत्या. काम सुरु असताना वीजप्रवाह बंद होता. परंतु, नेमकी एका तारेचा स्पर्श थ्रीफेजच्या जीवंत तारेला झाला व थ्रीफेजचा मोठा वीजप्रवाह ओढत असलेल्या तारेत उतरून या चारही मजुरांचा काही सेकंदात तडफडून व जळून मृत्यू झाला.
मृतांमध्ये गणेश कारभारी थेटे (वय ३५), भारत बाबूराव वरकड (वय ३५), जगदीश मुरकुंडे (वय ४०), अर्जुन बाळू मगर (वय २६) सर्व राहणारे नावडी, अशी त्यांची नावे आहेत. या दुर्देवी घटनेने नावडी गावावर तर शोककळा पसरली होती. मृतदेहांची उत्तरीय तपासणी करून मृतदेह गावात आणताच, नातेवाईकांनी व कुटुंबीयांनी एकच हंबरडे फोडले. अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. गावात एकही चूल पेटली नव्हती.
चौघांच्या मृत्यूला ठेकेदार जबाबदार!
तारा ओढण्याचे काम सुरु आहे, याची कोणतीही माहिती ठेकेदाराने महावितरणच्या अधिकार्यांना दिली नसल्याची बाब उघडकीस आली आहे. कन्नडचे उपकार्यकारी अभियंता नितीन गायकवाड यांनी सांगितले, की आम्ही ज्या ठेकेदाराला तारा ओढण्याचे काम दिलेले आहे, त्या ठेकेदाराची ही माणसे नाहीत. त्याने कुणाला काम दिले, ही माणसे तेथे गेली कशी? हा प्रश्न आहे. आणि, हे काम करण्यापूर्वी आमच्या वायरमन किंवा अभियंत्याला तरी माहिती द्यायला पाहिजे होती. त्यामुळे हा दुर्देवी प्रकार घडला आहे.
———-